मूर्ती, मल्लाडी लीला कृष्ण : ( ? १९४१ — २ जून २०१६ ). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वासाठी महत्त्वाचे योगदान. ‘एम. एल. के. मूर्ती’ आणि ’एमएलके’ या टोपणनावांनीही परिचित. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात समुद्रकिनार्‍याजवळ असलेले बापटला हे त्यांचे मूळ गाव. कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी पारंपरिक असूनही त्यांचा संशोधनातील दृष्टीकोन आधुनिक होता.

आपल्या गावी प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर ते बडोदा येथे महाराज सयाजीराव विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. येथे बी. सुब्बाराव (१९२१—१९६२) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पुरातत्त्वीय कारकिर्द सुरू झाली. तथापि सुब्बाराव यांच्या अकाली मृत्यूनंतर एमएलके डेक्कन कॉलेजमध्ये गेले आणि ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवीसाठी प्रवेश घेतला (१९६२). त्यांनी १९६६ मध्ये पीएच. डी. पदवी संपादन केली. ’स्टोन एज कल्चर्स ऑफ चित्तूर’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्याच्या सर्वेक्षणातून त्यांच्या पुरातत्त्वीय संशोधन कार्याचा प्रारंभ झाला. या संशोधनामुळे त्या प्रदेशातील पाषाणयुगातील संस्कृतींची सर्वांगीण माहिती मिळाली. विशेषतः रल्लाकलवा खोर्‍यात मिळालेल्या विविध पाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळांमुळे उत्तर पुराश्मयुगाची (Upper Palaeolithic) पुरातत्त्वीय ओळख निश्चित करण्याच्या कामात महत्त्वाची मदत झाली. तेथे मिळालेली धारदार पाती आणि वेधण्या या अवजारांमुळे (Blades and burins) संपूर्ण भारतात उत्तर पुराश्मयुगीन संस्कृतीचा पुढील शोध घेण्यासाठी चालना मिळाली. पुढे त्यामुळे भारतीय पुराश्मयुगात उत्तर पुराश्मयुग होते किंवा नाही या चर्चेला विराम मिळाला.

मूर्ती यांची डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून नेमणूक झाली (१९६६). त्यानंतर पुढे त्यांची व्याख्याता या पदावर निवड झाली (१९७०). तेथे अठरा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील तेलुगू विद्यापीठाच्या श्रीशैलम कॅम्पसमध्ये प्राध्यापक म्हणून पद स्वीकारले (१९८८). परंतु लवकरच त्यांची हैदराबाद विद्यापीठातील प्रादेशिक अभ्यास केंद्रात प्राध्यापक पदावर निवड झाली. तेथून ते निवृत्त झाले (२००३). याच काळात ते हैदराबाद विद्यापीठाच्या लोकसंस्कृती केंद्राचे मानद संचालकही होते.

मूर्ती यांचे आंध्र प्रदेशच्या कर्नूल भागातील संशोधन हा भारतीय पुराश्मयुगाच्या संदर्भात एक लक्षणीय टप्पा आहे. त्यांनी वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठातील थिम्मा रेड्डी यांच्या सहकार्याने बेटमचेर्ला भागात सर्वेक्षण केले (१९७०). या सर्वेक्षणात त्यांना बिल्लासुरगम या गुहांमध्ये धारदार पात्यांची अवजारे सापडली. त्यांनी बेटमचेर्ला गुहेजवळ असलेल्या मुच्चतला चिंतामनुगावी या गुहेचे सर्वेक्षण व उत्खनन केले. तेथे त्यांना उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुगीन दगडी अवजारांचे व जीवाश्मांचे पुरावे सापडले. मूर्ती यांनी तप्तदीपन कालमापन पद्धतीचा वापर करून मिळवलेला उत्तर पुराश्मयुगाचा (आजपूर्व १७३९०) व मध्याश्मयुगाचा (आजपूर्व १०००० ते ७०००) हा कालक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.

पुराश्मयुगातील मानवांची संस्कृती आणि त्यांनी बदलत्या परिस्थितीत अनुकूलन कसे केले, हे प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने त्यासाठी सध्याच्या आदिवासींच्या आणि विविध भटक्या जमातींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, हे मूर्ती यांनी ओळखले होते. त्याला अनुसरून त्यांनी लोकजीवनशास्त्रीय संशोधनाला प्रारंभ केला आणि वर्ल्ड आर्किऑलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात दोन शोधनिबंध प्रकाशित केले (१९८१; १९८५). तसेच त्यांनी आंध्र प्रदेशातील शिकार व अन्न गोळा  करून जगणार्‍या यनाडी, चेंचू, येरुकुला, जरकुला आणि बोया या आदिवासींच्या दैनंदिन जीवनाची आणि उदरनिर्वाहाच्या विविध पद्धतींची तपशीलवार निरीक्षणे नोंदविली. एकाच भागात राहणार्‍या परंतु गावात राहून शेती करणर्‍या आणि रानांमध्ये शिकार करून व अन्न गोळा करून जगणार्‍या (यनाडी आणि बोया) लोकसमूहांमध्ये परस्पर सहकार्याचे संबंध असतात, हे त्यांचे निरीक्षण लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वीय निष्कर्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

विविध पद्धतीने जगणार्‍या लोकसमूहांमध्ये संबंध आल्यानंतर त्यांच्या संस्कृतींमध्ये फरक पडत जातात, हे लोकजीवनशास्त्रीय अभ्यासातून दिसल्यानंतर मूर्ती समसंस्कृतीकरण (aculturation) या संकल्पनेकडे वळणे स्वाभाविकच होते. त्यामुळेच मूर्ती यांनी आपल्या संशोधन पद्धतीची व्याप्ती वाढवून मौखिक इतिहास, लोकसाहित्य आणि स्थानिक परंपरा आणि कला यांच्यावर लक्ष केंद्रित केले. या संदर्भात मूर्ती यांचे गुंथर सोंथायमर (१९३४—१९९२) या लोकसंस्कृतीच्या जर्मन अभ्यासकांच्या सहकार्याने कुरूबा या पशुपालक जमातीवर केलेले संशोधन लक्षणीय मानले जाते. अशा प्रकारच्या पशुपालकांचा स्थिर राहून शेती करणार्‍या लोकांशी संबंध आल्यामुळे त्यांच्यात हळूहळू सांस्कृतिक बदल होत जातात, या निरीक्षणाचा उपयोग मूर्ती यांनी मुच्चतला चिंतामनुगावी येथे आढळलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या हाडांचा अन्वयार्थ लावताना केला. या संशोधनाची व्याप्ती वाढवून मूर्ती यांनी आंध्र प्रदेशात रानावनांमध्ये राहणार्‍या जमाती हिंदू समाजचौकटीत हळूहळू कशा सामील होत गेल्या, याचे उत्कृष्ट प्रतिपादन त्यांच्या १९९४ मधील शोधनिबंधात केलेले दिसते. या कामात त्यांनी तेलंगण व आंध्र प्रदेशातील जाती-जमातींच्या मौखिक इतिहासाप्रमाणेच स्थानिक तेलुगू साहित्य परंपरा आणि लोककथांचा उपयोग केला होता.

सेवानिवृत्त झाल्यानंतरही मूर्ती संशोधनात व अभ्यासात सक्रिय होते. त्यांनी इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वार्टनरी स्टडीज या संस्थेसाठी विविध प्रकारे योगदान दिले. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या पहिल्या ‘टागोर नॅशनल फेलोशिप’चे ते मानकरी होते (२०१२). पुरातत्त्वशास्त्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आर. के. शर्मा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले (२०१५). तसेच नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे ते सदस्य होते.

हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Murty, M. L. K. ‘The Stone Age Cultures of Chittoor’, Ph.D. Thesis, University of Pune, 1966.
  • Murty, M. L. K. ‘Ethnoarchaeology of the Kurnool cave areas, South India’, World Archaeology, 17(2) : 192-205, 1985.
  • Murty, M. L. K. & Reddy,  K. Thimma, ‘The Significance of Lithic Finds in the Cave Areas of Kurnool, India’,  Asian Perspectives, 18 (2) : 214-226, 1975.
  • Paddayya, K. ‘M. L. K. Murty and His Place in Indian Prehistory’, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, 77 : 33-54, 2017.

                                                                                                                                                                                            समीक्षक : सुषमा देव