एक आसनप्रकार. ‘चक्र’ या संस्कृत शब्दाचा अर्थ चाक असा आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर गोलाकार होते म्हणून याचे नाव ‘चक्रासन’ असे पडले आहे. अहिर्बुध्न्यसंहिता (चवथे शतक), नारायणतीर्थ यांची योगसिद्धान्तचन्द्रिका (सतरावे शतक) आणि श्रीनिवासयोगी यांची हठरत्नावली (सुमारे १७-१८ वे शतक) या ग्रंथांत या आसनाचा निर्देश आढळतो. अहिर्बुध्न्यसंहितेनुसार या आसनाचे वर्णन पुढीलप्रमाणे — शरीर सरळ ठेवून सव्य म्हणजे डाव्या मांडीचा खालचा भाग उजव्या पायाच्या घोट्यावर आणि उजव्या मांडीचा खालचा भाग डाव्या पायाच्या घोट्यावर ठेवणे या स्थितीला चक्रासन म्हणतात (अहिर्बुध्न्यसंहिता ३१.३३).
योगसिद्धान्तचन्द्रिकेत या आसनाची कृती पुढीलप्रमाणे दिली आहे — शवासनाच्या स्थितीत दोन्ही पाय मस्तकाच्या मागे, डावा पाय उजवीकडे व उजवा पाय डावीकडे अशा पद्धतीने न्यावेत. या आसनामुळे गुल्म, प्लीहा (पाणथरी) व वात यासंबंधीचे रोग नष्ट होतात (योगसूत्र २.४६ वरील श्लोक क्र. १५). या आसनात पाठीची पूर्ण कमान होते, शरीराची चक्राप्रमाणे गोलाकार रचना होते. ही कृती कष्टसाध्य आहे.
जनार्दनस्वामी व अन्य योगविशारदांनी चक्रासनाच्या कृतीत परिवर्तन केले आहे. जनार्दनस्वामी यांनी चक्रासनाची कृती पुढीलप्रमाणे सांगितली आहे — जमिनीवर उताणे झोपावे. त्यानंतर गुडघे वर करून दोन्ही पाय पृष्ठभागाजवळ आणून हातांचे तळवे कानांच्या जवळ जमिनीवर पालथे ठेवावेत. कंबर वर उचलावी. दृष्टी हातांकडे असावी. हळूहळू हात आणि पाय जवळ आणावेत. ही ह्या आसनाची पूर्णस्थिती होय. नंतर शरीर जमिनीवर टेकवावे.
लाभ : या आसनामुळे मेरुदंड, कंबर, हात, पाय, छाती, गळा, पोट आणि मान यांचे विकार दूर होतात. पचनशक्ती सुधारते. स्नायू आणि ग्रंथी बळकट व कार्यक्षम होतात. तसेच हे आसन डोळ्यांसाठी हितकारक आहे.
स्वामी कुवलयानंद यांनी विकसित केलेली चक्रासनाची कृती पुढीलप्रमाणे आहे — दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर ठेवून सरळ उभे रहावे. उजवा हात उजव्या बाजूने सरळ वर न्यावा. हाताचा पंजा वर नेताना आकाशाकडे करावा. दंड उजव्या कानाला लागला की उजवा हात किचिंत वर ताणून डाव्या बाजूस झुकावे. पोटाच्या उजव्या बाजूला ताण पडेल. सरळ समोर बघावे. श्वास रोखू नये. मागे किंवा पुढे झुकू नये. १०—१५ सेंकद या स्थितीत थांबून आधी मेरुदंड सरळ करावा. मग हात खाली आणावा. हीच कृती डाव्या हाताने करावी. हे आसन २-३ वेळा करता येते. याला अर्धचंद्रासन असेही नाव आहे.
हठयोगाच्या कोणत्याही आसनामध्ये मेरुदंड डावीकडे किंवा उजवीकडे झुकेल, वाकेल अशी कृती नाही. शरीरशास्त्रानुसार मणक्यांच्या स्वास्थ्यासाठी असा ताण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे हे आसन उपयुक्त ठरते.
लाभ : उपरोक्त कृतीनुसार केलेल्या चक्रासनात मेरुदंड डाव्या व उजव्या बाजूस झुकविला जातो. त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. मणक्यांमधील कुर्चे (चकत्या) सरकू शकत नाहीत. कंबरेचे दुखणे बरे होते. मेरुवक्रता हा दोष या आसनाने बऱ्याच अंशी दूर होतो. पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूस चरबीच्या वळ्या असतील तर त्या नाहीशा होतात. फुप्फुसांची क्षमता वाढते. मानसिक संतुलन वाढते. उंची वाढण्यासाठी हे आसन उत्तम आहे.
विधिनिषेध : हे आसन करताना एकाच बाजूला ताण जास्त पडणार नाही व तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी.
समीक्षक : दीपक बगाडिया