क्रोचे, बेनीदेत्तो : (२५ फेब्रुवारी १८६६—२० नोव्हेंबर १९५२). इटालियन समीक्षक, तत्त्वज्ञ व लेखक. त्याचा जन्म इटलीमधील आब्रुत्सी भागातील पेस्कासेरोली येथे झाला. रोममध्ये घालविलेला थोडासा काळ वगळला, तर क्रोचेचे सर्व आयुष्य नेपल्स येथे गेले. सुरुवातीपासून त्याचा बौद्धिक जीवनाकडे ओढा होता व संशोधनाची त्याला आवड होती. इटालियन समाजाच्या भाव-भावना व आध्यात्मिक जीवन ज्याच्यात मूर्त झाले आहे, असा इटलीचा इतिहास लिहिण्याचे काम त्याने हातात घेतले. ह्या कामातूनच इतिहासाचे सौंदर्यशास्त्र याकडे तो १८९३ मध्ये वळला. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने समीक्षेची पद्धत व इटलीतील तत्कालीन साहित्य समीक्षेची अवस्था यांवर एक निबंध लिहिला. मार्क्सवादाचाही त्याने अभ्यास केला. त्याच्या आर्थिक व सामाजिक विचारांवर मार्क्सवादाची छाया दिसून येते. शेवटी त्याने स्वतःस तत्त्वज्ञानाला व विशेषतः सौंदर्यशास्त्राला सर्वस्वी वाहून घेतले. क्रोचेने जसे पांडित्यात नाव कमावले, तसेच सार्वजनिक जीवनातही. १९१० मध्ये तो सेनेटर झाला आणि १९२० व १९२१ मध्ये शिक्षणमंत्रिपदापर्यंत चढला. तो फॅसिझमच्या विरोधी होता. नागरी स्वातंत्र्य व उदारमतवाद ह्यांच्या बाजूने तो नि:संदिग्धपणे उभा राहिला. १९४३ मध्ये फॅसिस्ट राजवट संपुष्टात आल्यावर तो पुन्हा बिनखात्याचा मंत्री झाला. इटालियन लिबरल पक्षाचे १९४७ पर्यंत तो अध्यक्ष होता.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतरच्या इटालियन साहित्यविषयक व तत्त्वज्ञानविषयक विचारांची चर्चा आणि मूल्यमापन करण्यासाठी १९०३ मध्ये त्याने La critica हे नियतकालिक सुरू केले. क्रोचेचे तत्कालीन आणि त्यानंतरच्याही साहित्यावरील विद्वत्ताप्रचुर संशोधन La Lettratura della nuora Italia या नावाने चार खंडांत प्रकाशित झाले (१९१४-१५). त्याचे १९०५ मध्ये Logica come scienza del concetto puro व १९०९ मध्ये Filosofia della pratica : economia ed etica हे ग्रंथ प्रकाशित झाले. त्याने मानवी व्यवहाराविषयीची तत्त्वज्ञानात घातलेली हे ग्रंथ ही मोलाची भर असून, त्याच्या ह्या तत्त्वज्ञानाला ‘आत्म्याचे तत्त्वज्ञान’ म्हटले जाते. कारण त्याचा चिद्‌वाद, ‘अखिल जगत हा आत्म्याचाच आविष्कार आहे’, या मूलभूत तत्त्वावर आधारलेला होता.

त्यानंतर क्रोचे आयुष्यभर सत्याच्या एखाद्या नवीनच पैलूचे दर्शन झाले, तर त्याच्या संदर्भात आपल्या विचारांचे चिकित्सक बुद्धीने परीक्षण व जरूर तर त्यात सुधारणा करत राहिला. हे सुधारित सिद्धांत त्याच्या L’intuizone pure (१९०८), Problemi di estetica (१९१०), Breviario di estetica (१९१३), Nuovi saggi di estetica (१९२०), Poesia e non poesia (१९२३) या ग्रंथांतून मांडण्यात आलेले आहेत. काव्यनिर्मिती या विषयाशी संबंधित प्रश्नांचा विचार त्याने La Poesia (१९३६) या ग्रंथात केला आहे.

क्रोचेच्या तत्त्वज्ञानावर जी. डब्ल्यू. एफ्. हेगेल आणि जांबात्तीस्ता व्हीको ह्यांच्या विचारांचा खोल प्रभाव आढळतो. आपल्या तत्त्वज्ञानाला क्रोचे ‘चैतन्याचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Spirit) म्हणतात. तत्त्वज्ञानाचा विषय म्हणजे ज्या क्रियांतून हे चैतन्य व्यक्त होते, त्या क्रिया होत. ज्यांना आपण बाह्य पदार्थ म्हणतो, तेही ह्या आत्मिक क्रियांचे एक अंग आहे. चैतन्याचा आविष्कार करणाऱ्या ह्या क्रियांचे, आपल्या अनुभवांचे जे वर्तुळ आहे, त्याच्या बाहेर आपण पडू शकत नाही. तेव्हा वास्तवाचा अभ्यास म्हणजे चैतन्याचा अभ्यास.

चैतन्य ज्या क्रियांतून व्यक्त होते त्यांचे क्रोचेच्या म्हणण्याप्रमाणे दोन प्रकार असतात : ज्ञानात्मक क्रिया आणि व्यवहारात्मक क्रिया. व्यवहारात्मक क्रिया उद्दिष्टे साध्य करण्यासाठी करण्यात येतात. त्या ज्ञानात्मक क्रियांहून भिन्न असल्या, तरी त्यांच्यावर अवलंबून असतात. कारण आपल्या परिस्थितीचे आणि प्रेरणांचे ज्ञान नसले, तर त्या घडू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही प्रकारच्या क्रियांच्या क्रोचे दोन पायऱ्या कल्पितो. अंतःप्रज्ञ वा प्रातिम (Intuitive) ज्ञान आणि संकल्पनात्मक (Conceptual) ज्ञान ह्या ज्ञानात्मक क्रियांच्या दोन पायऱ्या. क्रियांचे हे प्रकार आणि प्रकारांतील पायऱ्या परस्पविरोधी नसतात. त्या केवळ एकमेकींहून भिन्न असतात आणि त्यांतील एक प्रकार किंवा पायरी दुसऱ्या प्रकारावर किंवा पायरीवर अवलंबून असते. हेगेलने आपल्या ‘डायलेक्टिक’मध्ये परस्परविरोधी तत्त्वांची एकता, ह्या तत्त्वाचे प्रतिपादन केले होते. त्याऐवजी क्रोचेने परस्परावलंबी भिन्नतेच्या तत्त्वाचे प्रतिपादन केले.

प्रातिभ ज्ञान किंवा प्रतिभान वा अंतःप्रज्ञा हा अ-संकल्पनात्मक ज्ञानाचा प्रकार होय संकल्पना सामान्य असते; उलट प्रतिभान ही विवक्षित वस्तू किंवा प्रतिमा, भावना किंवा भावस्थिती ह्यांची जाणीव असते. प्रतिभानात ज्या विवक्षित विषयाची जाणीव असते, ते अस्तित्वात आहे की नाही, ह्याविषयी प्रतिभान उदासीन असते; विवक्षिताची विवक्षित म्हणून, त्याची पृथगात्मता ज्याच्यात परिपूर्णतेने विशद झाली आहे, अशी अस्तित्वनिरपेक्ष जाणीव म्हणजे प्रतिभान. विवक्षिताची पृथगात्म विवक्षितता परिपूर्णतेने विशद करण्याला क्रोचे ‘आविष्कार’ म्हणतो. तेव्हा प्रतिभान म्हणजेच आविष्कार होय. विवक्षिताचा असा परिपूर्ण, समृद्ध आविष्कार म्हणजेच कलाकृती. हा आविष्कार कलावंताच्या मनात असतो; पण कलावंत रंग-रेषा, सूर, शब्द इत्यादींच्या साहाय्याने ह्या आविष्काराला व्यक्त करतो, बाह्य रूप देतो. पण ही कलांवताची दुय्यम कामगिरी असते. त्याची खरी प्राथमिक कामगिरी विवक्षिताचा परिपूर्ण आविष्कार करणे, ही असते. म्हणून कला म्हणजे आविष्कार. येथे एक प्रश्न उपस्थित होतो : प्रतिभानात ज्या विवक्षिताचे स्वरूप परिपूर्णतेने विशद करण्याचा प्रयत्न असतो, ते विवक्षित आपल्याला प्राप्त झालेले असते की, आपण ते निर्माण केलेले असते? क्रोचेच्या म्हणण्याप्रमाणे ते वेदनांच्या (Sensations) स्वरूपात प्राप्त झालेले असते. ह्या वेदनांत भावना, वासना ह्याही एकत्रित असतात. पण वेदनांचा आशय विशद झाल्याशिवाय त्यांचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही आणि आशय विशद झाला आहे असे वेदन म्हणजे, अर्धेमुर्धे तरी प्रतिभान असते. तेव्हा आपल्याला ज्ञान प्रतिभानांचेच असते वेदनांचे ज्ञान आपल्याला नसते, ती आपल्या ज्ञानाची गृहीत कृत्ये असतात. प्रतिभान किंवा आविष्कार ही आत्मिक क्रिया आहे; वेदन ह्या आत्मिक क्रियेची जड सामग्री आहे आणि वेदनाचे प्रतिभानात रूपांतर झाल्यावरच प्रतिभान म्हणून त्याचे ज्ञान आपल्याला होते. प्रतिभानाचा विषय जरी विवक्षित असला, तरी मानवी आत्म्याची ती क्रिया असल्यामुळे तिच्यात आत्म्याचे स्वरूप व्यक्त झालेले असते आणि म्हणून प्रतिभानाला किंवा कलाकृतीला सार्वत्रिक प्रामाण्य असते.

प्रातिभ ज्ञानाच्या पुढची पायरी म्हणजे संकल्पनात्मक ज्ञानाची पायरी. संकल्पनात्मक ज्ञान हे वस्तूंमधील संबंधाचे ज्ञान असते आणि वस्तू प्रातिभ ज्ञानाचा विषय असतात. म्हणून प्रातिभ ज्ञानाशिवाय संकल्पनात्मक ज्ञान उभे राहू शकत नाही; पण संकल्पनांमध्ये शुद्ध संकल्पना आणि व्याज संकल्पना असा भेद क्रोचे करतो. ‘गुण’, ‘विकास’, ‘सौंदर्य’, ‘सहेतुकता’ इ. संकल्पना शुद्ध संकल्पना होत. शुद्ध संकल्पना सार्वत्रिक असतात; म्हणजे त्या कोणत्याही प्रतिभानाला लागू पडतात. त्या पूर्वप्राप्त असतात प्रातिभानांपासून निष्कर्षणाने प्राप्त करून घेतलेल्या नसतात. शिवाय त्या मूर्त असतात. म्हणजे त्या सामान्य असल्या, तरी प्रतिभानाचा विषय असलेल्या विवक्षित वस्तूचे समग्र स्वरूप त्या व्यापतात. ह्याच्या उलट ‘पाणी’, ‘लोखंड’ इ. वैज्ञानिक संकल्पना ह्या व्याज संकल्पना असतात. त्या सार्वत्रिक नसतात, कित्येक वस्तूंनाच त्या लागू पडतात. त्या पूर्वप्राप्त नसतात; अनुभविलेल्या वस्तूंपासून निष्कर्षणाने त्या प्राप्त करून घेतलेल्या असतात. त्या मूर्त नसतात; विवक्षित वस्तूंचे काही गुणच त्यांच्यात ग्रथित केलेले असतात. वैज्ञानिक संकल्पना म्हणजे अनुभविलेल्या काही वस्तूंत आढळलेल्या कित्येक साम्यांची प्रतीके असतात आणि त्यांचा उपयोग काही अटकळी बांधण्यासाठी आणि आपल्या व्यवहाराचे नियंत्रण करण्यासाठी आपण करतो. त्यांचा उपयोग व्यावहारिक असतो. उलट, प्रतिभानांचे विषय असलेल्या विवक्षित वस्तूंना उद्देशून शुद्ध संकल्पना लावल्याने विवक्षित वस्तूंच्या सुघटित अशा जगाचे ज्ञान आपल्याला होते. ह्या शुद्ध संकल्पनांचा परामर्ष तर्कशास्त्रात घेण्यात येतो; पण आपल्या अनुभवाचा सार्वत्रिक, आवश्यक आणि मूर्त असा आकार ह्या संकल्पानांनी सिद्ध होत असल्यामुळे, त्यांचा परामर्ष घेणारे तर्कशास्त्र आणि अनुभवाचा परामर्ष घेणारे तत्त्वज्ञान एकच होत. शिवाय खरेखुरे, मूर्त ज्ञान नेहमी ऐतिहासिक असते. ‘वस्तू तापविल्या की, त्यांचे आकारमान वाढते’ ह्यासारखे वैज्ञानिक ज्ञान अमूर्त असते आणि केवळ व्यावहारिक दृष्ट्या प्रमाण असते; पण खरेखुरे ज्ञान हा विवक्षित व्यक्तीला विवक्षित काळी आलेला अनुभव असतो व म्हणून ते ऐतिहासिक असते. ह्यापासून अनुभवाचा साकल्याने परामर्ष घेऊ पाहणारे तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास एकच आहेत, असा निष्कर्ष क्रोचेनी काढला आहे.

व्यावहारिक क्रियांची पहिली पायरी म्हणजे आर्थिक क्रिया. व्यक्ती स्वतःच्या गरजांचे समाधान करण्यासाठी, स्वतःची उद्दिष्टे साधण्यासाठी ह्या क्रिया करते. पण व्यक्ती समाजाचा घटक असते आणि म्हणून सार्वत्रिक उद्दिष्टे म्हणजे सौंदर्य, सत्य, सामाजिक उपयुक्तता, नीती ही मूल्ये साधल्याशिवाय व्यक्तीचे समाधान होऊ शकत नाही. सार्वत्रिक उद्दिष्टे साधण्यासाठी केलेली कृती ही नैतिक कृती होय; पण सार्वत्रिक उद्दिष्टांना स्वतःची उद्दिष्टे बनविल्याशिवाय ही उद्दिष्टे साधणारी कृती व्यक्ती करूनच शकत नाही. आता स्वतःची उद्दिष्टे साधण्यासाठी व्यक्तीने केलेली कृती ही आर्थिक कृती असते ह्याचा अर्थ असा की, आर्थिक कृतीशिवाय नैतिक कृती असू शकत नाही; पण नैतिक कृतीशिवाय आर्थिक कृती असू शकते. आर्थिक कृती व नैतिक कृती ह्यांचा परस्परसंबंध प्रातिभ ज्ञान आणि संकल्पनात्मक ज्ञान ह्यांतील संबंधांसारखाच आहे. नैतिक कृती सर्व मूल्यांच्या संदर्भात करण्यात येत असल्यामुळे नैतिक दृष्टिकोण हाच सर्वांत व्यापक दृष्टिकोण असतो आणि ह्या दृष्टिकोणातूनच मानवी अनुभवाचा, इतिहासाचा अर्थ लावणे योग्य असते, असा निष्कर्ष क्रोचेनी काढला आहे.

चैतन्य म्हणजे वास्तवता, हा सिद्धांत स्वीकारणाऱ्या चिद्‌वादाचे क्रोचे हा विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ प्रतिनिधी होता. पण पारंपरिक चिद्‌वादाप्रमाणे मानवी अनुभवापलीकडील कोणत्या तरी अनुभवात वास्तवतेचे सार शोधण्याऐवजी, मानवी अनुभवाच्या विकासात आणि मानवी क्रियांच्या आकारात त्यांने ते शोधले.

संदर्भ :

  • Nicolini, Fausto, Benedetto Croce, Turin, 1962.
  • Orsini, G. N. G. Benedetto Croce, Philosopher of Art and Literary Critic, Carbondale, 1961.
  • Piccoli, R. Benedetto Croce, London, 1922.
  • https://plato.stanford.edu/entries/croce-aesthetics/
  • https://biography.yourdictionary.com/benedetto-croce