अग्रवाल, वासुदेवशरण : ( ७ ऑगस्ट १९०४ – २६ जुलै १९६७). विख्यात पुरातत्त्वज्ञ, प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि साहित्यिक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील ‘खेडा’ नामक गावात झाला. आईवडील लखनऊ येथे वास्तव्यास असल्यामुळे तेथेच त्यांचे प्राथमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण झाले. महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी होऊन अग्रवाल यांनी शिक्षण अर्धवट सोडले (१९२०); परंतु गांधीजींनी आंदोलन स्थगित केल्यावर त्यांनी पुन्हा ‘काशी विश्वविद्यापीठाचा’ विद्यार्थी म्हणून लखनऊ विद्यापीठात प्रवेश मिळवला. पुढे लखनऊ विद्यापीठ मधून एम. ए. ही पदवी संपादित केली (१९२९). ‘काशी विश्वविद्यापीठ’ मधून पीएच. डी. (१९४१) आणि डी. लिट. (१९४६) या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर बरीच वर्षे काशी विश्वविद्यापीठामध्ये ‘प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व’ विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत राहीले.

अग्रवाल हिंदी, इंग्रजी, संस्कृत व पाली भाषेचे जाणकार होते. काशी विश्वविद्यापीठमध्ये चार वर्षे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या सहवासात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले (१९२३-२७). त्यानंतर डॉ. राधा कुमुद मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती’ या विषयात एम. ए. पूर्ण केले. आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात अग्रवाल यांनी ‘India : As known to Manu’ हा लघूशोधप्रबंध सादर केला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना अग्रवाल माधुरी मासिकामध्ये ‘अद्वैतवाद’ या विषयावर लेखन करत होते (१९२९). त्यांच्या लिखाणावर आकर्षित होऊन तत्कालीन साहित्यिक पंडित महावीर प्रसाद द्विवेदी यांनी त्यांना अभिनंदनपर पत्र लिहिले. द्विवेदी यांच्या मते, सदर लेखाचे लेखक हे कुणी वयस्कर महान विद्वान असावेत, परंतु हे लेखन ‘अग्रवाल’ नामक तरुणाने केले असल्याचे समजल्यावर ते अचंबित झाले. पुढे डॉ. मुखर्जी यांच्या आग्रहावरून अग्रवाल यांनी पाणिनीच्या सूत्रांवर अभ्यास सुरू केला. तब्बल १२ वर्षे काम केल्यानंतर अग्रवाल यांनी ‘India : as known to Panini’ हा संशोधनात्मक प्रबंध सादर केला. याच विषयात त्यांना पीएच. डी. तसेच डी. लिट. पदवी प्राप्त झाली. अग्रवाल यांच्या या संशोधनाद्वारे पाणिनी आणि कौटिल्य यांच्यामध्ये असणाऱ्या काळाच्या अंतराची निश्चिती झाली. यामुळे कौटिल्य आणि पाणिनी यांचा काळ अगदी जवळ येऊन ठेपला आणि जुनी कालगणना कालबाह्य झाली. यामुळे कौटिल्य आणि पाणिनी यांच्यातील ८०० वर्षांचे अंतर दूर झाले आणि निश्चित कालगणना त्यांनी संशोधन करून सिद्ध केली.

अग्रवाल यांनी ‘मथुरा संग्रहालयाचे’ प्रमुख म्हणून दहा वर्षे काम पाहीले (१९३१–४१). यानंतर लखनऊ येथील ‘मध्य आशियाई पुरातन विभागाचे प्रमुख’ म्हणून सहा वर्षे त्यांनी कामकाज सांभाळले (१९४१–४७). दिल्ली येथील ‘राष्ट्रीय संग्रहालय’ स्थापन करण्यामागेसुद्धा त्यांचे योगदान होते. १९५६ मध्ये त्यांनी ‘भारतीय पुरातत्त्व विभाग’ मधील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘काशी विश्वविद्यापीठ’ मध्ये ‘भारतीय विद्याशास्त्र’ विषयात पंधरा वर्षे व्यतीत केले. दरम्यान, अग्रवाल यांची बरीच ग्रंथसंपदा प्रकाशित झाली. हँडबुक टू द स्कल्पचर्स इन कर्झन म्युझिअम ऑफ आर्किऑलॉजी, मथुरा (१९३७), कॅटलॉग ऑफ मथुरा म्युझिअम (चार खंड), गुप्त आर्ट  (१९४७), गाइडबुक ऑफ सारनाथ (१९५६), इंडियन मिनीअचर :ॲन अल्बम  (१९६१), स्टडीज इन इंडियन आर्ट (१९६५), मास्टरपिसेस ऑफ मथुरा स्कल्पचर्स (१९६५), इंडियन आर्ट (१९६५) इत्यादी त्यांचे काही महत्त्वाचे संशोधनग्रंथ. वाराणसी येथे वास्तव्यास असताना ब्रह्म, ब्रह्म सिद्धांत, ब्रह्म विनय या तीन ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. ब्रह्म सिद्धांत ग्रंथामुळे वैदिक भाषेचा पाश्चात्त्य दृष्टिकोन नाकारला. महाभारताच्या २४,००० ऋचांवर पंधरा वर्षे अभ्यास करून अग्रवाल यांनी भरत सावित्री हा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केला (१९६५). तसेच, गीतेवर केलेले भाष्य गीता नवनीत या नावाने प्रकाशित केले. बाणभट्टचे हर्षचरित, कालिदासाचे मेघदूत, कीर्तीलता यांचे पद्मावत, मैथिली कवी यांच्या रचनांचा अभ्यास करून अग्रवाल यांनी इतर साहित्यिकांना वैदिक साहित्यातील ‘प्रतीकवाद’ पटवून दिला. १९६३ ते १९६६ या काळात अग्रवाल यांनी मार्कंडेय पुराण, मत्स्य पुराण, वामनपुराण, देवी माहात्म्य, सूर्य प्रतीक या पुराणग्रंथावर स्वतंत्र लेखन प्रसिद्ध केले. शिव महादेव: ग्रेट गॉड हे प्रसिद्ध पुस्तक याच काळात प्रकाशित झाले (१९६७). १९५६ मध्ये डॉ. मोतीचंद यांच्यासमवेत अग्रवाल यांनी चतुर्भाणी: गुप्तकालीन शृंगारहाट नामक हिंदी ग्रंथाची रचना केली. सदर ग्रंथामध्ये चार एकपात्री नाटकांचे संकलन केलेले आहे. संस्कृतमध्ये ‘भाणी’ या शब्दाचा अर्थ एकपात्री नाट्य असा होतो. या ग्रंथात शूद्रकचे पद्मप्राभृतक, ईश्वरदत्तचे धूर्तविटसंवाद, वररुची याचे उभयाभिसारिक आणि श्यामलकाचे पादताडितक या चार संस्कृत कलाकृतींचा समावेश होतो. यामध्ये गुप्तकालीन सांस्कृतिक जीवन, नगर रचना, राजा व त्याचे मंत्रीगण, समाजातील विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या दैनंदिन जीवनाच्या नोंदी आपल्याला आढळतात. वस्त्र, वेशभूषा, शिल्प, स्थापत्य, कला, खानपान, नृत्य, संगीत, चित्रकला आणि शिष्टाचार यांसारख्या सांस्कृतिक बाबींवर अभ्यास करणाऱ्या विद्वानांना सदर ग्रंथाचा उपयोग झाला.

अग्रवाल यांना पद्मावत संजीवनी व्याख्या या हिंदी साहित्यकृतीसाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेद, पुराण, उपनिषदे यांच्यापासून ते मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या संस्कृत साहित्य कलाकृतीपर्यंत त्यांचा अभ्यास होता. कुषाणकालीन शिल्पकलेपासून मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या लघुचित्रशैलीपर्यंत त्यांचे चिकित्सक लेखन आपल्याला दिसून येते. त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत सहाशेपेक्षा जास्त संशोधनात्मक ग्रंथ, पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित केले. हिंदी साहित्यक्षेत्रामध्येही त्यांचे योगदान मोठे आहे. आपल्या लेखनासोबतच अग्रवाल यांनी अनेक मासिकांचे ‘संपादक’ म्हणूनसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. कटक येथे झालेल्या ‘भारतीय इतिहास काँग्रेस’ च्या सत्रात ‘प्राचीन भारताचा इतिहास’ विभागाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले (१९४९).

काशी (वाराणसी) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Chandra, Jagdish, Vasudev Saran Agrawal: A bibliographic survey of his published work, IGNCA, New Delhi, 1994.
  • Datta, Amaresh, Encyclopedia of Indian literature, Vol. 1, Sahitya Akademi, New Delhi, 1987.
  • अग्रवाल, वासुदेव शरण, मोतीचन्द्र, चतुर्भाणी : गुप्तकालीन शृंगार हाट, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, २०२०.
  • वात्स्यायन, कपिला, वासुदेव शरण अग्रवाल : रचना – संचयन (हिंदी खंड), साहित्य अकादमी, नवी दिल्ली, २०१५.

                                                                                                                                                               समीक्षक : मंजिरी भालेराव