देशपांडे, सुरेश रघुनाथ : (४ मे १९३७ – २० नोव्हेंबर २०१८). मराठेशाहीच्या इतिहासाचे श्रेष्ठ अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि मराठी विश्वकोशाचे माजी विभाग संपादक. सु. र. देशपांडे, तसेच भैयासाहेब देशपांडे म्हणूनही परिचित. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. प्रसिद्ध इतिहासकार रावबहादूर डी. बी. पारसनीस हे त्यांचे मातुल आजोबा. सु. र. देशपांडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. इतिहास-राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण (एम. ए.) घेतले. त्यानंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथून पीएच. डी. संपादन केली. ‘यादव शिल्पशैली’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय.

देशपांडे यांनी काही काळ शिक्षक, प्राध्यापक म्हणून नोकरी केली (१९५९-६४). पुढे त्यांनी वाई (जिल्हा सातारा) येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोश कार्यालयात नोकरीस सुरुवात केली आणि वाई ही त्यांची कर्मभूमी झाली. १९६४ ते १९९४ पर्यंत त्यांनी विश्वकोशात संपादन सहायक, सहसंपादक म्हणून सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर ते विभाग संपादक, तसेच पुढे अखेरपर्यंत ज्येष्ठ अभ्यागत संपादक म्हणून कार्यरत होते. मराठी विश्वकोशाचे आद्यसंपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून मे. पुं. रेगे, रा.ग. जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड, दिलीप करंबेळकर यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीपर्यंत त्यांनी सु. ५४ वर्षे लेखन, संपादनाचे काम अव्याहत केले. मराठी विश्वकोशाच्या प्रकाशित १ ते २० खंडांत सु. ९०० हून अधिक नोंदींचे स्वतंत्र लेखन त्यांनी केले, तर अनेक नोंदींचे पुनर्लेखन-समीक्षण केले. विश्वकोशातील दीर्घ नोंदी किंवा व्याप्तिलेख, चरित्रात्मक नोंदी, तसेच राजे, राजवंश यांबरोबरच देश, जिल्हे यांचा त्यांनी लिहिलेला इतिहास संदर्भमूल्य म्हणून महत्त्वाचा आहे.

पर्वरी (गोवा) येथील विश्वचरित्र संशोधन केंद्राच्या विद्यमाने प्रकाशित झालेल्या विश्वचरित्र कोशाच्या सहा खंडांत देशपांडे यांनी सु. ८२७ व्यक्तिचरित्रे लिहिली. १९९७ पासून या चरित्रकोशाचे सन्माननीय सल्लागार, संपादक, लेखक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच या कोशाची सूची तयार करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. साहित्य अकादमीच्या एनसायक्लोपिडिया ऑफ इंडियन लिटरेचरच्या सुधारित आवृत्तीसाठी तसेच  महाराष्ट्र शिल्पकार कोश यांमध्येही अनेक चरित्रे लिहिली.

कोशवाङ्मयाव्यतिरिक्त देशपांडे यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यादव स्कल्प्चर (इंग्रजी १९८५, ६ वी आवृत्ती २००८), भारतीय कामशिल्प (१९८६, २ री आवृत्ती २०१४), मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार (१९९२, २ री आवृत्ती २००६), भारतीय गणिका (१९९४, २ री आवृत्ती २०१५), मार्गारेट मीड (१९९६, अनुवादित), सरस्वती दर्शन (२००२), मराठेशाहीतील मनस्विनी (२००४, ३ री आवृत्ती २०१०), भारतीय शिल्पवैभव (२००५, २ री आवृत्ती २०१८),पेशवेकालीन पुणे (२००७, अनुवादित), इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (२०१०), वाई : कला आणि संस्कृती (२०११), लव्ह इन स्टोन (२०१८, इंग्रजी) इत्यादी त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ.

त्यांच्या भारतीय कामशिल्प  या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाला (१९८९), भारतीय गणिका  या पुस्तकाची निवड ललित  मासिकाच्या वाचकवर्गाने निवडक ग्रंथांत केली होती. तर मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, भारतीय शिल्पवैभव  ही त्यांची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांच्या अभ्याससूचीत समाविष्ट झाली. मराठेशाहीतील मनस्विनी  या पुस्तकाचे मुंबईतील नॅब संस्थेकडून ब्रेल लिपीत रूपांतर करण्यात आले. याशिवाय आकाशवाणीसह विविध प्रसिद्ध नियतकालिकांतून त्यांनी स्फूटलेखन केले.

श्रेष्ठ इतिहासकार ग. ह. खरे हे त्यांचे मार्गदर्शक. ऐतिहासिक साधनांचा धांडोळा घेऊन लेखन करण्यात देशपांडे वाकबगार होते. प्रचंड अभ्यास आणि मौलिक संदर्भसाधने वापरून त्यांनी केलेले लेखन सर्व इतिहास अभ्यासकांसाठी अनुकरणीय आहे. भारतीय गणिका  या ग्रंथात त्यांनी प्राचीन भारतीय समाजात दीर्घकाल अस्तित्वात असलेल्या गणिका या संस्थेविषयी सूक्ष्म व सुसूत्र मांडणी केली. यात त्यांनी प्राचीन भारतीय व विदेशी रमणींविषयी थोडक्यात माहिती देऊन गणिकासदृश्य कलावंतीणीची तौलनिक व अभ्यासपूर्ण चर्चा केली आहे. मराठेशाहीतील मनस्विनी  हा त्यांचा ग्रंथ मराठा इतिहासातील महिलांच्या कर्तृत्वाचे विवेचन आहे. मराठेशाहीत आणि पेशवाईत राज्य चालविताना परचक्राच्या व गृहकलहाच्या रूपाने आलेल्या संकटांवर मात करून यशस्वी ठरलेल्या स्त्रियांची जीवनचरित्रे त्यांनी या ग्रंथात मांडली.

गणिक : द इंडियन कोर्टिझॅन (इंग्रजी), तसेच राज्यशास्त्र कोश  हे त्यांचे संकल्पित ग्रंथ. यांसाठी आवश्यक टिपणे त्यांनी तयार केली होती; तथापि अल्पशा आजाराने वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • देशपांडे, सुरेश रघुनाथ, भारतीय गणिका, पुणे, १९९४.
  • देशपांडे, सुरेश रघुनाथ, मराठेशाहीतील मनस्विनी, पुणे, २००४.

                                                                                                                                                                             समीक्षक : सचिन जोशी