पुरातत्त्वशास्त्रात मानवी इतिहास हा स्थूलमानाने तीन कालखंडांत विभागला गेला आहे. या काळात मानवाला लेखनकला अवगत नव्हती. त्यामुळे पुरातत्त्वीय अवशेष हे प्रामुख्याने दगडी हत्यारांच्या रूपात मिळतात. या कालखंडाला अश्मयुग असे संबोधले आहे. अश्मयुगीन मानवाने मुख्यतः दगडी हत्यारे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रावर आधारित विकसित केली आणि या आधारावर अश्मयुगाची विभागणी पुराश्मयुग (Palaeolithic), मध्याश्मयुग (Mesolithic) आणि नवाश्मयुग (Neolithic) या तीन संस्कृतींमध्ये केली आहे. यातील पुराश्मयुग हे आद्य (Lower Palaeolithic), मध्य (Middle Palaeolithic) आणि उत्तर पुराश्मयुगात या तीन कालखंडांत विभागले आहे. प्रत्येक कालखंडात दगडी हत्यारे बनविण्याच्या तंत्रपद्धती आणि हत्यारांचे प्रकार भिन्न आहेत.

पूर्व आफ्रिकेतील इथिओपियातील अफार त्रिकोणीय प्रदेश, टांझानियातील ओल्डोवाय गॉर्जमध्ये (घळई) आणि दक्षिण अफ्रिकेतील अनेक अतिप्राचीन गुहांमध्ये मानवी उत्क्रांती दर्शविणारे विविध पुरामानवाचे अश्मीभूत सांगाडे /अवशेष आणि आद्यपुराश्मयुगीन दगडी हत्यारे मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. यामुळे आफ्रिका खंड हे मानवाची उत्क्रांती आणि अश्मयुगीन संस्कृतीचे उगमस्थान आहे, असे मानले जाते.

आफ्रिका खंडात आद्य-पुराश्मयुगात, आदिमानवाने दगडी हत्यारे बनविण्यासाठी दोन पद्धतींचा अवलंब केलेला आढळून येतो. यातील सर्वांत प्राचीन पद्धतीमध्ये प्रामुख्याने गोटा परंपरेतील दगडी हत्यारे बनविण्याचे तंत्र विकसित केले गेले. या पद्धतीला ओल्डॊवान परंपरा (Oldowan Tradition) असे संबोधण्यात येते. या परंपरेची सुरुवात साधारणतः २६ लाख वर्षांपूर्वी झाली होती. इथिओपियातील अफार त्रिकोणीय प्रदेशातील खचदरीत (African Rift Valley) गोना (Gona) आणि लेडी गेरारू (Lady Geraru) येथे आजमितीला जगातील सर्वांत जुनी म्हणजेच २५ ते २६ लाख वर्षांर्पूर्वीची ओल्डॊवान परंपरेची दगडी हत्यारे मिळालेली आहेत. या शिवाय हत्यारांबरोबर आर्डीपिथेकस आणि होमो इरेक्टसचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. ओल्डॊवान परंपरेची हत्यारे होमो हॅबिलिस या मानवाने तयार केली होती.

जॉर्जिया (यूरेशिया) मधील दमानिसी (Dmanisi) येथील उत्खननात मिळालेल्या पुरामानवाच्या अश्मीभूत कवट्या आणि त्यासोबत दगडी हत्यारांचे कालमापन १८ लाख वर्षपूर्व आहे. ही दगडी हत्यारे ओल्डॊवान किंवा त्या आधीची असावीत. या नवीन संशोधनावरून असे दिसते की, आफ्रिकेत होमो इरेक्ट्स प्रजाती अस्तित्वात येण्यापूर्वी पुरामानवाने यूरेशियात पाऊल ठेवले होते.

कालानुक्रमे १७ लाख वर्षांपूर्वी दुसरे तंत्र विकसित झाले. छिलका हत्यारांचा समावेश असलेल्या या परंपरेला ॲश्युलियन संबोधले जाते. ॲश्युलियन संस्कृतीमध्ये (लार्ज फ्लेक ॲश्युलियन) १० सेंमी. पेक्षा मोठ्या छिलक्यांपासून हत्यारे तयार करत असत. ही पद्धत ओल्डॊवान परंपरेपेक्षा वेगळी आहे. मोठे छिलके हे मोठ्या दगडापासून तोडून वेगळे करत असत. दगडी हत्यारे मोठ्या आकाराच्या छिलक्यापासून अथवा गोट्यापासून अथवा छिलके काढलेल्या मोठ्या गाभ्यापासून बनविली जात. सुरुवातीच्या काळातील हत्यारे अगदी ओबडधोबड आणि वेड्यावाकड्या आकाराची आढळून येतात. कालांतराने पुरामानव उत्कृष्ट धारदार हत्यारे बनवू लागला. हत्यारे बनविताना मोठे व खोलगट छिलके अथवा चिपा काढण्याऐवजी लहान व पातळ चिपा काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे हत्यारे ओबडधोबड न होता सुबक, प्रमाणबद्ध व धारदार कडा असलेली होऊ लागली. मोठ्या छिलक्यांपासून बनवलेल्या हत्यारांमध्ये हातकुऱ्हाड (Handaxe), फरशी (Cleaver), तोडहत्यारे (Chopper), तासण्या (Scraper) इत्यादींचा समावेश होतो.

आद्य-पुराश्मयुगीन ॲश्युलिअन संस्कृतीचा विस्तार हा आफ्रिका, यूरोप आणि आशिया खंडात झालेला होता. इतर खंडांमध्ये आपल्याला ॲश्युलिअन संस्कृतीचे अवशेष आढळून येत नाहीत. अश्युलिअन परंपरेची हत्यारे मोठ्या प्रमाणात होमो इरेक्टसने बनविली. आफ्रिका खंडात केनियातील कोकिसेली (Kokiselei), टांझानियातील ओल्डोवाय गॉर्ज आणि इथिओपियातील गोना व कॉन्सो  (Konso) येथे मिळालेली अश्युलिअन परंपरेची हत्यारे १७ लाख वर्षांपूर्वीची आहेत.

यूरोप खंडात स्पेनमधील सोलाना डेल झाम्बोरीनो (Solana del Zamborino) व एस्टरेको डेल क्वीपार  (Estrecho del Quipar) या दोन गुहांमध्ये ९ लाख वर्षपूर्व काळातील ॲश्युलिअन परंपरेची दगडी हत्यारे मिळाली आहेत.

आशिया खंडात ॲश्युलियन संस्कृतीच्या पाऊलखुणा भारतातील अतिरमपक्कम (तमिळनाडू) येथे १५ लाख वर्षांपासून अस्तित्वात आहेत, तर कर्नाटकातील इसामपूर येथे १२ लाख वर्षेपूर्व काळात त्या दिसतात. महाराष्ट्रात गोदावरीच्या खोऱ्यामध्ये चिरकी ऑन प्रवरा आणि लक्ष्मी नाला, नेवासा ही स्थळे साधारणपणे ८-१० लाख वर्षे (आद्य प्लाइस्टोसीन) जुनी आहेत आणि भीमा खोऱ्यात मोरगाव आणि बोरी ही स्थळे ८ लाख वर्षांपूर्वीची आहेत. चीनमध्ये ॲश्युलियन परंपरेची दगडी हत्यारे ८ ते ९ लाख वर्षपूर्व या काळातील आहेत.

ॲश्युलिअन संस्कृती ही १७ लाख वर्षपूर्व ते सव्वा लाख वर्षांपर्यत अस्तिवात होती. ही संस्कृती अस्तिवात असतानाच साधरणपणे साडेतीन लाख वर्षांपूर्वी मध्य पुराश्मयुगीन परंपरेची दगडी हत्यारे असणारी संस्कृतीची सुरुवात झाली.

संदर्भ :

  • Diez-Martín, F.; Sánchez Yustos, P.; Uribelarrea, D. & others ‘The Origin of The Acheulean: The 1.7 Million-Year-Old Site of FLK West, Olduvai Gorge (Tanzania)ʼ, Scientific Reports 5, 17839, https://doi.org/10.1038/srep17839, 2016.
  • Pappu, Shanti; Gunnell, Yanni; Kumar, Akhilesh; Braucher, Régis; Taieb, Maurice;  Demory, François & Thouveny, Nicolas, ‘Early Pleistocene Presence of Acheulian Hominins in South Indiaʼ, Science, 331: 1596-1600, 2011.

                                                                                                                                                                                     समीक्षक : शरद राजगुरू