चित्ताच्या पाच वृत्तींपैकी विपर्यय ही एक वृत्ती आहे. विपर्यय म्हणजे विपरीत अथवा विरुद्ध. चित्ताच्या ज्या वृत्तीद्वारे वस्तूचे यथार्थ ज्ञान होते तिला प्रमाण वृत्ती असे म्हणतात. परंतु, कधी कधी वस्तू जशी आहे त्यापेक्षा तिचे काहीतरी वेगळे ज्ञान होते; ते वेगळे अर्थात विपरीत ज्ञान चित्ताच्या ज्या वृत्तीमुळे होते त्या वृत्तीला विपर्यय वृत्ती असे म्हणतात. महर्षि पतंजलींनी विपर्यय वृत्तीचे लक्षण पुढील सूत्रात सांगितले आहे – ‘विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् |’ (योगसूत्र १.८; ज्या वस्तूचे ज्ञान होणे अपेक्षित आहे ती) वस्तू यथार्थ रूपात न दिसता त्या ठिकाणी विपरीत वस्तूचे ज्ञान ज्या वृत्तीमुळे होते, ती वृत्ती म्हणजे विपर्यय होय. शिंपले नसून चांदी आहे असे ज्ञान होणे, दोरी नसून साप आहे असे ज्ञान होणे, आकाशात एकाऐवजी दोन चंद्र दिसणे ही सर्व विपर्यय वृत्तीमुळे होणाऱ्या अयथार्थ अर्थात मिथ्या ज्ञानाची उदाहरणे आहेत.

व्यक्तीला कधी कधी वस्तूचे योग्य ज्ञान होते, तर कधी विपरीत ज्ञान होते. ज्यावेळी विपरीत ज्ञान होते, त्यावेळीही यथार्थ ज्ञान होण्याची योग्यता व्यक्तीमध्ये असतेच; परंतु अन्य काही निमित्त कारणांमुळे ते होऊ शकत नाही. जसे, सूर्यप्रकाश शिंपल्यावर पडल्याने ते चमकते व त्यामुळे ते चांदीसारखे दिसते. अंधार आणि भीतीमुळे दोरीच्या ऐवजी साप भासतो. डोळ्यातील मोतीबिंदू किंवा अन्य काही विकारांमुळे एका चंद्राच्या जागी दोन चंद्र दिसतात. एखाद्या वस्तूचे विपरीत ज्ञान का होते याची कारणे प्रत्येक प्रसंगात वेगवेगळी असली, तरी तमोगुणामुळे वस्तूचे मूळ स्वरूप झाकले जाणे हे एक सामान्य कारण सर्वत्र असते. तमोगुणाचा स्वभाव आवरण करणे हा असल्यामुळे वस्तूवर, इंद्रियांवर किंवा चित्तावर आवरण उत्पन्न झाल्याने त्या प्रसंगात यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. विपर्यय वृत्तीमुळे होणारे चुकीचे ज्ञान नंतर त्याच वस्तूचे यथार्थ ज्ञान झाल्यावर बाधित होते.

अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाचही क्लेश विपर्ययाचीच वेगवेगळी रूपे आहेत असे व्यासभाष्यामध्ये म्हटले आहे. हे पाच क्लेश सांख्य दर्शनामध्ये तम, मोह, महामोह, तमिस्र आणि अन्धतमिस्र या नावांनी वर्णिलेले असून हे पाचही विपर्ययाचे प्रकार होत, असे प्रतिपादन केले आहे. सांख्यकारिकेमध्ये (कारिका ४८) या पाचांचे मिळून एकूण ६२ उपप्रकार सांगितले आहेत.

भेदस्तमसोऽष्टविधो मोहस्य च दशविधो महामोह: ।
तामिस्रोऽष्टादशधा तथा भवत्यन्धतामिस्र: ॥

त्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे –

(१) तम (अविद्या) : बुद्धी, अहंकार, शब्दतन्मात्र, स्पर्शतन्मात्र, रूपतन्मात्र, रसतन्मात्र आणि गंधतन्मात्र या आठांपैकी कोणत्याही एका तत्त्वाला अविद्येमुळे आत्मा समजणे, हे तमाचे आठ प्रकार आहेत.

(२) मोह (अस्मिता) : अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठांपैकी कोणतीही सिद्धी प्राप्त झाल्यावर त्यांविषयी अभिमान बाळगणे, हे मोहाचे आठ प्रकार आहेत.

(३) महामोह (राग) : सामान्य जीवांना ग्रहण करण्यायोग्य शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच विषय; शिवाय देवता आणि योग्यांना ग्रहण करण्यायोग्य वरील पाच विषय अशा एकूण दहा विषयांच्या प्रति आसक्ती (राग) असणे, हे महामोहाचे एकूण दहा प्रकार होतात.

(४) तामिस्र (द्वेष) : वरील शब्द, स्पर्श इत्यादी दहा विषयांप्रति असणाऱ्या द्वेषाचे दहा प्रकार आणि अणिमा इत्यादी आठ सिद्धींपासून वंचित करणाऱ्या कारणांप्रति द्वेष बाळगणे, असे तामिस्राचे एकूण अठरा प्रकार आहेत.

(५) अन्धतामिस्र (अभिनिवेश) : शब्द, स्पर्श इत्यादी दहा विषयांपासून व अणिमा इत्यादी आठ सिद्धींपासून मृत्यूचे भय उत्पन्न झाल्यास ते अन्धतामिस्राचे अठरा प्रकार होत.

चित्तामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी झाल्यावर तमोगुणाचे आवरण नष्ट होते व वस्तूचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते.

पहा : अविद्या, क्लेश, चित्तवृत्ति, विषय.

संदर्भ :

  • स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.
  • मुसलगांवकर, गजाननशास्त्री, सांख्यतत्त्व-कौमुदी, चौखम्भा संस्कृत संस्थान, वाराणसी, २०००.

समीक्षक : साबिर शेख