ऑनलाइन संप्रेषण सेवा. इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन करण्यात येणाऱ्या गप्पांचा संप्रेषणाचा प्रकार. ऑनलाइन चॅट मजकूराच्या स्वरूपात वास्तविक वेळेतच पुढे पाठविण्यात येताे तसे तर ऑनलाइन चॅट या संक्षिप्त असतात, जेणेकरून गप्पांमधील सहभाग्यांना त्वरीत प्रतिसाद देता येईल. यामुळे आपण प्रत्यक्षातच संभाषण करीत आहोत याप्रकारची (अशी) भावना निर्माण होते. इंटरनेट फोरम आणि ई-मेल या मजकूर आधारित ऑनलाइन संप्रेषणाच्या पद्धतीपेक्षा ऑनलाइन चॅट या वेगळ्या असतात. ऑनलाइन चॅट एकास-एक (पॉइंट-टू-पॉइंट; Point-to-Point) तसेच एकास-अनेक असे संभाषण असू शकते. यामध्ये मजकूरासोबतच दृक-श्राव्य गप्पा आणि वेबिनार सारख्या महाजालकावर होणाऱ्या परिषदा यांसारख्या सेवांचाही अंतर्भाव आहे. सौम्य भाषेत सांगायचे झालेच तर ऑनलाइन चॅट म्हणजे इंस्टंट मॅसेंजर (Instant Messenger), इंटरनेट रिले चॅट (Internet Relay Chat; IRC), टॉकर्स (Talkers) आणि एमयुडी (MUD) व इतर ऑनलाइन गेम (Online Games) यांसारख्या साधनांचा वापर करून थेट मजकूर आधारित किंवा दृक-आधारित एकास-एक गप्पा अथवा एकास-अनेकांस गप्पा असे म्हणता येईल.
ऑनलाइन चॅट हा शब्द चॅट (Chat) या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘अनौपचारिक संभाषण’ असा होतो. ऑनलाइन चॅटमध्ये संप्रेषणास अनुमती देणाऱ्या वेब आधारित अनुप्रयोगाचा समावेश असतो. बहुतेकदा ते अनुप्रयोग थेट संबोधले असतात परंतु बहुवापरकर्त्यांच्या वातावरणात वापरकर्त्यांमध्ये ते निनावी असतात. वेब कॉन्फरन्सिंग (महाजालक परिषदा; Online Conferencing) ही एक ऑनलाइन सेवा आहे. ती बहुतेकदा सेवा म्हणून विकली जाते आणि वेब सर्व्हरवर ठेवण्यात (उपलब्ध करण्यात) येते आणि विक्रेत्यांकडून नियंत्रित करण्यात येते.
इतिहास : इलिनॉय विद्यापीठाच्या प्लॅटो सिस्टमवर 1973 साली डग ब्राउन आणि डेव्हिड आर. वूले यांनी सर्वप्रथम ऑनलाइन चॅट सिस्टम – टॉकोमॅटिक (Talkomatic)– तयार केले. यात असंख्य वाहिन्या होत्या आणि प्रत्येक वाहिनीत जास्तीत जास्त पाच लोकांना समाविष्ट करता येत होते. यामध्ये प्रत्येकांच्या पटालावर टंकलिखित केलेला प्रत्येक वर्ण संदेशाच्या स्वरूपात दिसत होता. 1980 च्या मध्यांत प्लॅटो वापरकर्त्यांमध्ये टॉकोमॅटिक खूप लोकप्रिय होते. 2014 मध्ये ब्राउन आणि वुले यांनी वेब आधारित टॉकोमॅटिक यांची नवीन आवृत्ती प्रकाशित केली.
द सोर्स या पहिल्या ऑनलाइन सेवेकरिता 1979 मध्ये डायकॉम इनकॉ.च्या टॉम वॉकर आणि फ्रीत्झ टाणे यांनी ‘चॅट’ ही आज्ञा तयार केली. 1980 च्या दशकात इतर चॅट करणारे व्यासपीठ प्रकाशझोतात आले. त्यातील ग्राफिकल युझर इंटरफेस सह असणारे ब्रॉडकास्ट (BroadCast). मॅकिन्टोशची विस्तारित आवृत्ती अमेरिकेच्या आणि जर्मनीच्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लोकप्रिय झाली. फेब्रुवारी 1989 मध्ये पहिले इंटरनेट चॅट अटलांटिक महासागराच्या पलीकडे म्हणजेच ऊलू, फिलंड आणि कॉर्नव्हॉलिस, ऑरेगॉन यांदरम्यान झाले. 1980 मध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रित्या उपलब्ध असणारी कॉम्प्युसर्व्ह सीबी सिम्युलेटर ही पहिली समर्पित ऑनलाइन चॅट सेवा होती. तिला कॉम्प्युसर्व्हचे अधिकारी असणारे ॲलेक्झांडर ‘सँडी’ ट्रेव्होर यांनी कोलंबस, ओहियो येथे तयार केले. 1970 मध्ये वापरले जाणारे युनिक्सचे ‘टॉक’ यांसारखे नेटवर्क चॅट सॉफ्टवेअर समाविष्ट करून वापरले गेले.
ऑनलाइन चॅट सॉफ्टवेअर : साधारणपणे प्रचलित ऑनलाइन चॅट सॉफ्टवेअरची नावे पुढीलप्रमाणे : ॲपल मॅसेज (Apple Messages), ब्रॉडकास्ट (BroadCast), गुगल टॉक (Google Talk), इंटरनेट रिले चॅट (Internet Relay Chat; IRC), स्काइप (Skype), टॉक (Talk), वीचॅट (WeChat), वॉट्सॲप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), गुगल+हँगआउट (Google+ Hangouts), इबडी (eBuddy), फेसबुक (Facebook), जीमेल (Gmail) इत्यादी.
कळीचे शब्द : #communication #संप्रेषण #ऑनलाइन #चॅट
संदर्भ :
समीक्षक : विजयकुमार नायक