माणिकबाई भगवानराव रेणके : (१ जानेवारी १९५४). पारंपरिक खंडोबा उपासक. माणिकबाई भगवानराव रेणके या पारंपरिक खंडोबा उपासक म्हणून महाराष्ट्रात सर्वपरिचित आहेत. पुणे येथील महापालिकेच्या शाळेत त्यांचे पाचवी पर्यंत शिक्षण झाले. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव माणिक गोविंदराव निकम असे आहे. गोविंदराव निकम आणि शांताबाई निकम यांनी मुलीस खंडोबाचे उपासक बनविले. त्यांचे गुरू शांताबाई आणि पती भगवानराव रेणके होत.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून माणिकबाईंनी खंडोबाचे जागरण सादर करण्यास प्रारंभ केला.आई शांताबाईंप्रमाणेच माणिकबाई या पारंपरिक मुरळी म्हणून प्रसिध्दीस आल्या. बाबाजी मुकुंद, बाबाजी गोकुळ, यशवंत महाराज, रंगु वाघ्या, बापू वाघ्या, दगडुबाबा साळी अशा नामवंत रचनाकारांची खंडोबाची पारंपरिक पदे पारंपारिक चालींसह माणिकबाई यांना मुखोद्गत आहेत. जर्मनीच्या हायडलबर्ग विद्यापीठातील धर्मशास्त्र विभागाचे प्रमुख जयाद्री निवासी दिवंगत गुंथर सोन्थायमर हे खंडोबाचे संशोधक होते. त्यांनी माणिकबाईंकडून अनेक पदे संग्रहित करून घेतली. माणिकबाईंना चार मुली असून त्यांना पदवी पर्यंत शिक्षण देऊन संस्कारीत करण्याच काम माणिकबाईंनी केले. आषाढ शुद्ध प्रतिपदेला खंडोबाचे अवतरण जेजुरीला झाले त्यावेळी गणांद्वारे खंडोबाची पूजा केली गेली. ही परंपरा आजही कायम असून जेजुरीच्या खंडोबाची पारंपारिक मुरळी म्हणून माणिकबाईंनी आजही त्या तिथीला गणपूजेचा प्रथम मान असतो. ‘पिवळा रंग पाहुनि सदा दंग झाले मल्हारी’, ‘मल्हार सदरेला बैसले भंडाराने पिवळे झाले’; ‘अश्विन महिना प्रातःकाली न्हाती कर्हेच्या तीरी’,’ मल्हारी तुझे किती गुण गावू’, ‘पहाडपर ज्योत खडे मलुखान’ अशी अनेक पारंपारिक खंडोबाची पदे माणिकबाईंना मुखोद्गत आहेत.

इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राने १९७९ साली खंडोबाचे लगीन  हे संशोधन नाट्य रंगभूमीवर आणले. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यशाळेत अशोक जी परांजपे, अशोक रानडे, रोहीणी भाटे, रमेश तेंडुलकर यांच्यासमोर माणिकबाईंनी खंडोबाची पदे पारंपरिक वाघ्ये शंकरराव धामणीकर, पारंपरिक मुरळी म्हाळसाबाई चकटे यांच्या सोबत सादर केली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या महाराष्ट्राच्या पाऊलखुणा  या माहितीपटात माणिकबाईंनी खंडोबाची जागरण सादर केले. पुणे आकाशवाणी केंद्र, मुंबई आकाशवाणी केंद्र, लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या जुन्नर, सांगली,अहमदनगर येथील लोकसाहित्य परिषदांमध्ये माणिकबाईंनी खंडोबाचे जागरण सादर केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या गुरू-शिष्य परंपरा योजनेनुसार २००९- २०१० मध्ये माणिकबाईंना गुरु म्हणून पाठ्यवृत्ती प्राप्त झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत २०१२- २०१३ या शैक्षणिक वर्षात त्यांनी पदव्युत्तर पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खंडोबाच्या जागरणाचे प्रशिक्षण दिले. कालनिर्णय सन्मान संध्या १९८९ कार्यक्रमात त्यांनी आपली कला सादर केली. परळी वैजनाथ येथील अ.भा.मराठी साहित्य संमेलनात, आळंदी येथील अ.भा.मराठी साहित्य संमेलनात, १९८० साली दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी खंडोबाची पदे सादर केली. १९९८ मध्ये पुणे महापालिकेचा पठ्ठेबापूराव पुरस्कार, सन २०१९ चा महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, लोकरंग सांस्कृतिक मंच, ठाणे या संस्थेचा जेष्ठ नाटककार, गीतकार अशोक जी परांजपे अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. माणिकबाई रेणके यांच्या पारंपरिक खंडोबा पदांवर अनेक अभ्यासकांनी वेगवेगळया विद्यापीठात पीएच.डी. साठी प्रबंध सादर केले आहेत. खंडोबाच्या उपासनेचे शास्त्र आणि खंडोबाचे संकीर्तन यांचा पूर्ण परिचय माणिकबाईंना आहे.

संदर्भ :

  • खांडगे, प्रकाश, खंडोबाचे जागरण, लोकवाङ्मय गृह, मुंबई.