लुईगी, लुका कवाली स्पोर्झा : (२५ जानेवारी १९२२ – ३१ ऑगस्ट २०१८) कवाली स्फोर्झा यांचा जन्मइटलीतील जेनोआ येथे झाला. स्फोर्झा यांचे  शालेय शिक्षण तुरीनमध्ये झाले. पावियातील घिसलिएरी महाविद्यालयातून त्यानी डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी मिळविली.  डॉक्टरी व्यवसाय करण्यात कवाली  स्फोर्झा यांना  रस नव्हता. जीवशास्त्र, वैद्यकाखेरीज स्फोर्झा  यांना गणित विषयाची आवड होती. लॅटीन ही प्राचीन भाषा सुद्धा ते शिकले. त्यांनी  एका मुलाखतीत गणित आणि लॅटीनमुळे त्यांना तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागली असा उल्लेख केला. नव्याने विकसित होत असलेले आनुवांशिकी क्षेत्र संशोधनासाठी त्यांना खुणावू लागले. त्याकाळी फारशी साधन सामग्री लागत नसणाऱ्या सूक्ष्मजीवशास्त्राची प्रयोगशाळा मांडून त्यानी जीवाणूंवर (bacteria) काम सुरू केले.

केंब्रिज विद्यापीठात स्फोर्झा यांचे  जीवाणूंतील आनुवांशिकी विषयावरील  व्याख्यान सर, रोनाल्ड एल्मर फिशर यांनी ऐकले. परिणामी फिशर यांनी  स्फोर्झांना स्वतःच्या विभागात संशोधक म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. फिशर तेव्हा ई. कोलाय (E. coli) जी वाणूच्या आनुवंशिकीशी संबधित संख्याशास्त्रीय बाबींवर काम करत होते त्यामुळे  स्फोर्झा यांनी त्यास होकार दिला.

फिशर यांचे  एक विद्यार्थी आणि स्फोर्झां यांचे सहाध्यायी ॲन्थनी डब्ल्यू. एफ. एडवर्ड, यांच्या बरोबर स्फोर्झांनी काही निबंध प्रकाशित केले. त्यांत वंशेतिहासीय वर्गीकरणाबद्दलची संकल्पना (phyletic classification) मांडली होती. ही संकल्पना आता खूपच विस्तारित रूपात सर्वमान्य झाली आहे. शेजारच्या आकृतीत जीवप्रकार ठिपक्यांनी आणि त्यांचे नाते रेषांनी दाखवले आहे. या आकृतीतील  बुंधा व शीर्ष  सर्व जीव एकमेकाना जोडलेले आहेत. काही निकट तर काही दूरचा संबंध दर्शवतात.

स्फोर्झा यांनी आफ्रिकेचे एकूण अकरा दौरे केले. पिग्मी आणि आदिम भटक्या जमातीच्या लोकांच्या वंशेतिहासाचा  अभ्यास त्यांनी  केला. मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, भूगोल, पुरातत्त्वशास्त्र अशा क्षेत्रांतील जाणकारांना आपल्या प्रकल्पांत जोडून घेतले. स्फोर्झा यांनी वेगवेगळ्या जाती, जमाती, प्रदेशातील लोकांच्या जनुक-वैविध्याची माहिती जमा केली. ते का निर्माण होते याचाही विचार करून त्या प्रक्रियांचा अभ्यास केला.

स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत असतानाच युनेस्कोच्या वतीने स्फोर्झांनी द ह्युमन जीनोम डायव्हर्सिटी प्रोजेक्ट साकारण्याचा प्रयत्न केला. प्रा. ॲलन विल्सन, तंतुकणिका – डीएनए (Mitochondrial DNA) आणि जीवरसायनतज्ज्ञ, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली, सर वॉल्टर बोडोमर, अध्यक्ष, द ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन,आनुवांशिकीच्या प्राध्यापक, मेरी क्लेअर किंग, आणि मानवी जनुकसंच इतिहासकार, बॉब कुक – डीगन यांनी स्फोर्झांना या महाकाय प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात साथ दिली. मानवी समूहांच्या जनुकांतील विविधता अभ्यासणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता. अशा प्रकल्पांतून वंशवादाला पुष्टी मिळते हा गैरसमज आहे हे ही स्फोर्झांना दाखवून द्यायचे होते. दुर्दैवाने संबंधित संस्थांकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्याने प्रकल्प संकल्पाच्या अवस्थेतच राहिला.

स्फोर्झा यांना पॉटिफिकल अकादमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होण्याचा मान मिळाला. मॅक्स प्लँक, अर्न्स्ट रदरफोर्ड, नील्स बोहर यांसारखे दिग्गज वैज्ञानिक पॉटिफिकल अकादमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. यावरून स्फोर्झा यांच्या गुणवत्तेची श्रेणी लक्षात येईल. जीवशास्त्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा इंटरनॅशनल बाल्झन पुरस्कार स्फोर्झाना मानवजातीच्या उद्गमावरील उल्लेखनीय संशोधनासाठी दिला गेला. हा पुरस्कार नैसर्गिक विज्ञान आणि मानव्य क्षेत्रात, अद्वितीय कार्यकर्त्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जातो. अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि मेंडेल पदकाचे ते विजेते होते. स्फोर्झा यांची निवड टेलेसिओ गॅलिली अकादमी ॲवार्डसाठी झाली. टेलेसिओ गॅलिली अकादमी ॲवार्ड विज्ञानातील संकल्पनांची मुक्तपणे देवघेव व्हावी यासाठी दिले जाते. काहीशा अपारंपारिक वाटणाऱ्या कल्पनांपासून, क्रांतीकारक वा सध्याच्या ज्ञानकक्षेत अजिबात न बसणाऱ्या कल्पनांवरही साधकबाधक चर्चा व्हावी. त्यातून प्रबोधन होऊन समाज विज्ञानवादी व प्रगत व्हावा यादृष्टीने हे ॲवार्ड दिले जाते.

संशोधनासाठी एक संपूर्ण नवे क्षेत्र स्फोर्झांनी खुले केले. देशांतर्गत वा परदेशी स्थलांतर केलेल्या वा करावे लागलेल्या आणि नव्या ठिकाणी दीर्घकाळ राहायला गेलेल्या मानव समुदायाच्या  रक्तगटांचा स्फोर्झांनी तुलनात्मक अभ्यास केला. प्रचंड संख्येत स्थलांतरित झालेल्या मानव समूहांच्या ABO रक्तगटांच्या विदेचे (data) विश्लेषण आणि तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी लेखांतून निष्कर्ष मांडले. उदा., प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) च्या ऑगस्ट १९८८ प्रकाशनामध्ये त्यांनी जगभराच्या बेचाळीस आदिम मानव समूहांच्या १२० जनुक जोड्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. त्यांची संख्याशास्त्रीय तंत्रांच्या मदतीने तुलना केली. तेव्हा आदिम आफ्रिकन गट आणि गैर-आफ्रिकन गट असे विभाजन साधारण कधी झाले याचा अंदाज आला. नंतर गैर-आफ्रिकन गट पुन्हा विभागून आशियाई, ऑस्ट्रेलियन, अंटार्क्टिक इ. उपगट केव्हा झाले हे समजले.

अशा अभ्यासांतून  लोकांचे मूळ गट कालांतराने आणि दीर्घ अंतराच्या प्रवासामुळे ताटातूट होऊन भौगोलिक व सांस्कृतिकरित्या कसे विलग होत जातात. त्यांच्या मूळच्या जनुकसंचांतील जनुकांचे  विसरण (divergence) कसे होते हे स्फोर्झायांनी  शोधनिबंधांतून स्पष्ट केले. तसेच हे ज्ञान चित्ररूपात मांडले तर मानव समूहांच्या जनुकांचे चित्रण एखादा महावृक्ष, त्याच्या मुख्य फांद्या, त्यांच्या शाखा व उपशाखा असा आकृतीबंध निर्माण होईल असे दाखवले. या अभ्यासातून सांस्कृतिक आनुवांशिकी (cultural anthropology)  असे आणखी नवे ज्ञानक्षेत्र उदयास आले.

भाषा हा संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. डीएनए मधून होणाऱ्या (जनुकीय) माहितीच्या संक्रमणाखेरीज अजनुकीय (non-genetic information transfer) माहिती-संक्रमणासाठी भाषा हा अतिमहत्त्वाचा दुवा असतो.

स्फोर्झा यांनी त्यांच्या क्षेत्रातील विद्वानांसाठी तसेच सामान्य वाचकांसाठी विपुल लेखन केले. त्यांच्या पुस्तकांतील भाषा सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी सोपी आहे.

स्फोर्झांनी ‘जीन्स, पीपल्स अँड लँग्वेजेस’ (Genes, Peoples, and Languages) या पुस्तकात मानवजातीतील वंश ही कल्पना जीवशास्त्रीय दृष्ट्या आता महत्त्वाची राहिलेली नाही. यूरोपीय मानवी जनुकसंचांच्या निरीक्षणानंतर आणि संख्याशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे स्फोर्झा मानतात की यूरोपीय लोक २/३ आशियाई आणि १/३ आफ्रिकन खंडांतील जनुकांच्या सरमिसळीतून निर्माण झाले आहेत.

स्फोर्झांनी स्वतःच्या चित्रपट निर्मात्या मुलाबरोबर, फ्रान्सिस्को (Francesco Sforza) बरोबर लिहिलेले ‘द ग्रेट ह्युमन डायास्पोरा : द हिस्टरी ऑफ डायव्हर्सिटी अँड इव्होल्युशन’ ( The Great Human Diasporas: The History of Diversity and Evolution’ अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहे. तसेच स्फोर्झा, पावलो मेनोझ्झी आणि आल्बेर्तो पिआझ्झा या तीन लेखकांनी एक ग्रंथराज निर्मिला. त्याचे नाव ‘द हिस्टरी अँड जिओग्राफी ऑफ ह्युमन जीन्स’ (The History and Geography of Human Genes) या जाडजूड ग्रंथात मानवाच्या शंभराहून जास्त वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला आहे. अनेक मानव समूहांचे रक्तगट, प्रथिनांतील फरक, डीएनए रचनेतील सूक्ष्म फरक आणि जनुकांची वारंवारिता यांबद्दलची अजस्त्र आकडेवारी तक्ते आणि आलेख देऊन विचारात घेतली आहे. नवीन संशोधन हाती घेणाऱ्यांसाठीही वर्षानुवर्षे हे पुस्तक फार उपयुक्त ठरले. आंतरजाल सहज आणि जगभर उपलब्ध झाल्यावर मात्र त्याचा वापर कमी झाला.

वर उल्लेखलेल्या पुस्तकाइतकेच ‘ह्युमन जेनेटिक व्हेरिएशन’ हे स्फोर्झा लिखित पुस्तकही संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता पावले आहे.

सर वॉल्टर बोडोमर यांचे सहलेखक म्हणून स्फोर्झांनी दोन  पुस्तके लिहिली. ‘द जेनेटिक्स ऑफ ह्युमन पॉप्युलेशन्स’ आणि ‘जेनेटिक्स, इव्होल्युशन अँड मॅन.’ आधुनिक जीनॉमिक्स क्षेत्राचा उदय होण्यापूर्वी ही पुस्तके विविध पाठ्यक्रमांत अनिवार्य वाचन यादीत असत.

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजीनियरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी – (ICGEB) च्या वैज्ञानिक सल्लागार मंडळावर वीस वर्षे काम करताना स्फोर्झा भारतात आले होते.  प्रा. माधव गाडगीळ यांच्या सहकार्याने भारतातील  आदिवासींच्या तीन गटांच्या तंतुकणिकांतील डीएनए (Mitochondrial DNA) चा अभ्यास स्फोर्झांनी केला. अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्समध्ये त्याचे विवरण आहे.

इटलीतील बेल्लुनो येथे स्फोर्झांचे निधन झाले.

संदर्भ :   

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा