गोडसे, दत्तात्रय गणेश : (३ जुलै १९१४ – ५ जानेवारी १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, इतिहाससंशोधक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, कलामीमांसक, समीक्षक, नाटककार. खानदेशातील वढोदे येथे जन्म. शालेय शिक्षण नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूरचे मॉरिस महाविद्यालय व मुंबईचे विल्सन महाविद्यालय येथे. लंडन विश्वविद्यालयाच्या स्लेड स्कूलमधून चित्रकलेतील पदवी त्यांनी घेतली. मुंबईचे कलामहर्षी सा. ल. हळदणकर व टाईम्स ऑफ इंडियाचे कलानिर्देशक वॉल्टर लँगहॅमर यांच्याकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यात अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले. टाईम्स ऑफ इंडिया आर्ट डिपार्टमेंट, पब्लिकेशन डिव्हिजन स्टोनेक्स, एव्हरेस्ट अडव्हर्टायझिंग, प्रेस सिंडिकेट, टाटा आर्ट सर्व्हिस या ठिकाणी कार्य केले. बडोदे विद्यापीठात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्य केले. निवृत्तीनंतर मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सौंदर्यशास्त्राचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.
द. ग. गोडसे यांनी कलात्मक आविष्काराच्या स्वरूपाचा शोध घेणाऱ्या कलाविचाराची मांडणी पोत (१९६३), शक्तिसौष्ठव (१९७२), गतिमानी (१९७६), लोकधाटी (१९७९), मातावळ (१९८१), ऊर्जायन (१९८५), वाssकविचार (१९९३) या पुस्तकांतून केली आहे. हा विचार साहित्य, चित्र, शिल्प, संगीत इत्यादी सर्व कलांच्या संदर्भात असून, गोडसे यांचा हा प्रयत्न मर्ढेकरांचा अपवाद वगळता मराठी समीक्षेमध्ये जवळपास दिसत नाही. त्यांची ही मांडणी पूर्णपणे अभिनव स्वरूपाची तसेच वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. गोडसे यांच्या कलाविषयक सिद्धान्तनात पुढील संकल्पनांचा अंतर्भाव आहे : ‘पोत,’ ‘शक्ती,’ ‘शक्तिसौष्ठव,’ ‘गती’ (गतिमानता), ‘वाक (वाकतत्त्व),‘वाssकविचार,’ ‘भावन,’ ‘लय,’ ‘चलन,’ ‘ऊर्जा,’ ‘ऊर्मी,’ ‘उत्सेकबिंदू’. त्यांच्या कलाविचाराला मानसशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी ज्ञानविषयांचा संदर्भ आहे. तसेच या विचारात साहित्याखेरीज अन्य ललित कलांचे, विशेषतः चित्र, शिल्प, संगीत इत्यादी कलांचे संदर्भ मोठ्या प्रमाणात येतात. ‘पोत’ या संकल्पनेपासून सुरू झालेला त्यांचा हा कलाविचार ‘उत्सेकबिंदू’पर्यंत पुढे जाणारा असून, तो मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित कलाविष्कारांचा शोध घेणारा आहे.
गोडसे यांचा पोतविचार त्यांच्या कलाविचाराचा पाया आहे. त्यांच्या मते, कलात्मक आविष्काराला अंगभूत पोत असते. हा आविष्कार कलावंताचे जीवनभाष्य असल्यामुळे त्या आविष्काराच्या पोतांत त्याच्या जीवनविषयक जाणिवांची उभी-आडवी वीण प्रत्ययाला येते. त्या जाणिवांचा आविष्कार घडवून आणणारे भाषा, रेषा, स्वर यांसारखे माध्यम कलाविष्कार सिद्ध करतात. त्यामुळे कलाविष्काराची मूळ कथावस्तू एकच असली तरी, भिन्न काळी, भिन्न स्थळी, भिन्न माध्यमांत तिचे जे आविष्कार घडतात त्या आविष्कारांच्या पोतांत समकालीन जीवनजाणीव प्रत्ययाला येते. या निरीक्षणांच्या आधारे गोडसे यांनी ‘कलात्मक आविष्कारांतून जीवनदर्शन होते आणि ते अपरिहार्यपणे स्थितिसापेक्ष असते,’ हा सिद्धान्त मांडून कलात्मक आविष्काराचा समाजजीवनाशी संबंध जोडला आहे.
शिवकालीन आविष्कार हे गोडसे यांच्या दृष्टीने कलात्मक आविष्कार आहेत. या आविष्कारांचे सौष्ठव घडवणाऱ्या शैलीला गोडसे ‘शक्तिसौष्ठवशैली’ असे म्हणतात. त्यांची ‘गती’ ही संकल्पना शक्तिसौष्ठवशैलीचाच एक प्रमुख गुण आहे. शिवाजीराजांचे एक पत्र, रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणातील नंदीचे कोरलेले शिल्प,एक्क्याण्णव कलमी बखर लिहिणाऱ्या दत्ताजीची गतिमान भाषा, सतराव्या-अठराव्या शतकातील देशमुखी शिक्क्यातील नांगराचे चित्र काढणारी प्रवाही रेषा, शिवकालीन पोवाडा, गोंधळ व ओवी यांचे गतिमान स्वर, हे आविष्कार ‘शक्ती’ व ‘गती’युक्त कसे आहेत हे गोडसे स्पष्ट करतात.
लोकाविष्कारांच्या संबंधी विचार करताना गोडसे ‘भावन,’ ‘वाक,’ ‘वाssक-वाकण वृत्ती’ या संकल्पनांची मांडणी करतात. तो घडवणाऱ्या लोककलावंताची अनुभव घेण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे ‘भावन’- अनुसारी पद्धत होय. स्वतःला आलेल्या अनुभवाचे भावमात्र रूप कलेच्या अवखळ, मनस्वी, मुक्त साधनांतून तो आविष्कृत करतो. त्यामुळे निर्माण होणारा आविष्कार लोकधाटी वळणाचा असतो. ‘वाक’ ही संकल्पना एक लव-युक्त तत्त्व असून अनागरी लोकांच्या दैनंदिन जीवनातील नांगर, खुरपी, कुऱ्हाड तसेच त्यांच्या संगीतातील वाद्ये या वस्तूंची घडण या वाक तत्त्वाने होते. सृष्टीतील वस्तुमात्रांच्या, झाड, पान या सारख्या वस्तूंच्या रचना-व्यवस्थेत त्यांच्या आकार – घाटांत वाssक-वाकण वृत्तीचा आढळ जाणवतो.
‘लय’ आणि ‘चलन’ या दोन संकल्पनांपैकी ‘लय’ ही कालनिविष्ट असून, तिचा अंतर्भाव शास्त्रधाटी (शास्त्रावर आधारित) आविष्कारांत होतो. ‘चलन’ हे लोकधाटी (लोककलेवर आधारित) आविष्काराची अंगभूत ऊर्जा होय. तिच्यामुळे आविष्काराचे अंग व आकार भारलेले असते. त्यामुळे शास्त्रधाटी ‘लयी’पेक्षा लोकधाटी आविष्काराचे ‘चलन’ वेगळे होते. भौतिकशास्त्रातील ‘ऊर्जा’ ही संकल्पना ही कलेची निर्मितिक्षम शक्ती आहे. आविष्काराच्या अवकाशावर ऊर्जेचा प्रभाव असतो. आविष्काराचे अवकाश लवचीक तशीच त्यांत संचार करणारी ऊर्जाही मुक्त, स्वतंत्र व स्वायत्त असते. त्यामुळे आविष्काराच्या घाटाची घडण वेगळ्या थाटाची होते. बालकवी यांची ‘औदुंबर’ व कवी ‘बी’ यांची ‘चांफा’ या दोन कवितांतील ‘ऊर्जे’ने व्याप्त असा अवकाशशोध गोडसे यांनी घेतला आहे.
‘उत्सेकबिंदू’ ही गोडसे यांची नवी संकल्पना आहे. जिथे वाक असतो, तेथील वाकणाला वेगळी दिशा ज्या ठिकाणी मिळते, त्या वळणाच्या बिंदूला गोडसे ‘उत्सेकबिंदू’ असे म्हणतात. हे आविष्काराचे ‘एक सुप्त निर्मितिकेंद्र’ असून, रेषा माध्यमातल्या आविष्काराचे उदाहरण देताना गोडसे यांनी रेषेच्या वाकणाचे तीन टप्पे दाखवले आहेत. १. वाकणपूर्व रेषा २. वाकणावरील मोड (उत्सेकबिंदू) ३. उत्सेकबिंदूनंतरची रेषा. वाकणपूर्व रेषेतून चित्ररेषेचा अंगभूत शक्तभार म्हणजेच निर्मितिक्षम शक्ती प्रवाहित होत असते. पहिल्या टप्प्यातील हा शक्तभार दुसऱ्या टप्प्यावरही प्रवाही असतो. फक्त त्याची रूपे तेवढी बदलतात. याचे स्पष्टीकरण गोडसे आइनस्टाईनच्या प्रसिद्ध सूत्राच्या उदाहरणाने देतात. रेषेच्या पहिल्या टप्प्यावर शक्तभार मानला तर ‘उत्सेकबिंदू’नंतरच्या रेषेच्या तिसऱ्या टप्प्यावर शक्तभार हा ‘mc2’ असा मानायला हवा.
समन्दे तलाश (१९८५) व दफ्तनी (१९९२) हे गोडसे यांचे इतिहाससंशोधनात्मक लेखांचे संग्रह होत. नांगी असलेले फुलपाखरू (१९८९) या पुस्तकातील लेखांतून चित्रकला, साहित्य, नाटक, इतिहास अशा विविध विषयांवरील त्यांचे विचार आढळतात. बाजीरावाची प्रेयसी असलेल्या मस्तानीकडे पूर्वग्रहविरहित दृष्टीने पाहिले जात नाही, या पार्श्वभूमीवर मस्तानीचे वास्तव शोधण्याचा प्रयत्न गोडसे यांनी मस्तानी (१९८९) या पुस्तकाद्वारे केला आहे. इतिहास व लोककथा यांतील संशोधनातून सिद्ध झालेली राजयाचा पुत्र अपराधी देखा (१९६३) हे व काळगंगेच्या काठी ही दोन नाटके गोडसे यांनी लिहिली आहेत. या दोन्ही नाटकांचा विषय संभाजी व सती गोदावरी यांचे जीवन असून, इतिहास व रायगड परिसरातील लोककथा यांतील संशोधनातून सिद्ध झालेल्या या नाट्यरचना आहेत. कैकयीची व्यथा प्रकट करणारे धाडियला राम तिने का वनी ? हे कालिदासकृत शाकुंतल चे स्वैर मराठी रूपांतर असून, पौराणिक कथेचा वेगळा आविष्कार सादर करणारे नाटकही त्यांनी लिहिले. भासविरचित प्रतिमा (स्वैर मराठी रूपांतर) या अप्रकाशित नाटकाचे प्रयोग सादर झाले आहेत. सोंग, संभाजीचे भूत- (१९८१) या एकांकिका त्यांच्या नावावर आहेत.
गोडसे रंगमंचावरील वास्तवपूर्ण नेपथ्याबरोबरच भरत नाट्यप्रणीत त्रिस्तरीय नेपथ्याचे मराठी रंगभूमीवरील आद्य निर्माते मानले जातात. कलात्मक व अर्थपूर्ण नेपथ्यसंयोजन हे त्यांचे खास वैशिष्ट्य. वैजयंती, भाऊबंदकी, होनाजी बाळा, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मुद्राराक्षस (जर्मन), शाकुंतल (जर्मन), मृच्छकटिक, बॅरिस्टर, बावनखणी, ही श्रींची इच्छा, हयवदन, अग्निपंख आदि एकशेसातवर लहानमोठ्या नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले. त्याचप्रमाणे गड्या आपुला गाव बरा व बॅरिस्टर या नाटकांचे कलानिर्देशन त्यांनी केले. प्रेक्षकांना कलाकृतीची ओळख पटवणारी अचूक वातावरणनिर्मिती, सर्व संगती प्रभावी करणारी सृजनशीलता त्यांच्या ठायी होती. संस्कृत नाटकांसाठी भरतमुनींनी आखून दिलेला रंगमंच त्यांनी कसोशीने उभा केला. शाकुंतल, मुद्राराक्षसच्या निमित्ताने तीस-पस्तीस फुटांच्या भव्य रंगमंचाने भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा उभी केल्याचा अनुभव दिला. जरा जपून, कुंकवाचा धनी, रांजणवाडा, या मराठी आणि गुमास्ता, आनंदभवन या हिंदी चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले होते.
रणांगण या कादंबरीपासून पुस्तकांची आशयनुरूप वेष्टने रंगविण्याची परंपरा गोडसे यांनी सुरू केली. पुस्तकांची सजावट संपूर्ण मांडणी ते टाईपची निवड, ओळींतले अंतर, आजूबाजूचे समास या तपशीलांनी पूर्ण होत असे. पेर्तेव्हा, काही कविता, शीळ, १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकांच्या वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठांनी त्या क्षेत्रात अनेक चित्रकारांना प्रेरणा दिली. अनेक मराठी प्रकाशने, नियतकालिके, वृत्तपत्रे आणि विशेष अंक यांची त्यांनी केलेली मांडणी आणि अंतर्बाह्य सजावट त्यांतील वेगळेपणाने लक्षणीय ठरली.
त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार. (पोत, १९६४), महाराष्ट्र साहित्य परिषद, विश्वनाथ पार्वती गोखले पारितोषिक. (शक्तिसौष्ठव,१९७२), महाराष्ट्र शासन पुरस्कार (गतिमानी, १९७६), मॅजेस्टिक प्रकाशन पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार (मातावळ, १९८२), रा. श्री. जोग पारितोषिक ( ऊर्जायन, १९८६), महाराष्ट्र शासन पुरस्कार. (समन्दे तलाश, १९८६), केसरी मराठा संस्था -‘न. चिं. केळकर’ पारितोषिक (मस्तानी, १९८९), अभिज्ञा बडोदे या संस्थेतर्फे ‘माधव आचवल’ पारितोषिक (१९८९) इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून नाट्यदर्पण मानचिन्ह त्यांना बॅरिस्टर (१९७८) आणि बावनखणी (१९८४) या नाटकांसाठी प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘ज्योत्स्ना भोळे’ पारितोषिक (१९८५), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (अग्निपंख, १९८७), संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रीय पारितोषिक (१९८८) तसेच चित्रकलेसाठी त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटी, दिल्ली आर्ट सोसायटी, कमर्शियल आर्टिस्टस् गिल्ड (कॅग), आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्याकडून अनेक पदके आणि पारितोषिके मिळाली आहेत.
संदर्भ :
- वैद्य, सरोजिनी ; पाटणकर, वसंत (संपा), द. ग. गोडसे यांची कलामीमांसा, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.