ब्यूर्गर रोग

ब्यूर्गर रोग (घनाग्रदाहरक्तवाहिनीनाश) हा एक दुर्मीळ आजार असून त्यामध्ये हातापायांतील लहान व मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन खंडयुक्त प्रदाह होतो. त्यामुळे या भागांमध्ये रक्तापूर्ती कमी प्रमाणात होते. हा रोग बळावल्यास आजूबाजूच्या शिरा व नसा यांवरही परिणाम होऊ शकतो. अगदी क्वचित मेंदू, हृदय, पचनसंस्था यांना रक्तपुरवठा करणाऱ्या छोट्या धमन्यांमध्ये हा आजार होतो.

संशोधनात्मक पार्श्वभूमी : फेलिक्स फॉन विनिवॉर्टर (Felix von Winiwarter) यांनी १८७९ मध्ये या आजाराबद्दल माहिती दिली. त्यांनी त्याला ‘Endarteritis Obliterans’ असे नाव दिले. सन १९०८ मध्ये अमेरिकन शल्यचिकित्सक लिओ ब्यूर्गर यांनी ५०० रूग्णांमध्ये अंगच्छेदन केलेले पंजा आणि पावले यांमधील धमन्या व शिरांचा अभ्यास केला असता त्यांना त्यामध्ये तीव्र दाह व रक्ताच्या गुठळ्या आढळून आल्या. सन १९२४ मध्ये त्यांनी या आजाराची रोगनिदानविषयक माहिती प्रसिद्ध केली. या आजाराला ‘‍विनिवॉर्टर-बर्जर सिंड्रोम’, ब्यूर्जर्स डिसीज किंवा thromboangiitis obliterans असे म्हटले जाऊ लागले.

कारणे : तीव्र धूम्रपान आणि तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन वा हुंगणे हे ब्यूर्गर रोगाचे बहुधा एकमेव कारण आहे, असे म्हणता येईल. रक्तवाहिन्यांच्या अंत:स्तराच्या पेशींवर तंबाखूमधील काही घटकांची थेट विषाक्तता (Toxicity) होते अथवा तंबाखूतील काही प्रतिक्रियाशील संयुगे रक्तवाहिनीतील काही घटकांमध्ये बदल घडवतात आणि त्यामुळे प्रतिरक्षण प्रतिसाद निर्माण होतो. वास्तविक ब्यूर्गर रोगाचे बहुतांश रुग्ण तंबाखूला अतिसंवेदनशील असतात.

काही वांशिक वर्गांमध्ये (इझ्राएल, जपान, भारतीय उपखंड) याचे प्रमाण अधिक आढळून आल्यामुळे विशिष्ट एचएलए हॅप्लोटाइपशी (HLA haplotype) संबंध प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आनुवंशिक रोगप्रवणताही सूचित करण्यात आली आहे.

ब्यूर्गर रोगामध्ये रक्तवाहिनीत होणारे रचनात्मक बदल : सुरुवातीला रक्तवाहिनीच्या मार्गात गुठळी तयार होते. पांढऱ्या पेशींचे (Neutrophils) मोठ्या प्रमाणवर एकत्रिकरण झाल्यामुळे त्यामध्ये सूक्ष्मविद्रधी (Microabscess) होते. रक्तवाहिनीच्या तीनही स्तरांमध्ये पांढऱ्या पेशींचा प्रदाह होतो. सुरुवातीच्या प्रदाहानंतर मार्गातील गुठळीमधील पेशींची संख्या कमी होते व गुठळीभोवती बहुकेंद्रकीय महापेशींचा पुंजका (Granuloma) तयार होतो. ही गुठळी हळूहळू घट्ट होत जाते व त्याच्यामधून रक्तवाहिनीमार्ग वारंवार बंद व मोकळा होत राहतो. कालांतराने रक्तवाहिनीत तंतुलता उद्भवते (Fibrosis).

लक्षणे : रक्तापूर्ती कमी झाल्यामुळे हात व पाय यांच्या दूरस्थ भागांतील धमन्यांच्या वितरण क्षेत्रामध्ये लक्षणे दिसून येतात आणि नंतर ती समीपस्थ भागांमध्येही दिसू लागतात.

(१) घनाग्रनीलाशोथ : त्वचेच्या लगेचच खाली असणाऱ्या नीलांमध्ये स्थलांतरित होणारा शोथ होतो. हातापायांचे दूरस्थ भाग, घोट्याचा भाग, पावलाच्या वरील त्वचा यांमध्ये तो दिसून येतो.

(२) वेदना : आजाराच्या सुरुवातीच्या काळातच हे लक्षण दिसून येते. प्रथम शीतसंवेदनशीलतेमुळे सौम्य ते तीव्र स्वरूपाची वेदना होते. सर्व रुग्णांमध्ये पोटऱ्या व पावले यांत अधूनमधून वेदना होत राहते. कालांतराने दोन वेदनांमधील कालावधी कमी होतो व वेदना जास्त वेळ राहते. रक्तापूर्ती कमी झाल्यामुळे विश्रांत अवस्थेतही वेदना होते. नसांवर परिणाम झाल्यास जोरदार कळ जाते व अस्वाभाविक संवेदना जाणवतात.

(३) रेनो फेनोमेनॉ : रेनो रोग (Raynaud’s disease). यात हातापायांच्या बोटांच्या टोकाला असलेल्या छोट्या रक्तवाहिन्या शीतसंवेदनशीलता किंवा मानसिक ताण यांच्यामुळे आकुंचन व प्रसरण पावतात. दीर्घकालानंतर त्वचेवर व्रण (Ulcer) तयार होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास कोथ (Gangrene) संभवतो.

निदान : ब्यूर्गर रोगाचे निदान निश्चित करण्यासाठी कुठलीही विशिष्ट प्रयोगशाळा चाचणी उपलब्ध नाही. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्यास कारणीभूत असणारे इतर आजार, स्वयंप्रतिरोधक आजार, मधुमेह इत्यादी आजारांसंदर्भात चाचण्या करणे महत्त्वाचे असते. रेडिओग्राफीक चाचण्यांमध्येही हातापायांच्या लहान व मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध दिसून येतो. बायॉप्सी चाचणीमध्ये रक्तवाहिनीत झालेले सूक्ष्मरचनात्मक बदल दिसून येतात.

उपचार : धूम्रपान व तंबाखूयुक्त पदार्थ टाळल्यास हा आजार बराचसा आटोक्यात येतो. धमनीचा उपमार्ग (By-pass), क्षतशोधन (Debridement) हे इतर उपचार आहेत. अधिक तीव्र स्वरूपाच्या आजारात इतर उपचारपद्धती अयशस्वी ठरल्यास अंगच्छेदन करावे लागते.

पहा : कोथ.