एक आसनप्रकार. कूर्म म्हणजे कासव. या आसनामध्ये शरीराची अंतिम स्थिती कासवासारखी दिसते म्हणून या आसनाला कूर्मासन असे म्हणतात.

कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून हात शरीराच्या मागील बाजूस ठेवून डोके कोणत्याही एका बाजूला किंवा मध्ये ठेवून शिथिल स्थितीत जमिनीवरील आसनावर बसावे.

कूर्मासन

कूर्मासन स्थितीत येण्यासाठी दोन्ही पाय शिथिल स्थितीतून एकत्र घ्यावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवून व्यवस्थित दंडासनात बसावे. आता दोन्ही पायांमध्ये जितके शक्य होईल तितके अंतर ठेवावे. पायाच्या टाचा जमिनीवर घट्ट धराव्यात. आता दोन्ही हात मांड्यांवर असतील. सावकाश हात आणि शरीर पुढे न्यावेत. शरीर पुढे नेताना पाठीच्या खालील बाजूतून पुढे वाकावे म्हणजे पाठीचा बाक होणार नाही आणि पायावरही सुखावह ताण जाणवेल. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये थोडे वाकवून आपले दोन्ही हात हे गुडघे आणि जमिनीच्या फटीतून बाहेर काढावेत. म्हणजेच उजवा हात उजव्या गुडघ्याच्या खालील बाजूतून बाहेर काढायचा, तर डावा हात डाव्या गुडघ्याच्या खालील बाजूतून बाहेर काढायचा. शरीर पुढे नेणे आणि हात गुडघ्यांतून बाहेर नेणे ह्या दोन्ही प्रक्रिया जवळजवळ एकत्रच सुरू राहतील. आता खांदे जमिनीकडे जाईपर्यंत आणि हनुवटी जमिनीला स्पर्श करेपर्यंत हात बाहेर जातील. ही आकृती कासवासारखी दिसते. आता अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करून प्राणधारणेचा अभ्यास करावा. प्राणधारणा म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे. हे आसन आपल्या क्षमतेनुसार नैसर्गिक श्वसन सुरू ठेवत करावे.

कूर्मासनातून बाहेर येण्यासाठी प्रथम सावकाश डोळे उघडावे. शरीर वर उचलत हात गुडघ्यांच्या आत घ्यावेत. शरीर सरळ करावे. आता पुन्हा शिथिल स्थितीत यावे.

कूर्मासन

लाभ : कूर्मासनामुळे पाठीच्या कण्याला चांगला सुखावह ताण मिळतो. तिथे रक्तसंचालन व्यवस्थित होते. मेरुदंडाचा लवचिकपणा वाढतो. आपल्या शरीरातील सांध्यांना म्हणजेच हाताची बोटे, मनगट, खांदे, गुडघे, घोटा यांना व्यायाम मिळतो. त्यांची लवचिकता वाढते. दोन्ही पायांना मांड्यांकडे व आतील बाजूस ताण मिळाल्याने स्नायूंची लवचिकता वाढते. शरीरातील आळस निघून जातो व ताजेतवाने वाटते. श्वसनसंस्था, चयापचय क्रिया यांचे कार्य सुधारते. शारीरिक व मानसिक शांतता लाभते.

पूर्वाभ्यास : जानु शिरासन, पश्चिमोत्तानासन, भद्रासन, हस्तपादासन, हनुमानासन या आसनांचा नियमित अभ्यास कूर्मासनाच्या आधी करावा.

विविध प्रकार : कूर्मासन हे दोन्ही हात गुडघ्याच्या बाहेर काढून नंतर मागील बाजूस नेऊन दोन्ही हातांची बोटे गुंफुनही केले जाते. तर हठयोगप्रदीपिकेमध्ये कूर्मासन हे दोन्ही टाचांवर गुद्द्वारावर दाब देऊन व्यवस्थित तोल सावरावा व आसन करावे असे दिले आहे.

विधिनिषेध : उच्च रक्तदाब, हृदयरोग, मणक्यांचे आजार, संधिवात, हर्निया, स्लिप-डिस्क इत्यादी आजार असल्यास तसेच खांदे, कोपर यांचे स्नायू कमजोर असल्यास त्याचप्रमाणे गुडघेदुखी, सायाटिका असल्यास या आसनाचा अभ्यास टाळावा. शक्यतो आसन योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

संदर्भ :

  • Haṭhapradīpikā of Svatmarama edited by Swami Digambarji & Pt. Raghunathashastri Kokaji, Kaivalyadham, S.M.Y.M Samiti, Lonavala, 2018.
  • Iyengar BKS, Light on Yoga,  Schocken books, New York, 1966.
  • Srivatsa Ramaswami, The complete book of Vinyasa-yoga, Da Capo Press, p.77.
  • Swami Satyananda Saraswati, Asana, Pranayama, Mudra, Bandha, Yoga Publication Trust, Munger, 2008.

समीक्षक : नितीन तावडे