शहाजी छत्रपती महाराज : (४ एप्रिल १९१०–९ मे १९८३). कोल्हापूर संस्थानचे शेवटचे अधिपती व मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक. राजर्षी छ. शाहू महाराज यांचे पुत्र तिसरे छ. राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर (१९४०) कोल्हापूरच्या गादीवर आलेले छत्रपती शिवाजी (पाचवे) हे अल्पकाळातच मृत्यू पावले. गादीचा वारसा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा राजर्षी छ. शाहू महाराजांचे नातू (मुलीचा मुलगा) देवास संस्थानचे (थोरली पाती) अधिपती श्रीमंत विक्रमसिंह तुकोजीराव पवार यांना कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेण्यात आले (३१ मार्च १९४७). दत्तक विधानानंतर त्यांचे नाव शहाजी छत्रपती असे ठेवण्यात आले.
त्यांचा जन्म श्रीमंत तुकोजीराव उर्फ बापूसाहेब पवार व राधाबाई उर्फ अक्कासाहेब (राजर्षी छ. शाहू महाराजांची कन्या) या दापंत्यापोटी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे बालपण कोल्हापूरात, तर शालेय व उच्च शिक्षण कोल्हापूर, देवास आणि इंदूर कोल्हापूर येथे झाले. देवासमधील इंग्रज अधिकारी माल्कम डार्लिंग व प्रा. रिचर्डसन हे त्यांचे पालक-शिक्षक होते. इंग्रज अधिकार्याच्या सहवासामुळे इंग्रजी भाषेचा त्यांच्यावर प्रभाव निर्माण झाला. १९२४ मध्ये ते भारत मंडळाची मॅट्रिक आणि १९२६ मध्ये इंटरमिजियट परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंदूरमधील ख्रिश्चन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
विक्रमसिंहांचे शिक्षण चालू असताना जत संस्थानचे अधिपती रामराव उर्फ आबासाहेब डफळे यांची कन्या प्रमिलाराजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला (३१ डिसेंबर १९२६). विवाहानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. राजाराम महाविद्यालयात त्यांची ओळख हुशार व उत्तम खेळाडू अशी होती. राजाराम फुटबॉल संघाचे ते कर्णधार होते (१९३२). फुटबॉलशिवाय त्यांना क्रिकेट, टेनिस, सायकल, पोलो, नेमबाजी इ. खेळांत विशेष रस होता. मुंबई विद्यापीठातून इतिहास, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषय घेऊन त्यांनी बी. ए. पदवी परीक्षा उत्तीर्ण केली (१९३२). विद्यापीठातून पदवीधर होण्याचा मान मिळविणारे ते पहिले मराठा संस्थानिक. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्या प्रभावामुळे विक्रमसिंह पुढील काळात मराठा इतिहासाच्या अभ्यासाकडे वळले. विक्रमसिंह यांचे मामा छ. राजाराम महाराज यांनी राज्यकारभार व प्रशासनातील बारकावे माहीत व्हावेत, यासाठी त्यांना म्हैसूर संस्थानचे महाराज सर कृष्णराज ओडियार यांच्याकडे पाठवले. म्हैसूर संस्थानचे दिवाण मिर्झा ईस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यकारभार व प्रशासकीय स्तरावरील बरेच कौशल्य आत्मसात केले. दरम्यान देवास संस्थानात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाल्याने इंग्रज सरकारने त्यांना देवासला निमंत्रित केले. लहानवयात विक्रमसिंहांनी अतिशय मुत्सद्दीपणाने व धाडसाने अनेक निर्णय घेत आर्थिक संकटातून देवास संस्थानाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले. देवास संस्थानचा या काळात इतर संस्थानांबरोबर सीमावाद मोठ्या प्रमाणात चालू होता. तो सीमावादही त्यांनी कुशलतेने हाताळला. देवास स्टेट कौन्सिल अध्यक्ष या नात्याने त्यांचे कार्य महत्त्वाचे होते (१९३४-३८).
विक्रमसिंहांचे वडील श्रीमंत तुकोजीराव पवार यांचे पाँडेचरी येथे निधन झाले (२१ डिसेंबर १९३७). १८ मार्च १९३८ रोजी विक्रमसिंह (देवास थोरली पाती) यांचा देवास संस्थानचे अधिपती म्हणून राज्याभिषेक झाला. देवास संस्थानच्या गादीवर आल्यानंतर विक्रमसिंह महाराजांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेत, आर्थिक बदलाबरोबर प्रशासकीय, पोलिस, महसूल, न्यायालयीन क्षेत्रातही आमूलाग्र बदल केले.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर विक्रमसिंहांनी इंग्रज सरकारकडे प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेण्याची विनंतीपूर्वक इच्छा व्यक्त केली (१९३९). इंग्रज सरकारने त्यांची विनंती मान्य करून त्यांना महू येथील अधिकारी प्रशिक्षण दलात (ऑफिसर्स ट्रेनिंग कोअर) पाठविले. प्रशिक्षण चालू असताना त्यांची ‘इमर्जन्सी किंग्ज कमिशन’ वर नेमणूक करण्यात आली (४ ऑगस्ट १९४१). ते बेळगाव येथील ‘२/५ मराठा लाईट इन्फंट्री’ मध्ये रुजू झाले (१६ ऑगस्ट १९४१). त्यानंतर त्यांना आफ्रिकेतील (वेस्टर्न डेझर्ट) युद्धक्षेत्रावर पाठवण्यात आले (ऑक्टोबर १९४१). दुसरे महायुद्ध सुरू असतानाच इंग्लंडचा राजा जॉर्ज सहावा यांनी विक्रमसिंह यांना के. सी. एस. आय. (Knight Commandar of the Star of India) ही पदवी बहाल केली. युद्धक्षेत्रावर प्रत्यक्ष शाहू महाराजांचे नातू सहभागी झाल्याची बातमी मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांना समजली, तेव्हा सैन्यात चैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विक्रमसिंह महाराजांनी प्रत्यक्ष युद्धात अनेक ठिकाणी सहभाग घेतला. एकदा त्यांना जीवनदानही मिळाले. २५ जानेवारी १९४१ रोजी त्यांची ॲक्टींग कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली. मात्र त्यांना काही अपरिहार्य कारणास्तव देवासला परत यावे लागले (३ मे १९४२).
भारतात परत आल्यावर व्हॉइसरॉयनी त्यांची ‘डबल ड्युटी कंपनी कमांडर’ म्हणून विशेष कर्तव्यावर (स्पेशल ड्युटी) नेमणूक करून देवास संस्थानचा राज्यकारभार करण्याची परवानगी दिली. १९४४ मध्ये इंग्रज सरकारने त्यांना कॅप्टनचा हुद्दा देऊन इटलीतील मराठा पलटणीवर देखरेख ठेवण्यासाठी पुन्हा युद्धक्षेत्रावर पाठवले. युद्धकाळात सहकार्य केल्याबद्दल इंग्रज सरकारकडून त्यांना मेजरचा हुद्दा, द अफ्रिका स्टार, द इटली स्टार, द डिफेन्स मेडल, द वॉर मेडल इ. बहुमानाने सन्मानीत केले. इंदूरचे महाराज वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला गेल्यानंतर या संस्थानचा अधिकचा राज्यकारभार विक्रमसिंह यांच्याकडे होता (१९४२-४३). या काळात त्यांनी इंदूरमध्येही अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. २७ डिसेंबर १९४२ रोजी अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या १८ व्या अधिवेशनाचे संयोजन केले. विक्रमसिंह महाराज स्वत: त्याचे उद्घाटक व बॅ. एम. आर. जयकर अध्यक्ष होते. इंदूरमधील राज्यकारभाराबद्दल तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी त्यांची विशेष प्रशंसा केली होती.
विक्रमसिंह यांचा कोल्हापूर संस्थानात १ जून १९४७ रोजी विधीवत राज्याभिषेक झाला आणि त्यांनी शहाजी छत्रपती महाराज या नावे राज्यकारभारास प्रारंभ केला. याच दिवशी त्यांनी कोल्हापूरसाठी नवीन राज्यघटना घोषित करून ती १९४८ पर्यंत अंमलात आणली जाईल, असे घोषित केले. यावेळी कोल्हापूरात स्वातंत्र्यचळवळ आणि प्रजापरिषदेची चळवळ जोमाने सुरू होती. १० ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थान मध्यवर्ती सरकारच्या घटना समितीत सहभागी होत असल्याचे जाहीर केले. २ नोव्हेंबर १९४७ रोजी प्रजापरिषदेच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्यास मान्यता दिली आणि माधवराव बागल (मुख्यमंत्री) सरकार स्थापन झाले (१५ नोव्हेंबर १९४७). मात्र बागल सरकार फार काळ टिकू शकले नाही, ते अंतर्गत मतभेदामुळे पडले. पुढे वसंतराव बागल यांच्या नेतृत्वाखाली दुसरे मंत्रीमंडळ स्थापन झाले. हे सरकार २२ मार्च १९४८ पर्यंत सत्तेत होते. १५ ऑगष्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. कोल्हापूर संस्थान मात्र १९४९ पर्यंत स्वतंत्र होते. शहाजी छत्रपती महाराज उदारमतवादी धोरणांचे पुरस्कर्ते असल्याने १ मार्च १९४९ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होत असल्याचे जाहीर केले. मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या उपस्थितीत खासबाग येथे मोठा सोहळा संपन्न झाला. शहाजी छत्रपती महाराजांनी दोन वर्षांच्या काळात कोल्हापूर राज्यात जबाबदार राज्यपद्धती अंमलात आणून प्रजेला राज्यकारभारात अधिकार देण्याचे महत्त्वाचे काम केले.
शहाजी छत्रपती महाराज यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी शिक्षण, कला, क्रीडा इत्यादींसाठी एकूण १२ विश्वस्त मंडळांची स्थापना करून त्यासाठी ६० लाख रुपये किंमतीच्या जागा आणि जमिनी दिल्या. कुस्तीबरोबरच त्यांनी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनची प्रगती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांना जानेवारी १९६२ मध्ये मेजर जनरल हा किताब प्रदान करण्यात आला. २८ जून १९६२ रोजी त्यांनी नागपूरकर भोसले घराण्यातील राजरामसिंह आणि शालिनीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीपसिंह यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले. १९६८ मध्ये त्यांनी प्लॅनिंग कमिशनच्या शिक्षणविषयक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले. राजर्षी छ. शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी शहाजी छत्रपती म्युझियमची स्थापना केली व राजवाड्यात भव्य असे संग्रहालय उभे केले (१६ जुलै १९७४). शिकारीबरोबरच त्यांना वाचनाची विशेष आवड होती. देश-परदेशातील हजारो ग्रंथ त्यांनी विकत घेतले होते. मराठा इतिहासासंबंधी त्यांचा गाढा अभ्यास होता. मराठ्यांच्या इतिहास लेखनास व संशोधनास त्यांनी उत्तेजन दिले. त्यांच्या प्रेरणेतून २५ हून अधिक ग्रंथांचे प्रकाशन झाले. एक इतिहासप्रेमी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. राजर्षी छ. शाहू महाराजांनी कोल्हापुरात दसरा चौक येथे स्थापन केलेल्या श्री शाहू मराठा विद्यार्थी वसतिगृह (सध्याची श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था) या संस्थेचे शहाजी छत्रपती महाराज हे पदसिद्ध अध्यक्ष (पेट्रन इन चीफ) होते. या संस्थेमार्फत त्यांनी कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले (१८ जून १९९७१). त्यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मरण म्हणून पुढे या महाविद्यालयाचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले (६ जानेवारी १९७३).
राधानगरी (कोल्हापूर) येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- गर्गे, स. मा. करवीर रियासत, तिसरी आवृती, कोल्हापूर.
- गर्गे, स. मा.; तस्ते, यशवंत संपा. अखेरचा मुजरा, शहाजी छत्रपती मुझियम ट्रस्ट, कोल्हापूर, १९४८.
- जाधव, शोभना, देवास अंडर विक्रमसिंह पवार, अप्रकाशित पीएच.डी. शोधप्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
समीक्षक : अवनीश पाटील