खेडेकर, विनायक विष्णू : (१९ सप्टेंबर १९३८). राष्ट्रीय पातळीवर सर्वपरिचित असणारे गोवा राज्यातील लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक. त्यांचा जन्म सावई-वेरे फोंडा गाव येथे झाला. कुळागर येथे छोटी बागायती जमीन कसणे तसेच खेडोपाडीच्या कुटुंबांचे पौरोहित्य करणे हा त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा मार्ग होता. विनायक खेडेकर यांनी शाळेत जाऊन कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही तथापि आपल्या बहिणीकडून ते लिहायला, वाचायला शिकले. गुरुकुल पध्दतीने त्यांनी संस्कृत, वैदिकी, ज्योतिष, याज्ञिकी अध्ययन तसेच पौरोहित्याचे शिक्षण घेतले. यज्ञयागादी परंपरा त्यांनी चालू ठेवली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे वडील कीर्तनकार बाळुबुवा अभिषेकी यांच्याकडून विनायकरावांनी गायन आणि किर्तनाचे धडे घेतले. गोवा आणि कारवार मधील अनेक भागांमधून त्यांनी कीर्तने केली. मराठी, कोकणी, इंग्रजी, संस्कृत, पोर्तुगीज भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. दैनिक केसरीचे गोवा प्रतिनिधी म्हणून त्यांनी पत्रकारितेस प्रारंभ केला. समाचार भारती आणि हिंदुस्थान समाचार  या वृत्तसंस्थांचे विभाग व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. विविध नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखनही केले.

बालपणापासून त्यांना लोकसाहित्याचे आणि लोकसंस्कृतीचे आकर्षण होते. लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि नाटक अशा क्षेत्रातील विशेष आवडीमुळे विनायकरावांनी गोवा कला अकादमीत सदस्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आणि अनेक उपक्रम गोवा कला अकादमीत यशस्वीपणे राबविले. त्यांच्या कार्यकाळात गोवा कला अकादमीने लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या लोकसाहित्य परिषदेचे आयोजन केले होते. या लोकसाहित्य परिषदेच्या अध्यक्षा ज्येष्ठ विदुषी दुर्गा भागवत या होत्या. संगीत, नृत्य, नाट्य,पाश्चात्य संगीत, दृककला अशा वेगवेगळ्या विदांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, उत्सव, महोत्सव त्यांच्या संकल्पनेतून गोव्यात साकार झाले.’लोकवेद’ ही स्वतंत्र संकल्पना त्यांनी रुजविली. पोर्तुगीजांच्या आक्रमणाने बाधित झालेल्या गोव्यात भारतीय संस्कृतीच्या, लोकसंस्कृतीच्या पुनरूत्थानाला त्यांनी चालना दिली. लोककलांच्या जतन,संवर्धन, संशोधनासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील चित्रकथी परंपरा तसेच कळसुत्री बाहुल्या त्यांच्या दस्तावेजीकरणाचे कार्य तसेच या लोककलांना राष्ट्रीय मान्यता प्राप्त करून देण्याचे कार्य त्यांनी केले. चित्रकथी आणि कळसुत्री बाहुल्यांद्वारे मसगे आणि गंगावणे हे ठाकर समाजातील लोककलावंत कलेचे निर्वहन करीत आहेत. संगीत नाटक अकादमीच्या माध्यमातून गुरू-शिष्य परंपरेची योजना त्यांनी या लोककलावंतांसाठी राबविली. गोव्यातील शिगमो, धालो, दहीकालो, देखणी, जागर आदी लोककला प्रकारांचे दस्तावेजीकरण त्यांनी केले. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर भारत सरकार तसेच संगीत नाटक अकादमी भारत सरकार या संस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, गुजरात, राजस्थान या राज्यांमधील लोकवाद्यांच्या दस्तावेजीकरणाचे कार्य तसेच लोकवाद्य महोत्सवाच्या आयोजनाचे कार्य विनायकरावांनी केले. गोव्यात लोकसंस्कृती, लोककलांच्या क्षेत्रीय संशोधनाला त्यांनी चालना दिली. अमेरिका, रशिया या देशांचे दौरे करून तेथे भारतीय लोककला दर्शनाच्या संयोजनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाची पाठयवृत्ती त्यांना प्राप्त झाली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला संस्था अशा अनेक मान्यवर संस्थांच्या विविध समित्या, उपक्रमांमधून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

लोककलेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट संघटक, प्रशासक, संशोधक, संयोजक अशा विविध पातळ्यांवर कार्यरत असलेल्या विनायकरावांनी गोव्यातील एक सिद्धहस्त साहित्यिक म्हणून आपली प्रतिमा तयार केली आहे. अनेक मौलिक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. मराठी – इंग्रजी – कोकणी भाषेत त्यांनी एकूण १८ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यातील बहुतांश पुस्तके गोव्यातील लोकसंस्कृती, लोककला, लोकसाहित्य विषयक आहेत. श्री महालसायन, गोमन्तकीय लोककला, लोकसरिता, नाते अचेतनाचे, श्रीमान शिरोडे, महाप्रस्थान, गोवा कुळमी, फोक डान्सेस ऑफ गोवा, गोमंतकीय लोकभाषा, इको कल्चर : गोवा प्याराडायम, गोवा लग्नाख्यान , गोवा संस्कृतीबंध, कथा रुपड्यांची, गोवा देवमंडल उन्नयन आणि स्थलांतर अशी अनेक संशोधनपर ग्रंथसंपदा विनायकरावांच्या नावावर आहे. काणी काणी कोतवा, काणी, घेतला वसा टाकू नको अशी त्यांची अप्रकाशित नाटके मंचित झाली आहेत. गोमंतक गणेश, घुमट उत्सव, मंदिर संगीत आदी ध्वनीचित्रफिती त्यांच्या संकल्पनेतून तयार झाल्या आहेत.

गोवा शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, रंग सन्मान पुरस्कार कृष्णदास शामा पुरस्कार, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर भारत सरकारतर्फे दिला जाणारा डॉ. कोमल कोठारी पुरस्कार, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार अशा पुरस्कारांनी विनायकरावांना सन्मानित करण्यात ऐकले आहे. एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. विनायक खेडेकर यांनी गोव्याच्या लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोककला क्षेत्राला आपल्या प्रतिभा आणि प्रज्ञेने नवे आयाम दिले आहेत.

संदर्भ :

  • खेडेकर, विनायक, गोवा संस्कृतिबंध, पद्मगंधा प्रकाशन, २०१२.