चुनेकर, सुरेश रामकृष्ण : (२७ एप्रिल, १९३६ – १ एप्रिल २०१९). समीक्षक आणि साहित्य संशोधक तसेच कोश व सूची वाङ्मयाचे अभ्यासक आणि सूचीकार. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी सातारा येथे झाले. त्यांचे वडील शिक्षणाधिकारी होते. ते नऊ वर्षांचे असतानाच त्यांची आई निवर्तली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. पुण्यातील स. प महाविद्यालयातून ते बी. ए झाले (१९५६). तत्कालीन पुणे विद्यापीठातून मराठी (प्रमुख) व संस्कृत (ऐच्छिक) विषय घेऊन ते एम. झाले (१९५८). या परीक्षेत ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. यासाठी त्यांना विद्वत्मान्य असलेली विष्णुशास्त्री चिपळूणकर, रा. कृ. लागू आणि साठ्ये ही पारितोषिके प्राप्त झाली. यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून त्यांनी रा. श्री. जोग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. माधवराव पटवर्धन ( माधव जूलियन ) : वाङ्मय दर्शन आणि चिकित्सा या विषयावर पीएच. डी पदवी संपादन केली (१९६३). त्यांच्या या संशोधनाला पुणे विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीची न. चिं. केळकर, परांजपे पारितोषिके प्रदान करण्यात आली. १९६३ ते १९६८ या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठातच मराठी साहित्यात आचार्योत्तर संशोधन (पोस्ट डॉक्टरेट) केले. त्यानंतर ते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्वायत्त शाखा असणाऱ्या मराठी संशोधन मंडळात प्रपाठक व उपसंचालक होते (१९६८ ते १९७३). तसेच काही काळ प्रभारी संचालकही होते. या काळात त्यांनी मराठी संशोधन पत्रिकेच्या संपादकत्वाची महत्त्वाची भूमिकाही पार पाडली. ते संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे मराठीचे प्राध्यापक व विभागप्रमुख होते (१९७३ ते १९८४). १९८४ ते १९९६ या कालावधीत ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रथम प्रपाठक म्हणून आणि निवृत्तीपूर्वी काही काळ विभागप्रमुख होते. ३० एप्रिल १९९६ रोजी ते मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. ह्या अध्यापन काळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम. फिल व पीएच. डी पदवीसाठी संशोधन मार्गदर्शकाचे काम केले.
चुनेकर यांनी तहहयात स्वतंत्रपणे समीक्षात्मक व संशोधनात्मक लेखन आणि संपादन केले. अध्यापनाचे कार्य सुरू असतानाच त्यांनी विपुल समीक्षात्मक, परीक्षणपर, संपादकीय, प्रस्तावनापर असे लेखन केले. १९६४ साली प्रकाशित झालेल्या रा. श्री. जोग गौरवग्रंथातील चुनेकरांचा ‘कलागर्भ, त्याचे विकसन आणि कलाकृती’ हा लेख त्यांच्यातील सूक्ष्म व चिकित्सक समीक्षकाची मराठी समीक्षाक्षेत्राला ओळख करून देणारा प्रारंभबिंदू आहे. हा लेख म्हणजे मराठी समीक्षाक्षेत्रातले त्यांचे पदार्पण म्हणता येईल. कलाबीजाचा उद्भव आणि कलाकृतीचा अंतिम आकार यांमधील संबंधांचे स्वरूप काय असते? वाङ्मय प्रकारांमधील भेद खरोखरीच अपरिहार्य आहेत का ? त्यामागे खरोखरीच काही व्यवच्छेदक मूलभूत तत्त्वे आहेत का ? या व तत्संबंधी वाङ्मयीन प्रश्नांची अत्यंत मूलगामी मीमांसा चुनेकरांनी प्रस्तुत लेखात केली आहे. मराठी संशोधन मंडळात कार्यरत असतानाच त्यांनी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची (१९६९), भिडे यांच्या समग्र वाङ्मयाची वर्णनात्मक सूची (१९६९), अ. का. प्रियोळकर यांच्या वाङ्मयाची सूची (१९७३) सिद्ध केली ; तसेच मराठी संशोधन पत्रिकेतून प्रसिद्ध झालेल्या साहित्याचे ४,५,६,७ हे खंड संपादित केले. याच काळात चुनेकरांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे माधव जूलियन यांचे जीवन आणि साहित्य यातील अन्वयार्थ स्पष्ट करणारा माधवराव पटवर्धन : वाङ्मय दर्शन (१९७३) प्रकाशित झाला. माधव जूलियन (१९८०), समग्र माधव जूलियन खंड – १, स्फुटकाव्य खंड – २, खंडकाव्य (१९७७) ही सहसंपादने (रा. श्री. जोग व द. न. गोखले यांच्या सहकार्याने), माधवराव पटवर्धन यांच्या वाङ्मयाची सूची (१९८३) ही माधवराव पटवर्धन ह्यांच्यावरील अभ्यासाची फलश्रुती होय. सहा साहित्यकार (१९८२), अंतरंग (१९९६),जयवंत दळवी यांची नाटके : प्रवृत्तीशोध (१९९५) ही त्यांची समीक्षेची महत्त्वाची पुस्तके आहेत. जी. ए. कुलकर्णी यांच्या अप्रकाशित व असंकलित कथांचे संकलन व संपादन चुनेकरांनी सोनपावले (१९९१) या नावाने केले आहे. वि. द. घाटे यांच्या काही म्हातारे व एक म्हातारी ह्या व्यक्तीचित्रात्मक पुस्तकांच्या तृतीय आवृत्तीचे संपादन (१९८८) त्यांनी केले. १९८० साली संगमनेर शहरासंबंधी त्यांनी सिद्ध केलेल्यादर्शन या स्मरणिकेतून स्थानिक इतिहासाचे एक महत्त्वाचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. चुनेकरांचे मराठी साहित्य क्षेत्रासाठीचे अत्यंत मौलिक योगदान म्हणजे त्यांनी केलेले सूचिकार्य होय. अनेक मौलिक सूची तयार करण्याबरोबरच त्यांनी सूचींची सूची (१९९५) सिद्ध केली. यामध्ये एकूण ६७३ सूचींचा समावेश आहे. त्यांनी पुणे येथील मराठी साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड ५ व ६ साठी ‘मराठी समीक्षेचा इतिहास ‘ या विषयावर लेख लिहिले.
चुनेकरांचे लेखन इतर लेखकांना आणि अभ्यासकांना, संशोधकांना आदर्शवत वाटावे असे आहे. अस्सल साधनांचा आग्रह, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाबाबत असणारा कटाक्ष, स्थल-काल-व्यक्तीसंबंधातील तारतम्य आणि अचूक निर्णयक्षमता ही त्यांच्या संशोधकीय लेखनाची मूलभूत वैशिष्ट्ये होत. चुनेकरांची समीक्षा साहित्य – तत्त्वविचार व्यक्त करणारी आहे तसेच आस्वादकही आहे. सहा साहित्यकार हा अर्वाचीन मराठी साहित्यातील हरिभाऊ आपटे, केशवसुत, कृ.प्र. खाडिलकर, रा. ग. गडकरी, माधव जूलियन, वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकांच्या अंतरंगाचा शोध घेणाऱ्या लेखांचा संग्रह याचे उत्तम उदाहरण आहे. साहित्याच्या अंगभूत प्रीतीने आणि साक्षेपी रसिकतेने घेतलेला हा वेध वाचकालाही आत्मप्रत्ययाची अनुभूती देतो. साहित्याची निर्मिती, साहित्याचा अभ्यास आणि आस्वाद ही चैतन्यशील आनंदप्रक्रिया आहे. याची अनुभूती चुनेकरांच्या प्रस्तुत लेखसंग्रहाद्वारे येते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या चार संगीत नाटकातील सुंदर उतारे रा. ग. गडकरी यांनी निवडले होते. त्यांचे साद्यंत संपादन चुनेकरांनी केले. मु. श्री कानडे यांच्या गौरवग्रंथासाठी चुनेकरांनी आजचे नाटककार हा प्रदीर्घ लेख लिहिला आहे. जयवंत दळवींच्या समग्र अभ्यासाला उपयुक्त ठरेल असा हा लेख म्हणजेच जयवंत दळवींची नाटके : प्रवृत्तीशोध हे पुस्तक होय.
कोणत्याही विद्याशाखेतील संशोधनाची मूलतत्त्वे समान असतात. एका विद्याशाखेतील संशोधनाची मुलतत्त्वे, पद्धती, शिस्त दुसऱ्या विद्याशाखेतील संशोधनालाही व्यापक परिप्रेक्ष्य देतात. या सूत्रातून लिहिलेल्या वेगवेगळ्या विद्याशाखांतील लेखांचा संग्रह असणाऱ्या संशोधन : स्वरूप आणि पद्धती या ग्रंथाचे संपादन त्यांनी रंगनाथ पठारे आणि दिलीप धर्म यांच्या सहकार्याने केले. या ग्रंथाची चुनेकरांची ३० पानी प्रस्तावना ही संशोधकाची, साहित्याच्या अभ्यासकाची मूलभूत बैठक पक्की करणारी आहे. संशोधन क्षेत्रासाठीचा हा एक मौलिक ग्रंथ आहे. अंतरंग हा लेखसंग्रह म्हणजे आधुनिक मराठी साहित्यातील विविधांगी लेखनाविषयी चुनेकरांनी किती असते आणि बारकाईने लेखन केले आहे याचे उदाहरण होय. भाषा : साहित्य आणि संशोधन या ग्रंथाच्या खंडांमध्येही चुनेकरांनी संशोधनाविषयी केलेले लेखन मर्मदृष्टी देणारे आहे. आनंद साधले – साहित्यसूची या उमा दादेगावकर यांच्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावनादेखील संशोधकांसाठी मार्गदर्शक आहे. याखेरीज आठ साहित्यकृतींना त्यांनी व्यासंगपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. ह्यांत निबंधमाला: स्वरूप आणि कार्य, स्मृतींची चाळता पाने, आदिवासी ठाकर आणि त्याची लोकगीते आदींचा समावेश आहे. चुनेकरांच्या मर्मग्राही चिकित्सा वृत्तीचा प्रत्यय या प्रस्तावनांमधून येतो.
संशोधनाप्रमाणेच कोशवाङ्मयाविषयीही त्यांनी विपुल लेखन केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशासाठी ग्रंथकोश ही वाङ्मयकृतींवर आधारलेली दीर्घ टिपणे तसेच ९ शब्दकोश, १६ ज्ञानकोश अशा एकूण २५ कोशांवर लिहिलेले लेख हे चुनेकरांनी १९८७ साली केलेले मौलिक कार्य आहे. त्याचप्रमाणे याच कोशासाठी त्यांनी साहित्यिकांचा परामर्श घेणारे दहा लेख लिहिले होते. मात्र या खंडाचा एकच भाग प्रकाशित झाला. त्यामुळे प्रस्तुत कोशाच्या खंडात चुनेकरांचे लेख प्रकाशित होऊ शकले नाहीत. नंतर ते ‘आणखी काही अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक ‘ या लेखमालेतून प्रसिद्ध झाले.चुनेकर कोशवाङ्मयाला महाराष्ट्राचा बौद्धिक मानदंड मानतात. चुनेकरांचे द्राक्षकन्या (२००६,उमरखय्यामच्या रुबाया), जी. एं. ची निवडक पत्रे – खंड ३ व ४ (२००६ , श्री. पु. भागवत , म. द. हातकणंगलेकर आदींसोबत सहसंपादन) युजीन ओ’निलच्या लाँग जर्नी इन टू नाईट या नाटकाचे दिवस तुडवत अंधाराकडे (२०१४) हे जी. ए. कुलकर्णी यांच्या नाट्यभाषांतराचे संपादन, मराठी संशोधन मंडळाने प्रकाशित केलेला बाळकृष्ण अनंत भिडे लेखसंग्रह : खंड १ (२०१९) हा संपादित ग्रंथ अशी इतरही त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. गोवा विद्यापीठातील सु. म. तडकोडकर यांनी चुनेकरांच्या समग्र वाङ्मयनिर्मितीची सूची कुशावती या नियतकालिकाच्या दिवाळी – २०१० च्या अंकातून प्रसिद्ध केली आहे. चुनेकरांनी लिहिलेले व्यक्तीपर लेख, टिपणे, प्रकाशित पत्रव्यवहार, आत्मपर लेख आदी लेखनातून त्यांची सूक्ष्मदृष्टी, अभ्यासविषयातील तन्मयता दिसते. मर्यादित काळात अमर्याद होता आलं पाहिजे हे त्यांचे जीवनमूल्य ते आयुष्यभर जगले.
चुनेकरांच्या वाङ्मयीन कार्याचा गौरव वेगवेगळ्या पारितोषिकांनी झाल्याचा आढळते. महाराष्ट्र राज्य ग्रंथ पारितोषिक (१९७६), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार (१९९६), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९९६ ,अंतरंग), प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक (२००९), मुंबई विद्यापीठाचा ज्येष्ठ संशोधक पुरस्कार, मुंबई मराठी साहित्यसंघाचा डॉ. माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) पुरस्कार (२०११) इत्यादी महत्वाच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील एक निष्ठावान, साक्षेपी संशोधक, कोश वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, सूची वाङ्मयाची निर्मिती करणारे सूचीकार आणि आपल्याच ठायी रसिकतेने जगलेले रसज्ञ – आनंदयात्री म्हणून चुनेकर मराठी वाङ्मयाच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील.
संदर्भ :
- तडकोडकर, सु.म., ‘सु. रा. चुनेकर यांच्या वाङ्मयाची समग्र सूची’, कुशावती, दीपावली, २०१०.
- खोले, विलास, सुहृदगान, मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे, २०१३.
- खोले, विलास, पैलतटावर, मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे, २०१९.