ढवळीकर, मधुकर केशव : (१६ मे १९३० – २७ मार्च २०१८). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्राचीन भारतीय कलेचे व भारतविद्येचे अभ्यासक. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पाटस या गावी झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पदवी मिळाल्यावर ढवळीकरांनी काही काळ पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या संस्थेत काम केले. त्यानंतर १९५३ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पुणे कार्यालयात प्रशासकीय साहाय्यक पदावर रूजू झाले. या संस्थेत त्यांना बी. के. थापर, बी. बी. लाल, व्ही. डी. कृष्णस्वामी व मधुकर नरहर देशपांडे या विख्यात पुरातत्त्वज्ञांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली व त्यांचा पुरातत्त्वातला रस वाढू लागला. त्यातूनच ढवळीकरांनी पुणे विद्यापीठातून (सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) प्रथम श्रेणीसह एम. ए. पूर्ण केले. प्राध्यापक ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९६४ मध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. डॉक्टरेटसाठी त्यांनी अजिंठा चित्रांच्या सांस्कृतिक अभ्यासाचा विषय निवडला व प्रबंध पूर्ण केला.

ढवळीकरांनी दोन वर्षे नागपूर विद्यापीठात व्याख्याता म्हणून अध्यापन केले. १९६७ मध्ये ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रपाठक या पदावर रूजू झाले व तेथूनच ते प्राध्यापक व संचालक (१९८५-९०) पदावर असताना सेवानिवृत्त झाले. ढवळीकरांना पुरातत्त्वीय उत्खनन व संशोधनाचा विस्तृत व समृद्ध अनुभव होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामध्ये असताना त्यांना केवळ भारतातील विविध उत्खननातच नव्हे, तर भारताबाहेरील (उदा. अलेक्झांडरची राजधानी पेल्ला, ग्रीस) उत्खननातच भाग घेण्याची संधी मिळाली. आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ठिकाणी उत्खनन केले. यांमध्ये महाराष्ट्रातील पवनार, आपेगाव, कंधार, पंढरपूर, इनामगाव, कवठे आणि वाळकी, आसाममधील अंबारी, मध्य प्रदेशातील कायथा, कर्नाटकातील होग्गडेहळ्ळी आणि गुजरातमधील सोमनाथ (प्रभास पाटण) व कुंतासी या प्रमुख पुरातत्त्वीय स्थळांचा समावेश आहे.

ढवळीकरांच्या विद्वत्तेचा प्रभाव प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास आणि पुरातत्त्व यांमधील प्रत्येक क्षेत्रांत दिसतो. प्रारंभी त्यांनी साहित्यिक, अभिलेखीय व कलात्मक स्रोतांचा केवळ कलेच्या दृष्टीने नव्हे, तर प्राचीन समाजातील दैनंदिन जीवन आणि भौतिक संस्कृतीविषयी माहिती मिळवण्यासाठी उत्तम स्रोत म्हणून उपयोग करून घेतला. सांची : ए कल्चरल स्टडी (१९६३) आणि अजिंठा : ए कल्चरल स्टडी (१९७३) या त्यांच्या दोन पुस्तकांमध्ये त्यांच्या कलेच्या इतिहासाकडे पाहण्याचा या विश्लेषणात्मक दृष्टिकोनाची साक्ष पटते. सांची स्तूपाच्या तोरणांवरील व इतर अवशेषांवर आढळलेल्या शिल्पकलेवरून प्रारंभिक ऐतिहासिक काळाच्या भौतिक संस्कृतीमधील विविध बाबींबद्दल, उदा. वेशभूषा, दागिने, वैयक्तिक व घरगुती वापराच्या वस्तू, शस्त्रे व वाद्ये, इत्यादींचे त्यांनी उत्कृष्ट विवेचन केले. कलेच्या इतिहासावरील त्यांची मास्टरपिसेस ऑफ इंडियन टेराकोटाज (१९७७), मास्टरपिसेस ऑफ राष्ट्रकूट आर्ट (१९८३), लेट हीनयान केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया (१९८४), एलोरा (२००३), आणि कल्चरल हेरिटेज  ऑफ मुंबई (२०१६) ही त्यांची इतर महत्त्वाची पुस्तके आहेत.

भारतीय संस्कृतीमधील देव या संकल्पनेकडे व उत्पत्तीकडे बघण्याचा वेगळा असा उत्क्रांतीवादी दृष्टीकोन ढवळीकरांनी स्वीकारला. गणेशा : द गॉड ऑफ एशिया (२०१६) हे पुस्तक त्यांच्या प्रक्रियावादी दृष्टीकोनाचे (Processual approach) उत्तम उदाहरण आहे. लिखित आणि पुरातत्त्वीय अशा दोन्ही स्रोतांना वापरून त्यांनी खातरीशीरपणे असे मत मांडले की, गणेशाची कथा प्राचीन गांधार भागातील एक पवित्र प्राणी यापासून सुरू झाली आणि नंतर त्याचा आशिया खंडात सर्वत्र पसरलेल्या ख्यातनाम दैवतात विकास झाला.

ढवळीकर यांनी प्राचीन भारतीय कला आणि वास्तुकला, नाणकशास्त्र आणि पक्वमृदेच्या (टेराकोटा) कलात्मक वस्तू यांच्यावरही विपुल लेखन केले. तथापि भारतीय पुरातत्त्वातील त्यांचे सर्वांत मोठे योगदान ताम्रपाषाणयुगीन आद्य कृषी संस्कृतीचे संशोधन हे आहे. १९७० ते १९८० या दशकांच्या मध्यापर्यंत ताम्रपाषाणयुगीन संशोधन हे प्रामुख्याने प्रादेशिक स्तरावरील भौतिक सांस्कृतिक अवशेषांचे वर्णन त्या पातळीवरच मर्यादित होते. तथापि त्या काळात नव्याने पुढे आलेल्या नवपुरातत्त्वातील प्रक्रियावादी विचारसरणीचा अंगीकार करून पुरातत्त्वीय अवशेषांच्या विश्लेषणात ढवळीकरांनी पर्यावरणीय, सामाजिक-आर्थिक आणि मानवशास्त्रीय दृष्टिकोनांचा समावेश केला. आर्किऑलॉजी ऑफ वेस्टर्न इंडिया (१९७५) फर्स्ट फार्मर्स ऑफ द डेक्कन (१९८८) आणि सोशल अँड इकॅानॉमिक आर्किऑलॉजी इन इंडिया (२०१४) ही त्यांची पुस्तके या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत.

महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या जीवनासंबंधी सिद्धांतकल्पना मांडून त्यांची पुराव्यांच्या आधारे चिकित्सक तपासणी करण्यासाठी त्यांनी इनामगाव, कवठे आणि वाळकी या स्थळांचे उत्खनन केले व त्यांचे अहवाल प्रसिद्ध केले. त्यांनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील जीवनशैलीचे अन्वेषण करण्यासाठी विविध वैज्ञानिक साधनांचा अतिशय कुशलतेने वापर केला. विशेषतः हवाई छायाचित्रणामुळे त्यांना इनामगाव येथे इ. स. पू. १२०० ते १००० या काळात कालवा खोदल्याचा पुरावा मिळाला, तसेच वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या अभ्यासातून इनामगाव येथे उत्तर जोर्वे कालखंडात पर्यावरणाचा व पर्यायाने संस्कृतीचा ऱ्हास झाला असल्याचा निष्कर्ष काढता आला. आद्य शेतकऱ्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल निष्कर्ष काढताना त्यांनी सुचवलेल्या काही कल्पना सर्वांना मान्य झाल्या नाहीत हे खरे; परंतु असा बहुविद्याशाखीय (भूविज्ञान, प्राणिविज्ञान व वनस्पतिविज्ञान)अभ्यास करणे हेच भारतीय पुरातत्त्वात त्या वेळी नाविन्यपूर्ण होते.

हडप्पा संस्कृतीचा अभ्यास हा ढवळीकरांच्या कार्याचा आणखी एक पैलू. कुंतासी येथे तसेच गुजरातमधील अन्य स्थळांवर केलेल्या उत्खननावर आधारित निरिक्षणांवर त्यांनी हडप्पा संस्कृती ही व्यापारी संस्कृती होती, असे मत मांडले. त्यांच्या मते, गुजरातमधील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांचा उद्देश पश्चिम आशियामध्ये हस्तिदंत आणि अर्ध-मौल्यवान दगडांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणे हा होता. इतकेच नाही तर त्यांनी याला सांस्कृतिक साम्राज्यवाद (Cultural imperialism) असे संबोधले. तथाकथित आर्य संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील संबंधांबद्दल सर्वांना मान्य होण्याजोगे नसले तरी त्यांचे स्वतःचे एक ठाम मत होते. द आर्यन्स : मिथ आणि अँड आर्किऑलॉजी (२००७) या पुस्तकात त्यांनी उत्तर हडप्पा या सांस्कृतिक कालखंडाचे व आर्य संस्कृतीचे साम्य आहे, असे प्रतिपादन केले.

मानव-पर्यावरण यांच्यातील संबंधांबद्दल ढवळीकरांना कुतुहल होते व त्यातूनच त्यांनी या विषयात अतिशय महत्त्वाच्या सिद्धांतकल्पना मांडल्या. मॅन अँड इन्व्हायरन्मंट इन प्रिहिस्टरी (१९९२) व इन्व्हायरन्मंट अँड कल्चर, अ हिस्टारिकल पर्सेक्टिव्ह (२००२) या पुस्तकांमध्ये त्यांनी आपली प्राचीन पर्यावरणासंबंधीची अभ्यासपूर्ण मते मांडली. नाईल नदीच्या पूराची पातळी आणि हवामानातील चढउतार यांच्या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी असे प्रतिपादन केले की, भरपूर पाऊस पडत असे तेव्हा संस्कृतींची भरभराट झाली व पाऊस कमी झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी कालखंडात सांस्कृतिक ऱ्हास झाला. हे संशोधन करताना त्यांनी भारतातील मौसमी पाऊस व एल निनो या हवामानातील घटकाचा सहसंबंध असल्याचे मत मांडले. भारतातील पर्यावरण प्रतिकूल झाल्याने व वारंवार उद्भवलेल्या दुष्कांळामुळे गुप्त साम्राज्याच्या अखेरीस व नंतरच्या काळात नागरी संस्कृतीचा  ऱ्हास (Urban decay) झाला, असे त्यांचे मत होते. या विषयातील त्यांची काही विधाने धाडसी वाटत असली तरी त्यांच्या सिद्धांतकल्पना या विषयाला चालना देणाऱ्या ठरल्या.

ढवळीकर यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये सहभाग घेतला व शोधनिबंध सादर केले. ते क्युबामधील हवाना विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक होते (१९८४). त्यांनी भारतीय सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात पुरातत्त्व-मानवशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवले (१९८४). तसेच मुंबईतील एशियाटिक सोसायटी येथे कुमारस्वामी स्मृती व्याख्यानमालेत (१९८५), तसेच सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये फादर हेरास स्मृती व्याख्यानमालेत (१९९६) व्याख्याने दिली. ते दोन दशकांहून अधिक काळ इंडियन हिस्ट्री काँग्रेसशी संलग्न होते. १९९९ मध्ये कालिकत येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.

विद्यापीठातील संशोधनातून मिळणारे आपल्या संस्कृतीचे ज्ञान फक्त चर्चासत्रे व परिषदांपुरते सीमित राहू नये आणि ते प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध असावे, यावर ढवळीकरांचा कटाक्ष होता. त्यांनी मराठीत अनेक लेख लिहिले व पुण्याच्या टिळक महाराष्ट्रात विद्यापीठात दोन दशके मराठीतून भारतविद्येचे अध्यापन केले. प्राचीन भारतीय नाणकशास्त्र (१९७५) व पुरातत्त्वविद्या (१९८१) ही त्यांची दोन क्रमिक पुस्तके आणि कोणे एके काळी सिंधू संस्कृतीमहाराष्ट्राची कुळकथा ही त्यांची मराठी वाचकांसाठी अनमोल देणगी आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ढवळीकरांना पंतप्रधानांच्या सुवर्णपदकाने गौरवण्यात आले (२०११). तसेच त्याच वर्षी भारतीय पुरातत्त्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. २०११ ते २०१३ या काळात त्यांना भारत सरकारची प्रतिष्ठित टागोर मेमोरियल नॅशनल फेलोशिप मिळाली. आपल्या कारकिर्दीत ढवळीकरांनी २७ पुस्तके आणि शंभरहून अधिक शोधनिबंध भारतीय व विदेशी नियतकालिकांत प्रकाशित केले.

पुणे येथील भांडारकर ओरिएंटल रिचर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते विश्वस्त होते (१९८७-२०१३). तसेच वीस वर्षे त्यांनी अध्यक्ष या नात्याने बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेची धुरा वाहिली (१९९८-२०१८).

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Joglekar, P. P. ‘Obituary : ‘M.K. Dhavalikarʼ, Itihas 4 (1) : 129-133. [in Hindi], 2018.
  • Paddayya, K. ‘Madhukar Keshav  Dhavalikar (1930-2018)ʼ, Bulletin of the Deccan College  Post-Graduate and  Research Institute, 78 : 189-194, 2018.
  • Paddayya, K. Review of Cultural Imperialism : Indus Civilization in Western India by M.K. Dhavalikar, Man and Environment XX(1): 131-132, 1995.
  • Rajaguru, S. N. ‘Obituary : M.K. Dhavalikarʼ, Man and Environment, XLIII (1) : 119-120, 2018.

                                                                                                                                                                                     समीक्षक : शरद राजगुरू