एक आसनप्रकार. हे आसन करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा दिसतो म्हणून या आसनाला त्रिकोणासन म्हणतात.

त्रिकोणासन

कृती : आसनपूर्व स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून दोन्ही तळहात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पाय जवळ घेऊन हात शरीराच्या बाजूला ठेवून स्थिर उभे राहावे. दोन्ही पाय एकत्र घेताना पायाचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ असावेत. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. श्वासाची गती नैसर्गिक ठेवून दोन्ही पायांच्यामध्ये साधारणपणे साडेतीन ते चार फुटांचे अंतर ठेवावे. पाठीचा कणा सरळ ठेवावा. उजवे पाउल ९० अंशामध्ये उजवीकडे फिरवावे. हे करत असताना उजव्या पायाची टाच आणि डाव्या पावलाचा कमानी भाग एका रेषेत असावा. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान असेल याकडे लक्ष असावे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ जमिनीला समांतर ठेवत सावकाश उजवा हात उजव्या बाजूला जमिनीकडे तर डावा हात आकाशाच्या दिशेला खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावा. समोरच्या दिशेला न झुकता कंबरेत उजव्या बाजूस वाकत सहज जमेल अशा रीतीने उजवा हात उजव्या पायाच्या घोट्यावर किंवा उजव्या पावलाच्या मागील बाजूस जमिनीवर ठेवावा. डावा हात कोपरातून सरळ ठेवत छताकडे ताणत दृष्टी समोरच ठेवावी. दोन्ही पाय गुडघ्यात ताठच असावेत. प्राणधारणेचा अभ्यास करावा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्या क्षमतेप्रमाणे आसन करावे. नंतर सावकाश उजव्या बाजूने वर यावे. आता उजवे पाऊल सरळ करून डावे पाऊल ९० अंशामधे डावीकडे वळवावे व वरील कृती डाव्या बाजूला करावी. डाव्या बाजूने वर आल्यावर दोन्ही हात जमिनीला समांतर येतील. हात खाली घ्यावे व ९० अंशातील डावे पाऊल सरळ ठेवावे. दोन्ही पाय एकत्र घेऊन आसनपूर्व स्थितीत यावे.

लाभ : या आसनाने कंबर, माकडहाड, मांडीचे सांधे आणि स्नायू, खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतात. पाय, गुडघे, घोटे, हात आणि छाती यामध्ये बळकटी येते. पचनक्रिया, श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते. दररोज त्रिकोणासनाचा अभ्यास केल्याने वातामुळे होणारे शरीरातील आजार कमी होतात व कालांतराने ते उद्भवतच नाहीत. अकारण भीती आणि ताण-तणाव यामुळे होणारी अस्थिरता कमी होते. मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.

पूर्वाभ्यास : कटीचक्रासन, वीरभद्रासन, ताडासन या आसनांचा अभ्यास दररोज करावा. सुरुवातीला हात जमिनीपर्यंत पोहोचत नसल्यास गुडघ्याच्या रेषेत ठेवावे परंतु, पुढे झुकु नये. पाय गुडघ्यात वाकवू नयेत. संधिचालन क्रियांचा अभ्यास करावा.

विविध प्रकार : त्रिकोणासन काही वेळेस पाऊल ९० अंश न वळवता केवळ हात बाजूला आणूनही केले जाते. ज्यांच्या शरीरात बळकटी नाही आणि आसन उभे राहून करण्यास शक्य नाही त्यांनी काही दिवस त्रिकोणासन पाठीवर झोपून करावे.

विधिनिषेध : मानदुखी, खांद्यातील स्नायूंमध्ये ताठरता असल्यास लगेचच हे आसन करू नये. मेरूदंडाचे विकार, कमी रक्तदाब असल्यास त्रिकोणासन टाळावे. तसेच गरोदरपणात हे आसन करू नये. पित्त अथवा संधिवाताचा त्रास असल्यास या आसनाचा अभ्यास टाळावा. शक्यतो आसन योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

संदर्भ :

  • Ann Swanson, Science of Yoga, DK Publishing, New York, 2019.
  • T. Krishnamacharya, Yoga Makaranda or Yogasaram (The Essence of Yoga), Mysore Royal Family Publishers, Mysore, 1934.

समीक्षक : नितीन तावडे