धुप्पड, माया : (१५ डिसेंबर १९५६). मराठी साहित्यात बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री, गीतकार, लेखिका आणि समीक्षक. पुणे जिल्ह्यातील खेड हे त्यांचे मुळ गाव. धुप्पड यांनी विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली असून प्रौढांसाठी काव्यसंग्रह, बालकविता संग्रह, लेखसंग्रह, स्फुटकाव्य, समीक्षा अशा साहित्यप्रकारात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या गीतांच्या ध्वनीफिती प्रकाशित असून त्यातील गीते ही बाल, भक्तीप्रधान, प्रबोधनात्मक आहेत. माया धुप्पड यांची साहित्य संपदा : काव्यसंग्रहसोनचांदणं, चांदणसाज, मनमोर, गीतनक्षत्र, भक्तिनिनाद, परिघाबाहेरील ती; समीक्षा–  साहित्याचे शिलेदार; बालकवितासंग्रहवाऱ्याची खोडी, पावसाची राणी, गाऊ अक्षरांची गाणी, सावल्यांचं गाव, हत्तीचा व्यायाम, आभाळाची छत्री, गरगर घागर; स्फुटकाव्यपाऊस, चंद्र, आकाश, चिमणीगीत ( हायकूसंग्रह) इत्यादी. याशिवाय त्यांची वाचू आनंदे या शासनाच्या बालकांसाठीच्या प्रकल्पाअंतर्गत चांदोबाचे घर, चंद्राचे गाणे, बेडूक बेडूक, इ.पुस्तके प्रकाशित असून गाऊ अक्षरांची गाणे हे पुस्तक मुलांना सोप्या पद्धतीने मुळाक्षरे व अंकांची ओळख करून देणारे आहे.

माया धुप्पड यांच्या काव्यामध्ये विषयांची विविधता आहे. कधी लहान बालकाच्या निरागस नजरेने तर कधी प्रौढ विचारशील स्त्रीच्या गंभीर वृत्तीने त्या भोवतालच्या जगाचे अवलोकन करतात. त्यांच्या कवितांची भाषाशैली साधी सरळ आहे. त्यात चिंतनशिलतेचा आव आणून कुठेही अकारण संदिग्ध रचना करण्याचा अट्टाहास दिसत नाही. त्यांच्या काही कवितांतून भक्तिपरता आणि राष्ट्रीय भावनेचा परिपोष व्यक्त होतो. निसर्गाच्या प्रतिमांमधून भाव व्यक्त करणारी निसर्गकविता,भावकविता असे त्यांच्या काव्याचे स्वरूप आहे. पावसाची राणी हा काव्यसंग्रह बालसुलभ भावविश्व रेखाटणारा संग्रह आहे. वाऱ्याची खोडी हा अनोख्या उपक्रमाचा कवितासंग्रह आहे. कविता वाचा आणि चित्र रंगवा असा त्याचा भाव आहे.

मंगेश पाडगावकर, ना.धों.महानोर, गिरीजा कीर, विजया वाड इत्यादी सुप्रसिद्ध साहित्यिकांनी त्यांच्या लेखनाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांच्या साहित्य सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कारसह अनेक पुरस्कार त्या़ंच्या कलाकृतींना प्रदान करण्यात आले आहेत.

संदर्भ :