भाजप : एकपक्ष वर्चस्व व्यवस्था : भाजपने रालोआ व्यवस्थेची मर्यादा भेदली. विखंडनाच्या ऐवजी एक केंद्राभिमुखतेची नवीन व्यवस्था उभी केली. त्यांचे प्रतिक नरेंद्र मोदी झाले. या घडामोडीचा परिणाम म्हणून २०१४ मध्ये भाजपव्यवस्था केंद्रीत राजकारण सुरू झाले. सोळाव्या लोकसभा निवडणूकीनंतर समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये भाजप वर्चस्वशाली पक्ष?, असे विश्लेषण केले (२०१४). त्यानंतर दिल्ली, बिहार राज्यांच्या निवडणूकांनंतर एकपक्ष वर्चस्वाबद्दल चर्चा झाली नाही. मात्र गोवा, मणिपूर, उत्तराखंड व उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीनंतर दुसरा वर्चस्वशाली पक्ष असे नव्याने विश्लेषण केले गेले (पळशीकर सुहास, २०१७). तसेच एन. आर. मोहंती यांनी २०१७ मध्येएकपक्ष व्यस्थेचे विश्लेषण केले. हे भाजप वर्चस्व व्यस्थेचे समकालीन चर्चाविश्व आहे.
भाजपा हा एकपक्ष वर्चस्व व्यवस्था म्हणून २०१४-२०१८ या दरम्यान उदयास आला. या पक्षाची वर्चस्वाची व्यवस्था हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये घडवलेली आहे. भाजपने पक्ष अंतर्गत व पक्ष बाहय अशा दोन पातळयांवर विविध संरचना घडवलेल्या आहेत. म्हणून त्यास वर्चस्वाचे स्वरूप आले. या व्यस्थेच्या संरचना पुढीलप्रमाणे आहेत. १) समकालीन दशकामध्ये भाजप तळागाळात पोचला. त्याचे स्थान राष्ट्रीय पक्ष व विशिष्ट कार्यवाह पक्ष म्हणून आहे. संघ-भाजपमध्येसंवादाची संरचना आहे. या पक्षात निवडक प्रशिक्षित व्यक्तींचा गट पूर्णवेळ व कायम स्वरूपी कार्य करत असतो. पक्षांतर्गत पेज प्रमुख, बुथ प्रमुख कार्यकर्ता अशी तळागाळात या पक्षाची नवी संरचना आहे. कार्यासंबंधी संघटनात्मक, लहान गटांच्या संघटना, राजकीय संस्था व त्यांचे सभासद असा भाजपच्या व्यवस्थेचा ढाचा सध्या दिसतो. भाजपने तंत्रज्ञानीय (टॅक्नोलॉजीकल) समाजाशी जुळवून घेतले. पं. नेहरु, सिंग यांच्या नंतर मोदी सरकारने सात आयआयटीची स्थापन केली (केरळ, आंध्रप्रदेश, झारखंड, छत्तीसगड. गोवा, जम्मू-काश्मीर, आणि कर्नाटक). यामुळे भाजपव्यवस्थेला टॅक्नोलॉजीकल समाजातून आधार व ताकद मिळते. ही भाजपव्यवस्थेची नवीन संरचना आहे. २) भाजप हा साडेतीन दशकानंतर एकपक्ष वर्चस्व पध्दती म्हणून विकास पावला आहे. भाजपच्या जागा आणि मतांची टक्केवारी गेली साडेतीन दशकांमध्ये सतत वाढत गेली. एकविसाव्या शतकामधील आरंभीच्या दशकामध्ये जागा व मतांची टक्केवारी घटली. परंतु समकालीन दशकामध्ये जागा व मतांची टक्केवारी नाट्यमयरीत्या वाढली. परंतु लोकसभेत भाजपला केवळ ३१ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर आसाम, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात या राज्यांच्या निवडणूकीत भाजपच्या मतांची टक्केवारी ४५ पेक्षा जास्त दिसते. ३) भाजपने विविध घटक राज्यांच्या निवडणूका जिंकल्या. त्या त्या राज्यांमध्ये स्टेट बॉस (राज्यप्रमुख) भाजपने घडविले आहेत. उदा. मध्यप्रदेश- शिवराजसिंह चौहाण, छत्तीसगड- रमण सिंह, उत्तर प्रदेश- राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, राजस्थान- वसुधंरा राजे सिंधीया, आसाम- सर्बानंद सोनोवाल, महाराष्ट्र- नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस, गोवा-मनोहर पर्रीकर, हरियाणा- मनोहरलाल खट्टर, झारखंड-अर्जुन मुंडा, उत्तराखंड- त्रिवेंद्र सिंह रावत इत्यादी. यांनी राज्यात भाजपची घडी बसवली आहे. अशी राज्यप्रमुखाच्या यंत्रणे बरोबरच सहकारी संघराज्याचा दावा भाजप करत आहे (केंद्र-राज्य समझौता). परंतु या संरचनेच्या शिखरस्थानी केवळ एकच नेते आहेत (नरेंद्र मोदी). ही या संरचनेची मर्यादा देखील आहे. ४) भाजपचे राज्यप्रमुख हे भाजपच्या सामाजिक अभियांत्रिकीकरणाची संरचना आहे. उदा. शिवराजसिंह चौहाण, मनोहरलाल खट्टर हे ओबीसी, मनोहर पर्रीकर, देवेंद्र फडणवीस- उच्च जात, राजनाथ सिंह- राजपुत, वसुधंरा राजे सिंधीया-मराठा यामुळे उच्च व बनिया, मध्यम शेतकरी व ओबीसी अशी राज्यांमध्ये बऱ्यापैकी सर्वसमावेशक सामाजिक संरचना पक्षांतर्गत आकाराला आली आहे.
सकृतदर्शनी सर्वसमावेशकता दिसते. ही लवचिकता भाजप व्यवस्थेची दिसते. त्यामुळे वगळण्याच्या ऐवजी समावेशनाची चर्चा भाजपमध्ये घडते. दलित आदिवासी समूहाला भाजपने केंद्रात स्थान दिले आहे. विशेष रामनाथ कोविंद, रामदास आठवले, रामविलास पासवान, इत्यादी. यामधून भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाचे प्रारूप घडले. ५) या संरचनेमध्ये व्यापारी, बनिया, उदयोग यांचे प्रतिनिधी सुस्पष्टपणे दिसतात (नरेंद्र मोदी, अमित शहा, विजय रूपानी). भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाचे आधार काँग्रेसच्या एक पक्षीय वर्चस्वापेक्षा वेगळे आहेत. भाजपने त्यांच्या वर्चस्वाचे हे आधार जाणीवपूर्वक घडवलेले आहेत. परंतु भाजपची रचना काँग्रेस प्रमाणे पिरॅमिड (कोणस्तूप) सदृश्य झाली. पिरॅमिडच्या रचनेमध्ये निर्णायक स्थानी संघ संघटना आहे. त्या खाली उदयोग-व्यापार, तिसऱ्या स्थानावर मध्यम शेतकरी आणि चौथ्या स्थानावर वंचित समूहांना स्थान दिले गेले आहे. या संरचनेमध्ये संघ भाजपचे कार्यवाह आपोआप उच्च मध्यम व मध्यम वर्ग निर्णायक स्थानावर आहे. ही भाजपची एकपक्षव्यस्था पिरॅमिड सदृश्य म्हणजेच श्रेणीपद्धतीची दिसते. त्या संरचनेत आर्थिक – सामाजिक वर्गाचे समझौते घडलेले आहेत.
भाजप व्यवस्थेचे यश
अ.क्र. | निवडणूक वर्ष | लढविलेल्या जागा | जिंकलेल्या जागा | टक्केवारी | मतांची टक्केवारी |
१ | १९८४ | २२४ | ०२ | ०.३८ | ७.७४ |
२ | १९८९ | २२५ | ८५ | १६.०६ | ११.३६ |
३ | १९९१ | ४६८ | १२० | २३.०३ | २०.११ |
४ | १९९६ | ४७१ | १६१ | २९.६५ | २०.२९ |
५ | १९९८ | ३८८ | १८२ | ३३.५१ | २५.५९ |
६ | १९९९ | ३३९ | १८२ | ३३.५१ | २३.७५ |
७ | २००४ | ३६४ | १३८ | २५.४१ | २२.१६ |
८ | २००९ | ४३३ | ११६ | २१.०९ | १८.८० |
९ | २०१४ | ४२८ | २८२ | ५१.९३ | ३१.३४ |
भाजपची राज्यनिहाय कामगिरी (२०१४ नंतरचा काळ)
अ.क्र. | राज्य | एकूण जागा |
जिंकलेल्या जागा | टक्केवारी | मतांची टक्केवारी |
१ | गोवा | ४० | १३ | ३२ | ३६.०६ |
२ | छत्तीसगढ | ९० | ४९ | ५४ | ४१.१८ |
३ | मणिपूर | ६० | २१ | ५२ | ३६.२८ |
४ | आसाम | १२६ | ६० | ४८ | ४२.१२ |
५ | अरूणाचल प्रदेश | ६० | ११ | १८.३३ | ३६.२१ |
६ | महाराष्ट्र | २८८ | १२२ | ४२ | ३१.१५ |
७ | झारखंड | ८१ | ३७ | ४५.६७ | ३५.१६ |
८ | मध्यप्रदेश | २३० | १६५ | ७२ | ४५.१९ |
९ | हरियाणा | ९० | ४७ | ५२ | ३३.२४ |
१० | उत्तरप्रदेश | ४०० | ३१२ | ७७ | ४१.५७ |
११ | उत्तराखंड | ७० | ५६ | ८१ | ४६.५१ |
१२ | राजस्थान | २०० | १६३ | ८० | ४५.५५ |
१३ | गुजरात | १८२ | ९९ | ५४.३९ | ४९ |
१४ | हिमाचल प्रदेश | ६८ | ४४ | ६४.७० | ४८.८० |
१५ | दिल्ली | ७० | ०३ | ४.२८ | ३२.७८ |
१६ | आंध्रप्रदेश | २९४ | ०९ | ३.६ | २१.८२ |
१७ | बिहार | २४३ | ५३ | २१.८१ | ३७.४८ |
१८ | जम्मू काश्मीर | ८७ | २५ | २८.७३ | २६.२३ |
१९ | झारखंड | ८१ | ३७ | ४५.६७ | ३५.१६ |
२० | कर्नाटक | २२४ | ४० | १७.८५ | २०.०७ |
२१ | मेघालय | ६० | ०० | ०० | ६.२० |
२२ | मिझोरम | ४० | ०० | ०० | ०.८७ |
२३ | ओडिशा | १४७ | १० | ६.८० | १८.०२ |
२४ | नागालँड | ६० | ०१ | १.६६ | ९.१९ |
२५ | सिक्कीम | ३२ | ०० | ०० | १.७८ |
२६ | त्रिपुरा | ६० | ०० | ०० | १.८७ |
भाजपला माध्यमाचा पाठिंबा मिळाला. डीजिटल इंडियाच्या माध्यमातून जिंकणारा पक्ष अशी भाजपची प्रतिमा झाली. म्हणून सध्याची टेक्नॉलॉजीकल सोसायटी भाजपचा मुख्य आधार आहे. हा टेक्नॉलॉजीकल समाज तळागाळातील निवडणूकांमध्ये भाजपला आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये यश मिळवून देतो. त्या कारणामुळे इतर पक्षांच्या तुलनेत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून स्थानिक निवडणूकीत पुढे आला. त्यामुळे भाजपला नवीन कार्यकर्ते व नेते मिळाले. ही ताकद भाजपने व्यवस्था म्हणून संकलीत केली आहे. भाजप व्यवस्थेची ताकद रियल इस्टेटच्या व टेक्नॉलॉजिकल समाजाच्या राजकीय छत्रीमध्ये सामावलेली आहे. टेक्नॉलॉजिकल समाज हे नवीन घटीत आहे. त्यांच्याशी भाजप गेली दोन दशके झुंजत होता. परंतु मोदीयुगामध्ये टेक्नॉलॉजिकल समाजातील सामाजिक-आर्थिक हितसंबंधाच्या समझौत्याची संरचना भाजपला निर्माण करता आली. (डीजिटल इंडिया, सी प्लॅन, कॅशलेस इंडिया, इंटरनेट, समकालीन युगातील सोने/इंधन किंवा लक्ष्मीच्या जागी सरस्वतीची संकल्पना इ.) यातून भाजपव्यवस्थेची ताकद एकत्र झाली. मात्र भाजप व्यवस्था एककेंद्राभिमुख आहे. तसेच तिचे दुसरे वैशिष्टये बहुसंख्यांकवाद हे देखील दिसते. यामुळे भारतातील मेल्टिंग पॉटशी या व्यवस्थेचा सातत्याने संघर्ष दिसतो. सत्तास्पर्धा व्यवस्थेमध्ये होते. परंतु गैरधर्मनिरपेक्ष, गैर- मेल्टिंग पॉटशी मधून मर्यादित पर्याय ही व्यवस्था निवडते. तिची वाटचाल भरीव पर्यायाकडे आतापर्यंत झालेली नाही. परंतु तीन-चार वर्षांतील भाजपव्यवस्थेची कामगिरी धुरिणत्व वगळून प्रभुत्वाच्या पध्दतीने वर्चस्वाकडे झालेली दिसते.
संदर्भ :
- पवार, प्रकाश, भाजप : एकपक्ष वर्चस्व व्यवस्था, समाज प्रबोधन पत्रिका.