सि.नारायण रेड्डी -‘सिनारे’: (१९ ऑगस्ट १९३२ – १२ जून २०१७). तेलुगू साहित्यामधील प्रसिद्ध कवी. त्यांचे पूर्ण नाव सिंगिरेड्डी नारायण रेड्डी असे होते. तेलुगू समाजात ते ‘सिनारे’ या नावाने लोकप्रिय होते. सिंगिरेड्डी नारायण रेड्डी या त्यांच्या नावाचे ‘सिनारे’ हे संक्षिप्त रूप आहे. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील हनुमानजी पेट या छोट्या गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. मल्ल रेड्डी आणि आईचे नाव श्रीमती बुच्चमा असे होते. त्यांचे गाव तेंव्हा निजामाच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण उर्दूत झाले होते. त्यामुळे त्यांची उर्दू भाषेवर आणि त्यातील रीतिरीवाजांवर चांगलीच पकड होती. किशोरावस्थेत त्यांच्यावर लोकगीतांचा तसेच ग्रामीण क्षेत्रातील प्रचलित हरिकथा, भागवत, इत्यादींचा खूप प्रभाव पडला होता. त्यांच्या छंदावर आणि त्याच्या पुर्तीवर या सगळ्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
ते संगीतप्रेमी होते आणि ते चांगले गाऊही शकत होते. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. पुढे तिथेच ते प्राध्यापक झाले. नारायण रेड्डी हे काही काळ शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत होते. आंध्रप्रदेश राजभाषा आयोगाचे अध्यक्ष, तसेच आंध्रप्रदेश सार्वत्रिक विश्वविद्यालयाचे उपकुलपती ही पदे त्यांनी भूषवली होती. या व्यतिरिक्त ते तेलुगू विश्वविद्यालयाचे उपकुलपती देखील होते. सार्वजनिक मंचावर ते एक समीक्षक म्हणून कार्यरत राहिले. समीक्षात्मक कुशाग्रता, तीक्ष्ण अंतदृष्टी आणि काव्यसंवेदना या कारणाने ते काव्यावर भाष्य करणारे वक्ते म्हणून यशस्वी ठरले होते. मनुष्यातील चांगुलपणा हा शेवटी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाईटावर विजय मिळवेल या शक्यतेवर त्यांची अतूट निष्ठा होती. त्यांनी ४० पेक्षा जास्त साहित्यकृती लिहिल्या. त्यात कविता, गीत, संगीत नाटक, नृत्यनाट्य, निबंध, प्रवासवर्णन, समीक्षा, गझल इत्यादींचा समावेश आहे.
त्यांनी तरुणपणी स्वच्छंदी (रोमँटिक) काव्य लिहिले. त्या काळी तेलुगु कवितेत रोमँटिसिझमचे वर्चस्व होते. रायप्रोल सुब्बाराव, देवल्पल्ली कृष्ण शास्त्री, विश्वनाथ सत्यनारायण, जाबुआ असे अनेक काव्यसाधनेत त्यांच्या बरोबर होते. जरी ते रोमँटीक कविता लिहित होते, तरी वास्तवाचे बोट त्यांच्या कवितेने कधी सोडले नाही. त्या काळातील त्यांचे काव्यसंग्रह जलपातम (१९५३), नारायण रेड्डी गेयालु (१९५५) आणि दिव्वेल मुव्वालु (१९५९) हे त्याची साक्ष देतात. त्या बरोबर या कवितांमधून त्यांची भाषेवरची पकड, तसेच निसर्गाविषयी त्याना वाटणारे प्रेमही दिसून येत होते. त्यांच्या रोमँटिक कवितांच्या काळातील सर्वाधिक प्रातिनिधिक कविता कपूर वसंतरायलु (१९५६) मध्ये आढळतात. त्या वेळी ते फक्त २६ वर्षाचे होते.या कवितांनी त्यांना अग्रणी कवींच्या पंक्तीत नेऊन बसवले. होते. आणि ते आपल्या समकालीन कवींच्या बरोबरीचे समजले जाऊ लागले होते. कपूर वसंतरायलु हे त्यांचे एक दीर्घ काव्य आहे. त्यात मध्यकालीन रेड्डीराजा कुमार गिरी आणि राजनर्तकी लकुमा यांच्या प्रणयाचे चित्रण आहे. या टप्प्यातील कलात्मक काव्यलेखनाचे आणखी एक उदाहरण आहे ऋतूचक्रम (१९६४), ज्यासाठी आंध्रप्रदेश साहित्य अकादमीने त्याना पुरस्कृत केले होते. मंटलु-मानवुडू (१९६०) मध्ये कवीच्या विकास यात्रेची एक नवी सुरूवात झाली होती. मुक्तछंदातील या संग्रहात चारही बाजूने कोंडमारा झालेल्या परिस्थितीत माणसाने केलेला संघर्ष चित्रित केलेला आहे. याच प्रवाहात पुढे येणारे संग्रह आहेत, मुखामुखी (१९७१), मानिषि-चिलक (१९६२), उदयंना ह्रदयं (१९६३), मार्पु ना तीर्पु (१९६४); इंटिपेरुचैतन्यम् (१९७६) या सगळ्या कवितासंग्रहातून कवी स्वतः आपण वंचित आणि दुर्लक्षित वर्गाच्या बाजूने आहोत हे दाखवून देतो. त्यातून वर्तमान काळातील धूर्त तसेच अमानवी शक्तींनी घेरल्या गेलेल्या मनुष्याच्या दुर्गतीचे संवेदनशील चित्रण करण्यात आलेले आहे.
१९७७ मध्ये प्रकाशित ‘भूमिका’ ही त्यांची मानवतावाडी टप्प्यातील सर्वाधिक उल्लेखनीय रचना आहे. त्यात मानवाच्या उत्पत्तीपासून त्याने आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीचे वर्णन आहे. आपल्याला त्यात सगळीकडे मनुष्याचे दर्शन घडते. अपराजित, अदम्य उत्साहाने, संयत साहसाने आणि दृढ निश्चयाने नैसर्गिक आपत्तींशी अथवा मनुष्यनिर्मित विपत्तींशी दोन हात करणाऱ्या आणि आपल्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी तत्पर असणाऱ्या माणसाचे दर्शन यातून घडते. १९८० मध्ये प्रकाशित झालेली विश्वंभरा ही त्यांची सर्वाधिक महत्वपूर्ण कृती आहे. ही रचना म्हणजे आजचे महाकाव्य आहे. ज्याची तुलना मिल्टनच्या पॅरडाइज लॉस्ट दाँतेच्या ला डिवाइना कमेडिया यांच्याशी करायला हवी असे उद्गार कवी, इंग्रजीचे प्रोफेसर आणि समीक्षक शिवकुमार यांनी काढले आहेत.
१९८८ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. केंद्रीय तसेच राज्य साहित्य अकादमी पुरस्कार, सोविएत लँड पुरस्कार, कुमारन् आशान पुरस्कार (केरळ), भारतीय भाषा परिषदेचा भिलवाडा पुरस्कार (कोलकाता), मोहिनिदास पुरस्कार, तसेच राजलक्ष्मी पुरस्कार (१९८८- चेन्नई) हे मुख्य पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. पद्मश्री (१९७७) पद्मभूषण (१९९२) तसेच डी. लीट (१९७८) या सन्मानांनीही त्यांना गौरवांकित केले गेले.
वयाच्या ८६ व्या वर्षी झाला त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- http://drcnarayanareddy.com/awards/awards_details/Jnanpith_Award