रुपया प्रकारातील चांदीचे एक चलनी नाणे. मिरज येथील गंगाधरराव पटवर्धन या पेशव्यांच्या सरदारांनी हे नाणे पाडले. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या मूळ चलनव्यवस्थेसोबतच मोगली चलनव्यवस्थेचाही स्वीकार केला. त्यानुसार दैनंदिन व कमी किमतीच्या व्यवहारासाठी तांब्याचा पैसा हे नाणे पूर्वीप्रमाणे कायम राहिले; परंतु मध्यम व मोठ्या किमतीच्या व्यवहाराकरिता चांदीचे रुपये व सोन्याची मोहोर या नाण्यांचा वापर खूप वाढला. त्यातूनच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी वेगवेगळ्या चिन्हांनी युक्त असे चांदीचे रुपये पाडले जाऊ लागले.

गणपती-पंतप्रधान रुपया, वजन ११.३३ ग्रॅम, धातू : चांदी.

गणपती-पंतप्रधान रुपया हे नाणे पाडण्यामागे पटवर्धन घराण्यातील अंतर्गत संघर्षाची पार्श्वभूमी आहे. १७६१ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी गोविंद हरी पटवर्धन यांना मिरजेचे ठाणे व आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. गोविंद हरी मिरजेत त्यांच्या मृत्यूपर्यंत राहिले (१७७१). त्यांना गोपाळराव, वामनराव, पांडुरंगराव आणि गंगाधरराव हे चार पुत्र होते. पैकी ज्येष्ठ पुत्र गोपाळराव आणि द्वितीय पुत्र वामनराव हे दोघे अनुक्रमे १७७१ आणि १७७५ मध्ये मरण पावल्यामुळे तृतीय पुत्र पांडुरंगराव यांनी तेव्हा मिरजेच्या जहागिरीचा ताबा घेतला. हैदरअलीविरुद्धच्या एका लढाईत पांडुरंगराव शत्रूच्या हाती लागले व तुरुंगातच १७७७ साली मरण पावले. पांडुरंगराव यांना हरिहरराव नामक एक मुलगा होता. त्यांच्या नावे तासगावकर परशुरामभाऊ काही काळ कारभार पाहात होते. १७८२ साली परशुरामभाऊंनी हरिहररावांचा धाकटा भाऊ चिंतामणराव यांच्याकडे मिरजेचा कारभार सोपविला. चिंतामणरावही तेव्हा अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या नावे कुणा अनुभवी माणसाने कारभार पाहणे आवश्यक होते. परशुराम भाऊंकडून ही जबाबदारी गोविंद हरींचा चतुर्थ पुत्र गंगाधररावांकडे गेली.

प्रत्यक्ष कारभार गंगाधररावांकडे असल्याने त्यांनी स्वत: बराच प्रदेश बळकावला. चिंतामणराव हे टिपू व कोल्हापूरकरांविरुद्धच्या युद्धांत गुंतल्यामुळे त्यांना मिरजेहून बराच काळ बाहेर राहावे लागले. त्याचा फायदा घेऊन गंगाधरराव यांनी मिरजेचा किल्लाही ताब्यात घेतला (१७९९). चिंतामणराव परत आल्यावर त्यांनी शिताफीने हालचाल करून मिरजेचा किल्ला सोडल्यास सर्व प्रदेश ताब्यात घेतला. गंगाधररावांना किल्ल्यात कोंडून घेणे भाग पडले. पटवर्धन घराण्यातील इतरांनी त्यांच्यासाठी रदबदली केल्यावर त्यांना जिवंत सोडण्यात आले आणि दोहोंमध्ये मिरज प्रांताची योग्य विभागणी करण्याकरिता दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आला. त्याप्रमाणे पेशव्यांकडून मिरज प्रांताची विभागणी करण्यात येऊन दोहोंना जवळपास समसमान वाटणी करण्यात आली. गंगाधररावांकडे मिरज शहर आले, तर चिंतामणराव यांनी स्वत:कडील प्रदेशाची सांगली ही राजधानी केली. १८०८ साली गंगाधररावांनी पेशव्यांना नजराणा देऊन चिंतामणरावांच्या आधिपत्यापासून सुटका करून घेतली. त्याच वर्षी गणपती-पंतप्रधान रुपया हे नाणे पाडण्यात आले.

मराठा कालखंडाच्या काळात चलनात तांब्याचे पैसे छत्रपतींच्या नावे, तर रुपये व मोहरा मोगल बादशाहच्या नावे पाडल्या जात. गणपती-पंतप्रधान रुपया हे नाणे हा चांदीचा रुपया असल्याने नामधारी मोगल बादशाह शाह आलमच्या नावे पाडण्यात आलेले आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी त्यावर फार्सी व देवनागरी अशा दोन्ही लिपींतून मजकूर कोरलेला आहे. समोरच्या बाजूस देवनागरी लिपीत ‘श्री गणपती’ व फार्सी लिपीत ‘शाह आलम बादशाह गाझी सनह १२२’ असा मजकूर आहे, तर मागील बाजूस देवनागरी लिपीत ‘श्री पंतप्रधान’ व फार्सी लिपीत ‘मैमनत मालूस सनह २७ जुलूस झर्ब मूर्तझाबाद’ असा मजकूर आहे. झर्ब म्हणजे टांकसाळ व मूर्तझाबाद हे मिरजेचेच एक मोगल काळातील बदललेले नाव आहे. त्यावरून हे नाणे मिरजेत पाडल्याची खातरी पटते. या नाण्यावरील ‘सनह २७ जुलूस’ म्हणजे जुलूस वर्ष २७ वे. जुलूस म्हणजे मोगल बादशहाच्या राज्यारोहणानंतरचे वर्ष. शाह आलम १७५९ साली राज्यारूढ झाला, सबब त्याच्या जुलूस २७ वर्षी १७८६ साल येते. परंतु समोरच्या बाजूच्या ‘सनह १२२’ चा अर्थ हिजरी सन १२२ असा होतो. आता हिजरी सन १२२ या वर्षी १७८६ साल येत नाही. त्यामुळे हे साल अपूर्ण लिहिले आहे, हे उघड आहे. अठराव्या शतकातील कैक नाण्यांमध्ये हिजरी सन असा अपूर्ण लिहिलेला आढळतो. त्यावरून हिजरी सन १२२० ते १२२९ च्या दरम्यानचाच अभिप्रेत असावा, हे स्पष्ट आहे. जुलूस २७ हे राज्यारोहणाचे वर्ष जर शाह आलमचे न घेता गंगाधररावांचे मानले, तर मात्र या तपशिलांचा मेळ बरोबर लागतो. १७८२ साली चिंतामणरावांच्या नावे गंगाधररावांनी मिरजेचा कारभार पाहणे सुरू केले. त्यामुळे १८०८ साली त्या दिवसानंतरचे वर्ष २७ वे येते. तसेच १८०८ सालचा हिजरी सनही १२२४ आहे, जो १२२०-२९ मध्येच येतो.

मिरजेच्या नेहमीच्या चलनापेक्षा हे नाणे वेगळे आहे. नेहमीच्या चलनी रुपयांवर ‘ग’ हे अक्षर असे किंवा कैकदा नसेही. या नाण्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर पेशवे आणि पटवर्धन यांच्या आराध्य देवतेचे (गणपतीचे) व पटवर्धनांच्या अधिपतींचे (पेशव्यांचे) नाव देवनागरी अक्षरांत कोरलेले आहे. मराठेशाही नाण्यांवर कोणत्याही प्रकारे पेशव्यांचे नाव असण्याची उदाहरणे दोनच – एक सोन्याचा फनम आणि दुसरे म्हणजे गणपती-पंतप्रधान नाणे. अन्यथा छत्रपतींच्या सरदारांची नावे नाण्यांवर सहसा आढळत नाहीत. हे नाणे तूर्त दुर्मीळ असून, यातच अर्धा रुपया, पाव रुपया हेही प्रकार येतात. हे रुपयाचे नाणे चांदीचे असून याचे वजन ११.३३ ग्रॅम व व्यास २१ मिमी. आहे. त्यांवरील मजकूर जसाच्या तसा असून, फक्त वजनात फरक असतो. अर्ध्या रुपयाचे वजन पूर्ण रुपयाच्या अर्धे म्हणजे ५.६० ग्रॅम, तर पाव रुपयाचे वजन पावपट म्हणजे २.८० ग्रॅम असते. यातील पूर्ण रुपयापेक्षा अर्धे आणि पाव रुपये अतिदुर्मीळ आहेत. हे नाणे काही विशेष प्रसंगी पाडलेले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.

संदर्भ :

  • Kapoor, Mohit, ‘The Ganapati-Pantpradhan Coins of Miraj’, Journal of the Oriental Numismatic Society, Vol. 224, pp.37-38, London, UK, 2015.
  • Maheshwari, K. K. & Wiggins, K. Maratha Mints and Coinage, Indian Institute of Research in Numismatic Studies, Nashik, India, 1989.
  • छायासौजन्य : https://zeno.ru

                                                                                                                                                                                         समीक्षक : संदीप परांजपे