केरळमधील प्रसिद्ध डच जहाज. केरळमधील हौशी सागरी संशोधक रॉबर्ट पणिपिल्ला यांना व त्यांच्या बरोबरच्या दोन स्थानिक मच्छीमारांना अनच्युथेंगू (Anchuthengu) या ब्रिटिश किल्ल्याजवळ समुद्रात एका जहाजाचे अवशेष आढळले (२०१५). सन १६९६ मध्ये बांधलेला हा किल्ला इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचे केरळमधील महत्त्वाचे ठाणे होते. या परिसरात डच ईस्ट इंडिया कंपनी व स्थानिक राजवट यांच्यात संघर्षही झाला होता (१७४१).

विमेनम जहाजाचे अवशेष, अनच्युथेंगू, केरळ.

जहाजाचे अवशेष हे किल्ल्यापासून सुमारे दहा किमी. अंतरावर ४३ मी. खोलीवर आहेत. पाण्याखाली घेतलेल्या छायाचित्रांवरून हे जहाज उभ्या अवस्थेत आहे, असे दिसते. डच कागदपत्रांत १७५२ मध्ये ॲमस्टरडॅम येथे बांधलेल्या विमेनम या जहाजाचा उल्लेख आहे. हे ‘डच ईस्ट इंडियामनʼ बांधणीचे, ११५० टन वजनाचे, तीन शिडांचे मालवाहू जहाज ४२.२५ मी. लांब होते व त्याचा कप्तान योहान लुई फिलिप्पी हा होता. विमेनम १७५३ मध्ये डच ईस्ट इंडिजची राजधानी बटाव्हिया (इंडोनेशिया) येथे पोहोचले. दी फ्रेड (De Vrede) आणि जाकार्ता या दोन जहाजांसह १७५४ मध्ये ते माल घेऊन ते सुरतकडे निघाले. त्यावर ‘आंग्रे चाच्यांनीʼ हल्ला केला. त्या वेळी विमेनमवर ३५० जण होते व त्यात एक गुलाम स्त्रीदेखील होती. कप्तानाने स्वतः जहाज उडवून दिल्याचा व कोणीही न वाचल्याचा उल्लेख आहे. प्राथमिक अभ्यासावरून अनच्युथेंगू येथे मिळालेले जहाज विमेनम असावे, असे दिसते; तथापि त्याचे सखोल पुरातत्त्वीय संशोधन होणे बाकी आहे.

संदर्भ :

  • Panippilla, Robert, Kadalarivukalum Neranubhavangalum, Thiruvananthapuram, 2015.
  • Rajwi, Tiki, ‘200-year-old Dutch Ship Wreck Discovered Off Anchuthengu Fort in Keralaʼ, The New Indian Express, 4 July 2015.
  • https://www.newindianexpress.com/cities/thiruvananthapuram/2015/jul/04/200-year-old-Dutch-Ship-Wreck-Discovered-Off-Anchuthengu-Fort-in-Kerala-778980.html

                                                                                                                                                                                     समीक्षक : भास्कर देवतारे