गॅरॉड, आर्चिबाल्ड एडवर्ड : (२५ नोव्हेंबर १८५७ – २८ मार्च १९३६ )आर्चिबाल्ड एडवर्ड गॅरॉड यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मार्लबोरो आणि ख्राइस्ट चर्च ऑक्सफोर्ड मध्ये झाले. त्यांनी निसर्गविज्ञान शाखेत पदवी मिळवली. त्यांचे वैद्यकीय शिक्षण लंडनमधील सेंट बार्थोलम्यू हॉस्पिटलमधून झाले आणि त्यांना एमआरसीपी पदवी मिळाली. नंतर ते पदव्युत्तर शिक्षणासाठी व्हिएन्नामध्ये अल्गेमायनस कल्केन्हाउस या संस्थेत गेले. तेथून त्यांनी बी.ए., एम.ए. आणि एमआरसीपी लंडन या पदव्या मिळवल्या.

व्हिएन्ना येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार करताना  स्वरयंत्र निदान  उपकरणाबद्दल लिहीलेल्या ‘ॲन इंट्रॉडक्शन टू द यूज ऑफ द लॅरिंगोस्कोप’ या आर्चिबाल्ड यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे वैद्यकीय वर्तुळात चांगले स्वागत झाले. नंतर त्यांनी ग्रिफिन पब्लिशर्समार्फत ‘ए ट्रिटिझ ऑन ह्रुमॅटिझमअँड ह्रुमॅटॉइड आर्थायटिस’ हे पुस्तक प्रकाशित केले. आर्चिबाल्ड यांच्या प्रयत्नांमुळे ‘क़्वार्टरली जर्नल ऑफ मेडिसिन’ या त्रैमासिकाची स्थापना झाली. पुढे त्यांनी वैद्यक विद्यार्थ्यांसाठी ‘ए हँडबुक ऑफ मेडिकल पॅथॉलॉजी’ हे पुस्तक सर डब्ल्यू. पी. हेरिंगहॅम आणि डब्ल्यू. जे. गाव् यांच्या बरोबर लिहिले. अनेक पुस्तकांचे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

आर्चिबाल्ड यांनी अनेक रूग्णालयात दीर्घकाळ वैद्यकीय सेवा दिली. ग्रेट ऑर्माँड  स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वस्थ आणि रोगग्रस्त बालकांच्या मूत्राची तुलना करायला सुरुवात केली. शरीरक्रियांमध्ये बिघाड झाल्यास त्याचे प्रतिबिंब मूत्राचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक घटना बदलण्यात उमटते हे त्यांच्या लक्षात आले. मूत्रतपासणी करणे सोपे आणि स्वस्त आहे. मूत्रातील निव्वळ रंगबदलावरूनही काही निदाने करता येतील हे त्यांना समजले. बालपणी कीटक आणि फुले यांच्या रंगाचे छंद म्हणून त्यांनी निरीक्षण केले होते. बहुधा त्यामुळे त्यांना दोन गटांतील मूत्राच्या रंगांतील सूक्ष्म फरकही सहज लक्षात येत असे.

स्वत:चे वैद्यकीय ज्ञान, अनुभव आणि मेंडेलचे नव्याने कळलेले आनुवंशिकतेविषयीचे प्रयोग यांचा ते एकत्रित विचार करत होते. आर्चिबाल्ड यांनी केलेल्या अंदाजानुसार मेंडेलियन घटकांत बदल होऊन काही विकरे बिघडत असतील आणि योग्य प्रमाणात अल्कॅप्टॉन निर्माण होऊन अल्कॅप्टॉनयुरियासारखे रोग निर्माण होत असतील. ख्यातनाम आनुवंशिकता शास्त्रज्ञ, विल्यम बेटसन आणि पनेट यांच्याशी आर्चिबाल्डनी आपल्या आडाख्यांबद्दल चर्चा केली. त्यातून मेंडेलचे नियम बालकांतील अल्कॅप्टॉनयुरियाच्या संक्रमणाला लागू होतील असे आर्चिबाल्डच्या लक्षात आले.

अल्कॅप्टॉनयुरियाचे संक्रमण अलिंग गुणसूत्री अप्रभावी (autosomal recessive) आहे असे रोग्यांच्या वंशावळींवरून दिसत होते. मेंडेलच्या नियमांच्या संदर्भात अल्कॅप्टॉनयुरियाच्या संक्रमणाबद्दल आर्चिबाल्डनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्याचे नाव होते, ‘द इन्सिडन्स ऑफ अल्कॅप्टॉनयुरिया: अ स्टडी ऑफ केमिकल इंडिव्हिज्युॲलिटी’ त्यात आर्चिबाल्ड यांनी अल्कॅप्टॉनयुरियाचे स्वतःचे अनुभव आणि नोंदींच्या आधारे तपशीलवार वर्णन केले होते. रोगाचे कारण काय असावे याचा तर्कही बांधला होता.

आर्चिबाल्ड यांच्या निरीक्षणातून अल्कॅप्टॉनयुरिया रोग्यांच्या मूत्राचा रंग हवेच्या संपर्काने पिवळा, तांबूस, काळा असा बदलत जातो असे आढळले होते. वयोमानानुसार रुग्णाच्या शरीरात सांध्यांतील कूर्चा आणि संयोजी ऊतींमध्ये तपकिरी रंगद्रव्य साठत जाते. सांध्यांचा दाह (संधिशोथ – arthritis) होतो.  त्यानी अल्कॅप्टॉनयुरिया आणि विवर्णता  (albinism) यांच्या संक्रमणाची तुलनाही केली होती. आर्चिबाल्ड यांनी प्रत्येक माणूस इतरांपेक्षा रासायनिक दृष्टीने वेगळा असतो असे मत मांडले. द्रष्टेपणाने त्यांनी असे निवेदन केले की रासायनिक वेगळेपणामुळे प्रत्येक व्यक्तीला होणारे विकार, त्यांची लक्षणे आणि तीव्रता इतरांपेक्षा भिन्न असतात.

एकदा, ग्रेट ऑर्मांड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये एक माता आपल्या छोट्या बाळाला घेऊन आली. आर्चिबाल्ड यांना दिसले की बाळाच्या लंगोटाचा रंग तांबूस झाला आहे. कुटुंबाची सविस्तर माहिती त्यानी काळजीपूर्वक नोंदून ठेवली. नंतर तशाच लक्षणांची आणखी चाळीस बालके हॉस्पिटलच्या नोंदींत आढळली. त्या कुटुंबांची सविस्तर माहितीही त्यानी नोंदून ठेवली. चौकशीअंती त्यांना कळले की अशी पहिली केस ८० वर्षापूर्वी म्हणजे, १८२२ मध्ये आढळली आहे.

इ.स. १९०० मध्ये त्यांनी प्रथम तपासणी करून नोंदलेल्या मातेला आणखी एक अपत्य झाले. आर्चिबाल्ड यांनी वैद्यकीय साहाय्यकांना बाळाच्या उत्सर्गांकडे विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले होते. बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी बाळाच्या लंगोटात टिपलेल्या मूत्राचा रंग काळा झालेला दिसला. या निरीक्षणानंतर आधीच्या नोंदी पडताळून, आर्चिबाल्ड यांनी असा निष्कर्ष काढला की अल्कॅप्टॉनयुरिया हा रोग जन्मजात आहे. अल्कॅप्टॉनयुरिया दुर्मीळ आहे, आणि रक्ताच्या नात्यात विवाह झाले असतील तर तो जास्त प्रमाणात आढळतो. एका बालकात आढळला तर त्याच्या चुलत, मावस इ. भावंडांत आढळण्याची शक्यता जास्त असते.

सन १९०८ मध्ये ब्रिटीश डॉक्टर आर्चिबाल्ड यांनी नोंदवले की  मानवातील काही आनुवंशिक रोग, चयापचय क्रियेत जन्मजात बिघाडामुळे होतात. उदा., अल्कॅप्टॉनयुरिया.  गॅरॉडनी अल्कॅप्टॉनयुरिया या रोगाचा शोध लावला. तसेच तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसा संक्रमित होतो याचा अभ्यासही  केला. अल्कॅप्टॉनयुरियाच्या शोधापाठोपाठ टायरोसिनेमिया, अल्बिनिझम, फेनिलकीटोनयुरिया, पेंटोसुरिया, सिस्टिन युरियासारख्या रोग प्रकारांचा एक पूर्ण गट माहीत झाला.

सन १९०८ पासून या विषयातील स्वत:च्या ज्ञानाचा विस्तार आणि खोली आर्चिबाल्ड यांनी वाढवली. द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समध्ये जून १९०८ मध्ये दिलेल्या चार भाषणांच्या क्रूनियन व्याख्यानमालेत इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम हा विषय त्यांनी लंडनमधील डॉक्टर  श्रोत्यांसमोर मांडला. १९०८ मध्ये त्याबद्दल संक्षिप्त रूपात आणि पुढे १९२३ विस्ताराने त्यांनी एक पुस्तक लिहून अधिक उलगडा केला. १९३१ मध्ये ‘इनबॉर्न फॅक्टर्स इन डिसिजेस’ या ग्रंथात असे जन्मजात रोग होण्याच्या प्रवृत्ती आणि शक्यतांविषयी लिहिले.

पहिल्या जागतिक महायुद्ध काळात आर्चिबाल्ड यांची नियुक्ती भूमध्यसागरातील माल्टाला लष्करी वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली. महायुद्धकालीन सेवेबद्दल त्याना नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अँड सेंट जॉर्ज हा किताब, ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्लंडच्या राजघराण्याकडून पुरस्कृत वैद्यकीय प्राध्यापक (Regius Professor of Medicine) म्हणून नियुक्ती, वैद्यकीय शास्त्राची एक पूर्ण नवी शाखा संस्थापित केल्याबद्दल फेलो ऑफ रॉयल सोसायटीत निवड, मेडिकल रिसर्च कौन्सिलवर, अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्सने आणि  आरझ्टिच्लर वेरीन, म्यूनिकचे मानद परदेशीय सदस्यत्व, ॲबर्डिन, माल्टा, पादुआ, ग्लासगो, डब्लीन विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेटस, द रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनचे सुवर्ण पदक असे अनेक सन्मान मिळाले.

इंग्लंडमधील, केंब्रिज येथे अल्पशा आजारानंतर त्यांचे देहावसान झाले.

संदर्भ :

समीक्षक :  मोहन मद्वाण्णा