अल्किल हॅलाइडाची डायएथिल ईथरच्या द्रावणामध्ये सोडियमाशी अभिक्रिया होऊन अल्केन तयार होतो, या अभिक्रियेला व्ह्यूर्त्स अभिक्रिया (वर्ट्झ विक्रिया) असे म्हणतात. ही संयुग्मीकरण अभिक्रिया आहे. या अभिक्रियेचा शोध फ्रेंच शास्त्रज्ञ शार्ल आदोल्फ व्ह्यूर्त्स (Charles Adolphe Wurtz) यांनी १८५५ मध्ये लावला.
सामान्य विक्रिया :
(यामध्ये R— अल्किल गट व X— हॅलोजनाचा अणू आहे).
व्ह्यूर्त्स अभिक्रियेत अल्किल हॅलाइडाचे सोडियमच्या सान्निध्यात संयुग्मीकरण होऊन (दोन हायड्रोकार्बन मूलकांचे एकत्रिकरण होऊन) समकार्बन संख्येचा उच्च श्रेणी अल्केन (Higher alkane) तयार होतो. ही अभिक्रिया होताना निर्जल डायएथिल ईथरचा द्रावक (माध्यम) म्हणून उपयोग होतो. या अभिक्रियेत दोन भिन्न अल्किल हॅलाइडे वापरली असता अल्केनांचे मिश्रण तयार होते. या मिश्रणातील अल्केन आंशिक ऊर्ध्वपातन विलगीकरण (Fractional distillation) पध्दतीने मिळविता येतात. उदा.,
C2H5I + 2 Na + CH3I → C2H5-CH3 + 2 NaI
2 C2H5I + 2 Na → C2H5-C2H5 + 2 NaI
2 CH3I + 2 Na → CH3-CH3 + 2 NaI
रासायनिक यंत्रणा : (Reaction mechanism). वरील अभिक्रियेत प्रथमत: सोडियमच्या एका अणुकडून एक इलेक्ट्रॉन अल्किल हॅलाइडाकडे जातो. त्यापासून अल्किल मूलक आणि सोडियम क्षार तयार होतात. सोडियमाच्या दुसऱ्या अणूकडून आणखी एका इलेक्ट्रॉनचे त्याच अल्किल मूलकाकडे जाऊन अणुकेंद्रस्नेही (Nucleophilic) अल्किल ऋण आयन तयार होते. हे कार्बनी ऋण आयल दुसऱ्या अल्किल हॅलाइडच्या रेणूवर आक्रमण करते आणि अणुकेंद्रस्नेही प्रतिष्ठापन अभिक्रिया (Nucleophilic substitution reaction SN2) घडून येते. यापासून अल्केन आणि सोडियम हॅलाइड क्षार तयार होतात.
या विक्रियेकरिता चांदी, झिंक, लोह, सक्रियित (Activated) तांबे, इंडियम आणि मँगनीज व कॉपर क्लोराइडचे मिश्रणही वापरतात.
उपयुक्तता : व्ह्यूर्त्स विक्रियेचा वापर समकार्बनी अल्केन तयार करण्यासाठी केला जातो.
त्रुटी : (१) व्ह्यूर्त्स विक्रियेद्वारे विषम कार्बनी अल्केन मिळविता येत नाही.
(२) तृतीयक हॅलाइडांच्या (Tertiary halides) बाबतीत ही विक्रिया उपयुक्त ठरत नाही.
(३) या विक्रियेमध्ये मुक्त मूलकांचा समावेश असल्याने अल्किनाचा उपउत्पाद (By product) तयार होतो.
पहा : व्ह्यूर्त्स, शार्ल आदोल्फ.
संदर्भ :
- https://www.organic-chemistry.org/namedreactions/wurtz-reaction.shtm
समीक्षण : श्रीनिवास सामंत