­शरीराच्या अंतर्भागाची शुद्धी करण्यासाठी जे उपाय केले जातात, त्यांना शुद्धिक्रिया असे म्हणतात. शुद्धिक्रियांना हठयोगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. घेरण्डसंहितेमध्ये धौती, बस्ती, नेती, लौलिकी (नौली), त्राटक आणि कपालभाती हे शुद्धिक्रियांचे सहा प्रकार दिले आहेत (धौतिर्बस्तिस्तथा नेति लौलिकी त्राटकंतथा | कपालभातिश्चैतानि षट्कर्माणिसमाचरेत् ||, घेरण्डसंहिता १.१२).

(१) धौती  : ‘धौती’चा शब्दश: अर्थ धुणे. पचन मार्गाची शुद्धी करण्यासाठी धौतीचा उपयोग होतो. धौतीचे अंतर्धौती (वातसार, वारिसार, वह्निसार/अग्निसार, बहिष्कृत), दंतधौती (दंतमूल, जिह्वामूल, कर्णरंध्र,कपालरंध्र), हृद्धौती (दंड, वमन, वस्त्र) आणि मूलशोधन हे चार प्रकार आहेत (घेरण्डसंहिता १.१३-१४). यांपैकी वारिसार (शंखप्रक्षालन), वह्निसार, दंड, वमन व वस्त्रधौती हे प्रकार सर्वसाधारणपणे प्रचलित आहेत. धौतिक्रिया साधारणपणे सकाळी रिकाम्या पोटी केली जाते.

(अ) अंतर्धौती  : वातसार — यामध्ये मुखाला कावळ्याच्या चोचीप्रमाणे आकार देऊन हळूहळू वायूचे प्राशन केले जाते, उदराची हालचाल केली जाते आणि मुखाने वायू बाहेर काढला जातो. वातसारामुळे शरीर निर्मल होते, सर्व रोग नष्ट होतात आणि जठराग्नी प्रदीप्त होतो (घेरण्डसंहिता १.१५-१६). ही क्रिया कोणत्याही ध्यानासनात बसून करता येते; परंतु उभे राहून ही क्रिया करू नये. हृदयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी ही क्रिया करू नये.

वारिसार / शंखप्रक्षालन – या क्रियेत पाण्याचे आकंठ प्राशन केले जाते. नंतर उदराची हालचाल केली जाते आणि शौचाद्वारे त्याचे रेचन केले जाते. यामध्ये सर्व पचनमार्गाची शुद्धी होते (घेरण्डसंहिता १.१७-१८). या क्रियेमध्ये ठराविक मात्रेत पाणी पिऊन विशिष्ट आसने केली जातात. जेव्हा प्यायलेले पाणी जसेच्या तसे बाहेर येते तेव्हा ही क्रिया थांबविली जाते. मात्र या क्रियेनंतर आठ दिवस योग्य पथ्य व जीवनशैली पाळणे गरजेचे असते. या क्रियेमुळे  शरीरात हलकेपणा येतो. पचनाच्या तक्रारीवर मधुमेहासाठीही या क्रियेचा फायदा होतो.

वह्निसार – या क्रियेमध्ये विशिष्ट प्रकारे उभे राहून श्वास सोडून नाभी मेरुदंडापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे उदर आत ओढावे. साधकाने या क्रियेची शक्य होईल तितक्या वेळा स्वत:च्या क्षमतेनुसार पुनरावृत्ती करावी. या क्रियेमुळे जठराग्नीचे कार्य सुधारून पोटाला मर्दन होते व उदरपटलाची कार्यक्षमताही सुधारते (घेरण्डसंहिता १.१९-२०).

बहिष्कृत – या क्रियेला प्रक्षालन धौती अथवा महाधौती  असेही म्हणतात. या क्रियेमध्ये काकीमुद्रा धारण करून उदरामध्ये वायूचे प्राशन करावे. दीड तास वायू उदरात धारण करून तो खालच्या  दिशेने न्यावा. नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून शक्तिनाडी (गुदाशय) बाहेर काढून ती मळ निघून जाईपर्यंत हातांनी स्वच्छ करावी व पुन्हा उदरात ठेवावी. सर्व धौती क्रियांमध्ये ही क्रिया अतिशय कठीण आहे (घेरण्डसंहिता १.२१-२५).

(आ) दंतधौती : यामध्ये हिरड्या, दोन्ही कानांची छिद्रे, जीभ, जिभेचे मूळ व कपालछिद्रे म्हणजे  टाळूची दोन छिद्रे या पाचांची स्वच्छता अंतर्भूत आहे.

दंतमूल – या क्रियेत खैर वृक्षाच्या रसाने वशुद्ध कोरड्या मातीने हिरड्या घासून त्या पूर्ण स्वच्छ होईपर्यंत पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे धारणा व इतर योगाभ्यासास मदत होते. (घेरण्डसंहिता १.२७-२८)

जिह्वामूल – तर्जनी, मध्यमा व अनामिका या तीन बोटांनी जिभेच्या मुळापर्यंतची स्वच्छता करावी. या क्रियेच्या अभ्यासाने कफदोष नाहीसे होतात (घेरण्डसंहिता १.३०).

कर्णरंध्र – या क्रियेमध्ये दोन्ही हातांच्या तर्जनी आणि अनामिका कानाच्या रंध्रांमध्ये घालून गोल फिरवून ती स्वच्छ करावीत. या क्रियेचा नित्य अभ्यास केल्याने शुद्ध नाद ऐकू येतो. (घेरण्डसंहिता १.३३)

कपालरंध्र – या क्रियेमध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याने तोंडातील टाळूचा खोलगट भाग स्वच्छ केला जातो. ही क्रिया दररोज सकाळी उठल्यावर, जेवणानंतर आणि संध्याकाळी केल्यास कफदोष नष्ट होतात, शरीरातील नाड्यांची शुद्धी होते आणि दृष्टी सुधारते (घेरण्डसंहिता १.३४-३५).

(इ) हृद्धौती : दंडधौती – या क्रियेमध्ये केळीचा, हळदीचा किंवा वेताचा कोंब अन्ननलिकेत हळूहळू प्रविष्ट करावा आणि पुन्हा बाहेर काढावा. ही क्रिया केल्याने छातीतील कफ बाहेर पडतो तसेच हृदयरोग नष्ट होण्यास मदत होते. दम्याच्या रोग्यांसाठी ही क्रिया विशेष लाभकारी आहे (घेरण्डसंहिता १.३६-३८). योग्य प्रकारचा कोंब न मिळाल्यास रबरी नळीचाही वापर करता येतो.

वमनधौती – या क्रियेमध्ये जेवण झाल्यावर आकंठ पाणी प्यावे व नंतर दृष्टी वर करून ते पुन्हा ओकून टाकावे. उभे राहून आणि किंचित पुढे वाकून ही क्रिया  करावी. वमन केल्यावर थोडा वेळ शवासन करणे लाभदायक ठरते. या क्रियेच्या नियमित अभ्यासाने कफ आणि पित्ताचे निवारण होते (घेरण्डसंहिता १.३९-४०).

वस्त्रधौती / वासधौती – या क्रियेत चार बोटे रुंद आणि १९ किंवा २५ हात लांबीचे तलम वस्त्र तोंडाने हळूहळू गिळून ते पुन्हा बाहेर काढावे. असे केल्यास ज्वर, कफ, पित्त, गाठी आणि प्लीहेची अतिरिक्त वाढ हे विकार नाहीसे होतात. तसेच जठरातील अंतर्भागाची शुद्धी होऊन आतील आवरण बळकट होते (घेरण्डसंहिता १.४१-४२).

(ई) मूलशोधन : या क्रियेमध्ये मधल्या बोटाने किंवा हळदीच्या देठाने गुदद्वाराची स्वच्छता पाण्याने पुन:पुन्हा करावी. मूलशोधनामुळे अपान वायूशी संबंधित असलेले विकार, मलावरोध आणि अजीर्ण नष्ट होतात. कांती तेजस्वी होते आणि जठराग्नी प्रदीप्त होतो (घेरण्डसंहिता १.४३-४५).

(२) बस्ती : या क्रियेचे जलबस्ती आणि शुष्कबस्ती असे दोन प्रकार आहेत. जलबस्तीमध्ये नाभीपर्यंतचा भाग पाण्यामध्ये ठेवून उत्कटासनात बसून गुदद्वाराचे आकुंचन आणि प्रसरण केले जाते. या क्रियेने मधुमेह, वातजन्य व गुदद्वाराशी संबंधित रोग नष्ट होतात; शरीर स्वच्छ व सुंदर होते. शुष्कबस्तीमध्ये जमिनीवर पाठीवर झोपून अश्विनीमुद्रेद्वारे गुदद्वाराचे आकुंचन आणि प्रसरण केले जाते. या क्रियेने भूक वाढते व आमवात नष्ट होतो. बस्तीक्रिया केल्यानंतर सुमारे सव्वा तास काही न खाता राहणे अपेक्षित आहे (घेरण्डसंहिता १.४६-५०).

(३) नेती : या क्रियेचे सूत्रनेती आणि जलनेती असे दोन प्रकार आहेत. सूत्रनेतीमध्ये साधारण एक वीत आकाराचा मजबूत आणि बारीक दोरा नाकातून आत घालून तोंडाद्वारे बाहेर काढला जातो. प्रचलित पद्धतीमध्ये काही योगसाधक दोऱ्याऐवजी ३ क्रमांकाच्या रबर कॅथेटरचा उपयोग करतात. या क्रियेमुळे नाकाच्या पोकळ्यांची शुद्धी होते. जलनेतीसाठी तोटी असलेल्या विशिष्ट प्रकारच्या भांड्यात पाणी घेऊन ते एका नाकपुडीच्या आत घेऊन दुसरीतून बाहेर काढले जाते.नेतीमुळे शुद्धीबरोबरच नाकाच्या आतल्या त्वचेची अतिसंवेदनशीलता कमी होऊन वारंवार सर्दी होण्याची प्रवृत्ती कमी होते आणि दृष्टीही सुधारते (घेरण्डसंहिता १.५१-५२).

(४) लौलिकी (नौली) : नौली म्हणजे पोट दोन्ही बाजूला वेगाने फिरवणे. यामुळे उदराचे स्नायू नियंत्रित होऊन उदरपोकळीला मर्दन होते. नौलीसाठी उड्डियान व अग्निसाराचा योग्य सराव करणे व उदराच्या स्नायूंचा ताण योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. नौलीमुळे पचनक्षमता सुधारते व उदरातील अवयवांची कार्यक्षमता वाढते (घेरण्डसंहिता १.५३).

(५) त्राटक : या क्रियेमध्ये डोळ्यांची उघडझाप थांबवून एखाद्या सूक्ष्म वस्तूवरती दृष्टी स्थिर करून डोळ्यातून पाणी येईपर्यंत त्या वस्तूचे निरीक्षण केले जाते (घेरण्डसंहिता १.५४-५५). त्राटकामुळे डोळ्यांची शुद्धी होते. त्राटक अनेक प्रकारे केले जाते. ज्या त्राटकात बाह्य वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते त्या त्राटकाला बहिस्त्राटक असे म्हणतात. डोळे मिटून भ्रूमध्यावर (दोन भुवयांचा मध्य) त्राटकाच्या विषयाची अनुभूती घेतल्यास त्याला अंतस्त्राटक असे म्हणतात. सुदूर व समीप असेही त्राटकाचे प्रकार वस्तूंच्या अंतरानुसार होतात. त्राटकामुळे डोळ्यांची शुद्धी तर होतेच शिवाय  डोळ्यांच्या हालचालींना नियंत्रित करणाऱ्या स्नायूंची कार्यक्षमताही सुधारते.

(६) कपालभाती / भालभाती : याचे तीन प्रकार आहेत – वातक्रम, व्युत्क्रम, आणि शीत्क्रम. वातक्रम कपालभातिमध्ये डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन उजव्या नाकपुडीने सोडला जातो व पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन डाव्या नाकपुडीने सोडला जातो. यामध्ये पूरक व रेचक वेगाने केले जातात. व्युत्क्रम कपालभातिमध्ये नाकपुड्यांतून पाणी आत ओढून घेऊन तोंडाद्वारे बाहेर टाकले जाते व शीत्क्रम कपालभातिमध्ये तोंडाद्वारे पाणी आत घेऊन पुन्हा नाकाद्वारे बाहेर टाकले जाते. सर्व प्रकारच्या कपालभाती क्रियांमुळे कफदोष नष्ट होतात (घेरण्डसंहिता १.५६-६१).

प्रचलित काळात कपालभाती क्रिया वेगळ्या पद्धतीने केली जाते. योग्य प्रकारे बैठकस्थिती धारण करून उदराचे आकुंचन करून हवा जोराने बाहेर टाकली जाते. याची भराभर आवर्तने केली जातात. यामुळे फुप्फुसातील शिल्लक राहिलेली हवा जास्त प्रमाणात बाहेर टाकली जाते. परिणामी रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे प्रमाण कमी होऊन काही काळ श्वास आपोआप थांबतो. श्वास पुन्हा सुरू झाल्यावर सर्व पेशींना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो  व श्वसनात मोकळेपणा येतो. या क्रियेमुळे श्वसनमार्गाची शुद्धी होऊन नंतर प्राणायाम करणे सोपे जाते.

शुद्धिक्रिया केल्याने शरीरांतर्गत पोकळ्यांची शुद्धी होऊन अतिरिक्त कफ, मेद कमी होतात; शरीराला हलकेपणा मिळतो; शरीराच्या स्वायत्त मज्जासंस्थेवर मेंदूचे अंशत: नियंत्रण आणले जाते, त्यामुळे अनुकंपी-परानुकंपी मज्जासंस्थेचे कार्य संतुलित होते. प्रत्येक व्यक्तीने शुद्धिक्रिया आवश्यकतेनुसार कराव्यात; मात्र त्राटक, कपालभाती, अग्निसार, नौली या क्रिया दररोज कराव्यात. नेती, वमन-दंड-वस्त्र धौती या क्रिया गरजेप्रमाणे आठवड्यातून एकदा केल्या तरी चालतात. पूर्ण शंखप्रक्षालन मात्र वर्षातून एकदा अथवा दोनदाच करावे. या सर्व शुद्धिक्रिया अनुभवी व प्रशिक्षित योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करणे आवश्यक आहे.

पहा : अग्निसार क्रिया, कपालभाती, त्राटक, धौति, नौलि, बस्ति, मूलशोधन, सूत्र नेति.

संदर्भ :

  •  अचल, अयोध्याप्रसाद, यौगिक षट्कर्म, वाराणसी, २००१.
  •  देवकुळे, व. ग., घेरण्डसंहिता, शारदा साहित्य, पुणे, २००५.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर