शेवडे, रामचंद्र : (१४ मार्च १९१५ – २ डिसेंबर २००१). (शेवडे गुरूजी). महाराष्ट्रातील शिक्षणसेवक आणि बालसाहित्यिक. बालशिक्षण व बालसाहित्य हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे क्षेत्र होते. मादाम माँटेसरी, साने गुरूजी व वि.स.खांडेकर ह्या दिग्गज व्यक्तींच्या सहवासातून प्रेरणा घेऊन बालशिक्षणाच्या क्षेत्रात ध्येयपूर्णतेने कार्य करणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. जन्म कोल्हापुरात. वडील वकील व आई गृहिणी असलेले मध्यमवर्गीय कुटुंब. १९३४ साली झालेल्या वडिलांच्या अचानक निधनाने कुटुंबाचा आधार गेला, तरी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास होऊन नंतर मुंबई विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळविली. कौटुंबिक गरज व अध्यापनाची उपजत आवड म्हणून ते हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर रुजू झाले. अध्यापनाबरोबरच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या बी.टी. व एम.ए. पदव्या घेतल्या. ह्याच काळात त्यांची पूज्य साने गुरूजींशी भेट झाली आणि त्यांच्याकडून लेखनाला प्रोत्साहन मिळाले.

गुरूजींची अध्यापनातील तळमळ पाहून मा. विनायकांनी त्यांना स्वखर्चाने ६ महिन्यांच्या ॲडव्हान्स माँटेसरी कोर्ससाठी मद्रासला पाठविले. तो कोर्स खास स्त्रियांसाठी असूनही खास वेगळी मुलाखत घेऊन गुरूजींची निवड झाली. खुद्द मादाम माँटेसरीच इटालियनमध्ये लेक्चर देत आणि त्यांचा भाचा मेरिओ त्याचे इंग्रजीत भाषांतर करून सांगत असे. इथेच माँटेसरींच्या ध्येयवेडेपणाचे दर्शन गुरूजींना अनुभवायला मिळाले. त्यांनी नलिनी कणबूरांनी स्थापन केलेल्या पन्हाळा, सांगलीसह ११ ठिकाणच्या बालवाड्यांमध्ये, प्रायव्हेट हायस्कूलच्या बालवाडीत त्यांच्या प्रारंभीच्या काळात अध्यापन करून माँटेसरी कोर्स केल्याचे सार्थक केले. म. गांधींनी उद्योगपती बिर्लांपुढे मांडलेल्या हिंदी माध्यमाची शाळा स्थापण्याच्या प्रस्तावानुसार नाशिकला स्थापन झालेल्या त्र्यंबक विद्यामंदिरातही गुरूजींनी काही काळ संस्कृत शिकविण्याचे काम केले. वि.स. खांडेकरांसारख्या सिद्धहस्त, ध्येयप्रेरित ज्येष्ठ लेखकाकडे त्यांनी लेखनिक व वाचक म्हणून काम केले. रामायण-महाभारत ह्या संस्कृत महाकाव्यांचे, तसेच इंग्रजी, हिंदी, मराठी पुस्तकांच्या वाचनाबरोबरच खाडेकरांशी होणारे संभाषण व चर्चा ह्यांमुळे त्यांची लेखन करण्यातील गोडी आणि कौशल्य वाढले. नूतन बाल शिक्षण संघ ह्या कमिटीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाने गुरूजींच्या केलेल्या निवडीमुळे त्यांनी तयार  केलेल्या माँटेसरी कोर्सच्या आराखड्याला विद्यापीठाने मान्यता दिली. बालकाला तिसऱ्या वर्षी प्रवेश व हासत-खेळत शिक्षण ही ह्या कोर्सची मूलतत्त्वे निश्चित झाली.

गुरूजी बालसाहित्याचे लेखन सातत्याने पूर्वीपासूनच करत होते. मुले संस्कारित व्हावीत व गुणी, कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रातून त्यांना प्रेरणा मिळावी ह्या निखळ हेतूने त्यांनी मुलांसाठी ३८ गोष्टीरूप थोर व्यक्तींची चरित्रे लिहिली. शिवाय ६ छोट्या कादंबऱ्या, ५ नाट्य प्रवेशिका, ५० कथासंग्रहातून हजारभर बोधकथा, बाल-शिक्षणाविषयी ३ बालगीतांचे संग्रह असे विपुल साहित्य निर्माण केले.  आटोपशीर प्रसंग, छोटी वाक्ये, चटकदार अनौपचारिक संवाद, नादमय, तालबद्ध, सुबोध व मधुर भाषाशैली ही त्यांच्या लेखनाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये होती. शिवाय अद्भुत, हास्य अशा मुलांना आवडणाऱ्या रसांमधून रंजकता आणल्यामुळे त्यांची पुस्तके बालवाचकांना खूपच आवडली. अध्यापन, लेखन ह्यांव्यतिरिक्त शाळांमध्ये जाऊन त्यांनी कथाकथनाचे सुमारे १५० कार्यक्रम केले, तसेच भाषणेही दिली. बालसाहित्याच्या पुस्तकांच्या किंमती अल्प आणि मागणीही कमी म्हणून प्रकाशक नाखूश असत. म्हणून गुरूजींनी स्वत:च्या खर्चाने ती प्रकाशित केली. कोल्हापूरच्या उषाराजे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक पद २५ वर्षे त्यांनी भूषविले. नंतर ताराराणी अध्यापिका विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत राहून १९७३ मध्ये ते निवृत्त झाले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे सत्कार, महा. राज्य शासनाचा साने गुरूजी पुरस्कार, महा. राज्य शासनाचा वि.को.ओक चरित्र पुरस्कार, अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने कवी सुधांशु ह्यांच्या हस्ते १ लाख रुपयांच्या निधीसह भव्य सत्कार, (हा निधी त्यांनी व्यासपीठावरच वि.स.खांडेकर स्मारकासाठी दिला), साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पॅको पवार पुरस्कार, अ.भा. मराठी बाल कुमार साहित्य संमेलन, पुणेचा बालसाहित्य पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मराठी बालकुमार साहित्य सभेचे संस्थापक अध्यक्षपद, गडहिंग्लजच्या अ.भा. बालकुमार  साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशी पदेही त्यांनी भूषविली आहेत.

संदर्भ :

  • महाडेश्वर, शशिकांत, बालकुमार साहित्य सेवक, रा.वा. शेवडे गुरूजी : जीवन व साहित्य, मनोज  प्रकाशन, कोल्हापूर, २००२.