गैर-काँग्रेसवाद : गैर-काँग्रेसवाद ही एक विचारप्रणाली व व्यूहरचना आहे असे आकलन अभ्यासकांमध्ये आहे. या बरोबरच ती एक पक्षव्यवस्था देखील आहे. हे आकलन फारच धुसर दिसते. गैर काँग्रेसव्यवस्था स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वांतत्र्योत्तर अशी दोन वेळा आकाराला आलेली व्यवस्था आहे. वसाहतवादी राज्यकर्ते, आंबेडकरवादी चळवळ, हिंदुत्व चळवळ, मुस्लीम लीग यांच्या विचारप्रणालीमध्ये गैर-काँग्रेसवाद होता. या विचारसरणीचे १९६३ नंतर गैर-काँग्रेसवादी व्यवस्थेमध्ये रूपांतर पक्ष व्यवस्थेच्या संदर्भांत केले गेले. काँग्रेसपासून वेगळे होऊन समाजवादी पक्ष स्थापन झाला. शेतकरी, कारखान्यातील कामगार, कामगार व मध्यम वर्गाचा या पक्षाने दावा केला होता. परंतु पन्नाशीच्या दशकामध्ये पक्षात फुट पडली (समाजवादी, प्रजा समाजवादी, किसान मजदूर प्रजा पार्टी). आरंभीच्या तीन लोकसभा निवडणुकामध्ये समाजवादी पक्षाची सत्तास्पर्धा ढिसाळ झाली होती. समाजवादी पक्षाला स्पर्धेक बनविण्याची रणनिती राममनोहर लोहीया शोधत होते. काँग्रेस व्यवस्थेशी स्पर्धा गैर-काँग्रेसव्यवस्था अशा संरचनेमुळे करता येईल. काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही, तर ती व्यवस्था आहे. याचे आत्मभान लोहियाकृताना साठीच्या दशकामध्ये होते. काँग्रेस व्यवस्था इतकी मजबूत होती की, तिला हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर करणे ही गोष्ट वेगळी होती. ही काँग्रेस व्यवस्थेची ताकद समजून घेऊन लोहियांनी १९६३ मध्ये एकपक्ष वर्चस्वाशी सत्तास्पर्धा करण्यासाठी गैर-काँग्रेसवाद ही व्यवस्था मांडली. गैर-काँग्रेसवादाची संरचना म्हणजे काँग्रेसेत्तर पक्षांच्या राजकीय आघाडीची संकल्पना होय. काँग्रेस विरोधी मतांच्या ध्रुवीकरणाला टाळणे आणि काँग्रेस विरोधी मतांची निवडणूक जिंकण्याची क्षमता वाढविणे हा या रचनेचा उद्देश होता. तसेच काँग्रेस व गैर-काँग्रेस अशी द्वीपक्ष व्यवस्थांची सत्तास्पर्धां घडविण्याची त्यामध्ये अटकळ होती. द्वीपक्षव्यवस्थाच्या सत्तास्पर्धेतून गैर-काँग्रेसेत्तर पक्षपध्दतीस सत्ता मिळविण्याची संधी होती. काँग्रेसला पर्याय देण्याची संकल्पना होती. या व्यवस्थेमध्ये विचारप्रणालीला दुय्यम स्थान दिले गेले. समाजवाद व हिंदुत्व (समाजवादी पक्ष व जनसंघ) असे दोन विचार एकत्र आले. या व्यवस्थेमुळे १९६७ मध्ये विविध राज्यात काँग्रेस व्यवस्थेचा पराभव झाला. १६ पैकी आठ राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. केरळमध्ये डावी आघाडी सत्तेवर आली. तर ओडिशामध्ये उजव्या पक्षांची आघाडी सत्तेवर आली. तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम सत्तेवर आला. पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश व पंजाब मध्ये काँग्रेस कमजोर झाली. कामराज व घोष या दोन मातबगार नेत्यांचा पराभव झाला. सहा राज्यात प्रदेश अध्यक्षाचा पराभव व चार राज्यात मुख्यमंत्र्याचा पराभव झाला. हा एकपक्ष व्यवस्थेचा गैरकाँग्रेस पक्षव्यवस्थेने केलेला पराभव होता. काँग्रेस व्यवस्था राज्यांमध्ये मोडल्यामुळे १९६७ मध्ये संयुक्त विधायक दल अशी संरचना स्थापन केली. या व्यवस्थेमध्ये जनसंघ, संयुक्त समाजवादी पक्ष, भारतीय क्रांती दल (संविद), प्रजा समाजवादी पक्ष यांचा समावेश होता. काँग्रेसची सरकारे पराभूत झाली तेथे संविदने सरकारे स्थापन केली. हे भारतातील पहिले मोठे सत्तांतर होते. विशेष म्हणजे हे सत्तांतर उत्तर भारतामध्ये झाले. ( पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब व केरळ, ओडिशा, मद्रास). १९६७ पूर्वी केवळ पंजाब, आंध्र प्रदेश, केरळ व ओडिशा अशी आघाड्यांची व्यवस्था होती. परंतु १९६७ नंतर आठ राज्यात आघाडीची पक्षव्यवस्था सुरू झाली. हा बदलत्या पक्ष व्यवस्थेचा परिणाम होता. राज्यांमधील या बदलत्या पक्ष पध्दतीचा परिणाम राष्ट्रीय पातळीवर झाला. १९७७ मध्ये तिसरी आघाडी गैर-काँग्रेस संरचनेमध्ये भागीदार झाली. या पक्षव्यवस्थेशी अमेरिकावादी (मोरारजी देसाई), अमेरिका विरोधवादी (जॉर्ज फर्नांडीस, मधु लिमये व चंद्रशेखर), हिंदुत्ववादी (अटल बिहारी वाजपेयी, लालकृण्ण आडवाणी, नानाजी देशमुख) अशा वेगवेगळ्या विचारप्रणालीच्या नेत्यांनी जुळवून घेतले. समाजवादी पक्ष, काँग्रेस (ओ), सीएफडी, भारतीय लोक दल व जनसंघ या पक्षांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष आघाडी स्थापन केली. त्यामुळे द्विधृवी सत्तास्पर्धा झाली व गैर-काँग्रेसवादी पक्षव्यवस्थेला सत्तास्पर्धा करता आली. तसेच द्विधृवी सत्तास्पर्धेत काँग्रेस व्यवस्थेचा पराभव झाला. गैर-काँग्रेसवादी पक्षव्यवस्थेचे सरकार स्थापन झाले (१९७७). १९८७-१९८८ मध्ये पुन्हा गैर-काँग्रेसवादी पक्षव्यवस्था कार्यशील झाली. गैर-काँग्रेस व्यवस्था म्हणून भाजपने व्ही. पी. सिंगाना पाठिंबा दिला होता. गैरकाँग्रेस व्यवस्था ही मर्यादीत पर्याय देत होती. कारण बहुसंख्यांकवाद आणि विचारप्रणालीची तीव्र मतभिन्नता टाळण्यात आली होती. ही गैर-काँग्रेस व्यवस्थेची मर्यादा होती.

संदर्भ :

  • Kothari Rajni,  The Congress System in India, Asian Survey, Vol.4, No.12, December,pp.1161-73,  Reprinted in DeSouza Peter Ronald and E. Sridharan (eds.), 2006, India’s Political Parties; pp. 58-72.,1964.