फोल्की, कार्ल : ( २६ जून १९५५ ) कार्ल फोल्की यांचा जन्मस्वीडनमधील, स्टॉकहोम शहरात झाला. स्टॉकहोम, नोबेल पारितोषिक देण्याचा समारंभ संपन्न होण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

अर्थशास्त्र, उद्योगधंदे आणि प्रशासन, तसेच जीवशास्त्रातील पर्यावरण शास्त्र या भिन्न ज्ञानशाखांतील पदव्या फोल्की  यांनी मिळवल्या  फोल्की यांना स्टॉकहोम विद्यापीठाच्या नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ सिस्टम्स इकॉलॉजीमधून पीएच्.डी. मिळाली. त्यांच्या पीएच्.डी.च्या मार्गदर्शिका होत्या, प्रा. ॲन मारी जॅन्सन. फोल्की यांनी सामन माशांना पाणथळ जागांच्या परिसंस्थेकडून किती प्रमाणात जीवनाधार मिळू शकतो आणि तो वाढवता येईल का याचे मूल्यमापन केले. त्यांनी आपल्या अभ्यासात, परिसंस्थेकडून मिळू शकणाऱ्या जीवनाधाराचा सामाजिक आणि अर्थशास्त्रीय विकासाच्या दृष्टीनेही विचार केला होता.

नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शाखेमध्ये ते असोसिएट प्रोफेसर आणि नंतर पूर्ण वेळ प्रोफेसर झाले.

फोल्की यानी त्यांच्या विद्वत्तेला आणि कर्तृत्वाला साजेशी अनेक पदे भूषविली आणि तेथे त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना अनेक गौरव प्राप्त झाले.  त्यांनी बीआयईईचे उपसंचालक म्हणून काम पाहिले. फोल्कींना निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी प्यू (PEW) स्कॉलर ॲवार्ड दिले गेले.

फोल्की फोल्की, स्टॉकहोम रेसिलिअन्स सेंटरच्याविज्ञान विभागाचे संचालक होते. द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली.  इकॉलॉजीकल सोसायटी ऑफ अमेरिकाचे सस्टेनॅबिलिटी सायन्स ॲवार्ड फोल्कीना देण्यात आले.

फोल्की द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या,बायर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजीकल इकॉनॉमिक्सचे (BIEE) संचालक होते. त्याआधी त्याना सेंटर फॉर ट्रान्सडिसिप्लनरी एन्व्हायरॉनमेंटल रिसर्चच्या संचालकपदाचा अनुभव होता.

फोल्की यांनी मासेमारीच्या लहानशा तलावांपासून, महासागरांपर्यंतच्या विशाल जलाशय परिसंस्थांवर आणि संपूर्ण पृथ्वी हीच महापरिसंस्था मानून, तीस वर्षांपेक्षा जास्त काळ  सातत्याने परिसंस्थांवर काम केले. १७८४ मध्ये जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यापासून चढत्या प्रमाणात औद्योगिकीकरण आणि प्रदूषण होऊ लागले. या औद्योगिक मनुष्य युगाचा Anthropocene epoch चा फोल्कींनी खास अभ्यास केला आहे.फोल्कींच्या असे लक्षात आले की अर्थशास्त्रज्ञ निसर्गाचा विचार करत नाहीत. याउलट पर्यावरणशास्त्रज्ञ फक्त निसर्गाचा विचार करतात. माणसांचा आणि आर्थिक विकासाचा नाही. असे एकांगी विचार करणे थांबले, ते स्कँडेनेव्हिया जवळच्या उत्तर-ॲटलांटिक महासागरात तेल सापडले आणि काही मोठे पर्यावरणीय उत्पात घडले तेव्हा.

त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी  के. यु. लीवेन विद्यापीठाने फोल्की यांना मानद डॉक्टरेट दिली. आपल्या विचारांचे, कामाचे सार ते पृथ्वीवरचे जीवन तगले तरच उद्योगधंदे आणि अर्थकारण टिकेल, मृत ग्रहावर नाही. अशा एका वाक्यात सांगतात. त्यांच्या मते उशिरा का होईना पण हळूहळू बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून राज्यकर्त्यांपर्यंत ही जाणीव पोहोचत आहे.

फोल्कींना वाटते की निसर्ग (त्यात मानवही आलाच)  चिवट (resilient) आहे. त्यामुळे आजतागायत झालेल्या आघातांतून मानवजात बहुधा सावरू शकेल. परंतु निसर्गाच्या चिवटपणालाही मर्यादा असतात. त्यापलीकडे झालेला थोडासा ऱ्हासही सतत वाढत्या प्रमाणात वेगाने संपूर्ण जीवसृष्टीचा अटळ नाश घडवत राहील. कदाचित कोणते तरी जीवप्रकार पृथ्वीवर तग धरून राहतीलही पण त्यांत माणूस नसेल.

इंटरनॅशनल जिओग्राफिकल युनियन प्लॅनेट अँड ह्युमॅनिट या पदकाने फॉल्की यांचा गौरव करण्यात आला. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठाने आणि नेदरलँड्सच्या वॅगेनिंजन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदव्या दिल्या. शाश्वत विकास शास्त्रातील गनरस (Gunners) ॲवार्ड त्यांना मिळाले. द यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, या प्रतिष्ठित संस्थेचे परदेशीयांसाठीचे सदस्यत्वही त्यांना दिले.

निसर्गातील कोणता ना कोणता आविष्कार, प्रत्येक माणसाला आवडेल आणि त्याला संवेदनक्षम आणि पर्यावरणप्रेमी बनवू शकेल अशी आशा ते करतात.

फोल्कींनी कला दिग्दर्शक, लार्स हॉल यांच्याबरोबर ‘रिफ्लेक्शन्स – ऑन पीपल अँड द बायोस्फिअर’ नावाचे एक  कलात्मक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याच्या केंद्रस्थानी आहे – ग्रील्सकारेत हे स्टॉकहोम जवळचे अतिखडकाळ बेट.  वाचकांत शास्त्रीय संशोधनाबद्दल कुतूहल निर्माण करणे, आणि मानव जातीपुढील महत्वाच्या समस्यांबद्दलचे आकलन वाढवणे या हेतूने फोल्कींनी त्यातील  शब्दांकन केले आहे तर हॉलनी छायाचित्रे पुरवली आहेत. फोल्कींनी लिहिलेली गाणीही ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकात आहेत.

फोल्कींनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांत तीनशेच्यावर संशोधनपर लेख लिहिले आहेत. नेचर, सायन्स, प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS), इकॉलॉजिकल इकॉनॉमीही त्यापैकी काही प्रकाशने.

फोल्कींनी एकट्याने किंवा सहलेखकांबरोबर, दहा पुस्तके लिहिली किंवा संपादित केली आहेत. रॉयल सोसायटी, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेससारख्या प्रकाशन संस्थांनी ती प्रकाशित केली आहेत.  फोल्की इकॉलॉजी अँड सोसायटी या विज्ञान नियतकालिकाचे सहसंपादन करीत आहेत.

फोल्की यांनी प्रा. माधव गाडगीळ यांच्या सहकार्याने भारतातील परिसंस्थांच्या जतनात आणि व्यवस्थापनात स्थानिक, ग्रामीण, आदिवासी, वनवासी लोकसुद्धा किती मोलाची भर घालू शकतात याचा अभ्यास केला आहे. ऑस्ट्रेलियातील सागरी जीव, दक्षिण अमेरिकेतील ऊरुग्वेमधील वन्य जीवन यावर सचित्र लेख लिहिले आहेत.

फोल्की सध्या ग्लोबल इकॉनॉमिक्स अँड द बायोस्फिअर – GEDB  या प्रकल्पाचे संचालक आहेत ग्रेट्चेन डेली, या अमेरिकन विषुववृत्तीय पर्यावरणशास्त्रज्ञ, फोल्कीना दोन प्रकल्पात मदत करत आहेत. ते म्हणजे वॉलेनबर्ग फाउंडेशन आणि स्टॅन्फर्ड विद्यापीठ संचालित, GRAID (Guidance for Resilience in the Anthropocene: Investments for Development) आणि SeaBOS कार्यक्रम. सीबॉस उपक्रम – सीफूड बिझनेस फॉर ओशन स्टेवर्डशिप नावाप्रमाणेच सागरातील मासे आणि अन्य खाद्यजीवांचा वापर आणि संवर्धन यासाठी आहे. त्यात उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च नेते आणि विद्यापीठांतील अभ्यासू प्राध्यापकवर्ग धोरणात्मक निर्णय घेतात. सीबॉसमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही करणारे अधिकारीही समाविष्ट आहेत. माणूस हा निसर्ग वैभवाचा विश्वस्त असून नैसर्गिक  स्रोतांचा अतिवापर टाळावा ही काळजी या संस्था घेतात.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा