नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन : (स्थापना – १९८८) नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन (एनसीबीआय- NCBI) ही युनायटेड स्टेटस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NLM) चा उपविभाग व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ची एक शाखा आहे. युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका यांनी या संस्थेस कायदेशीर मान्यता दिली आहे. या संस्थेसाठी अमेरिकेचे सरकार निधी पुरवते. मेरीलॅन्ड राज्यातील बेथेस्डा येथे संस्थेचा परिसर असून १९८८ साली एका कायद्यानुसार सिनेटर क्लाउड पेपर यांनी यासाठी ठराव मांडून त्यास मान्यता घेतली. एनसीबीआय ही जैवतंत्रज्ञान व जैवऔषध विज्ञान शाखेतील साधने व सेवा देणारी महत्त्वाची संस्था आहे. जीनबॅन्क (GenBank) मधील मुख्य डीएनए क्रमनिर्धारण विदा (Data)आणि पबमेड (PubMed) या जैववैद्यक शाखेतील सूची विदा (Data) या संस्थेमध्ये साठवलेला आहे. याशिवाय इपिजीनोमिक्स (Epigenomics) विदा एनसीबीआयमध्येच साठवलेली आहे. इपिजीनोमिक्स ही आनुवंश विज्ञानातील आधुनिक शाखा आहे. अनेक रसायने किंवा बाह्य घटक प्रत्यक्ष डीएनए बदलाशिवाय सजीवाच्या दृश्यप्रारूपावर बदल घडवून आणतात. अशा बदल घडवणार्‍या पण दृश्यप्रारूप पुढच्या पिढीमध्ये संक्रामित करणार्‍या घटकास इपिजीनोमिक्स म्हटले जाते. एनसीबीआयच्या संकेतस्थळावरून सर्व विदा एंट्रेझ (Entrez) हे सर्च इंजिन वापरून मिळवता येत असत पण २०१५ साली थेट/सरळ एनसीबीआय च्या संकेत स्थळावरून आवश्यक विदा कसल्याही शुल्काशिवाय शोधता येतात. बीएलएएसटी  (BLAST) या क्रमनिर्धारण आज्ञावलीच्या सहाय्यानेसुद्धा विदा शोधता येते.  ब्लास्ट (BLAST-The Basic Local Alignment Search Tool) हे इंग्रजीतील बेसिक लोकल अलायनमेंट सर्च टूल या नावाच्या आज्ञावलीचे लघुरूप आहे. या सर्च इंजिनमुळे न्यूक्लिओटायडे किंवा प्रथिनमधील अमिनो आम्ल क्रमाची स्थानिक क्रमाबरोबर तुलना करता येते. एखाद्या जिनोम क्रमाचे कार्य किंवा त्याच्या उत्क्रांतीमध्ये कसा बदल झाला असावा यावर प्रकाश टाकता येतो. अनेक जिनोमक्रमामध्ये लाखो वर्षांत कसा बदल झाला असावा याच्या अंदाजासाठी हे उत्कृष्ट साधन ठरले आहे.

डेव्हिड लिपमॅन यांनी ब्लास्ट प्रोग्राम शोधून काढला. ते एनसीबीआयचे संचालक होते. ते स्वत: बायोइन्फोर्माटिक्समधील जागतिक कीर्तीचे तज्ञ आहेत. ब्लास्ट प्रणालीचे आणखी एक सहकारी लेखक स्टीफन अ‍ॅल्त्शुल डेव्हिड लॅन्ड्समॅन, जॉन विल्बुर, तेरेसा यांच्या सहाय्याने अंतर्गत संशोधन संस्था एनसीबीआयच्या इमारतीत उभी राहिली आहे. मे २०१७ मध्ये डेव्हिड लिपमॅन संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.

सन १९९२ पासून जेनबॅंकडीएनए क्रमानिर्धारण विदा उपलब्ध करून देण्याची सोय एनसीबीआयने केली आहे. जेनबॅंक विविध प्रयोगशाळेत असलेली विदा समन्वयाने त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. उदा., यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजी लॅबोरेटरी (इएमबीएल) आणि डीएनए डाटा बॅंक ऑफ जपान (डीडीबीजे).

सन १९९२ पासून जेनबॅंकव्यतिरिक्त एनसीबीआयजनुक, मानवामधील आनुवंशिकता, त्रिमिती प्रथिन रचना, लघुलांबीच्या एकल (single) न्यूक्लिओटाईड बहुरूपता, मानवी जिनोम प्रकल्प आणि वर्गीकरणविज्ञान अशा जीवविज्ञानविषयक सर्व माहितीचा स्त्रोत बनलेली आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने कॅन्सर जिनोम रचना प्रकल्प सध्या राबवला जात आहे. सजीवाच्या जातीचा एकमेव वर्गीकरण ओळख क्रमांक  (taxonomy ID number) उपलब्ध झाल्याने तुमच्याकडे असलेल्या क्रमनिर्धारणावरून पंधरा सेकंदात जिनोमची तुलना होऊ शकते एवढे ब्लास्ट सर्च इंजिनचे कार्य सुरळीत झाले आहे.

एनसीबीआयच्या संकेतस्थळावर (NCBI Bookshelf) जीवविज्ञान, जैवरसायन शास्त्र, पेशी विज्ञान, आनुवंश विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, विषाणूविज्ञान, वैद्यक अशा विषयावरील १२०३ पुस्तके, ७०६१ अहवाल, ७६ दुर्मीळ ग्रंथ आणि ३१ संहिता उपलब्ध करून दिलेली आहेत. उपलब्ध पुस्तकातील प्रकरणे आपल्याला वाचायला आणि त्यांची प्रत काढायला उपलब्ध आहेत. अर्थात अगदीच नव्या नसल्या तरी जुन्या आवृती तुम्हाला संदर्भासाठी वापरता येतात. संशोधन करणार्‍यांना सुलभ व्हावे म्हणून कॉफी टेबल बुकआज्ञावली टप्प्याटप्प्याने कशी वापरायची याची पुस्तके उपलब्ध आहेत. वैद्यक, कर्करोग विषाणू विज्ञान संशोधकांना माहिती नाही म्हणून संशोधनात अडथळा येऊ नये याची काळजी घेतली जाते.

एनसीबीआय यांनी उपलब्ध केलेली अद्वितीय संधी म्हणजे सध्या ज्ञात असलेल्या सर्व जनुकांची रचना व विशेष गुणवर्णन. त्याचा जनुकीय नकाशा, क्रमनिर्धारण, जनुकिय व्यक्तता आणि प्रथिन व्यक्तता, तसेच या प्रकारचे जनुक सजीव सृष्टीत कोठे आहेत याची माहिती त्यातील फरक, समानता यावरून जनुकामध्ये किती व कधी बदल झाला आहे याची माहिती मिळते. जनुकाबरोबर प्रथिनांची माहिती त्यांच्या अमिनोअम्लक्रम, त्रिमिती रचना कार्य यांची माहिती मिळवण्याचे हे सर्वांत मोठे संकेतस्थळ आहे.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी