पाश्चर इन्स्टिट्यूट : (स्थापना – ४ जून १८८७) पाश्चर इन्स्टिट्यूट ही ना नफा ना तोटा तत्वावर सुरू झालेली फ्रान्समधील खाजगी संस्था आहे. जीवविज्ञान, सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीव निगडीत रोग आणि लस उत्पादन ही संस्थेची उद्दिष्टे आहेत. ज्यांनी आधुनिक औषधविज्ञानाचा पाया घातला त्या लुई पाश्चर यांच्या नावाने ही संस्था सुरू झाली. निर्जंतुकीकरण प्रक्रिया, काळपुळी (अ‍ॅन्थ्रॅक्स) व आलर्क (रेबीज) यावरील लस लुई पाश्चर यांनी शोधून काढली होती.

एका शतकानंतर सुद्धा ही संस्था संसर्गजन्य आजारावर संशोधन करणारी असा तिचा नावलौकिक आहे. पॅरिसमधील जैवऔषध संशोधन संस्थेने १९८३ साली सर्वप्रथम एड्स आजाराचा कारक एचआयव्ही (पहा: ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, HIV) विषाणू वेगळा करण्यात यश मिळवले होते. पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये केल्या गेलेल्या संशोधनातून घटसर्प, धनुर्वात, क्षय, पोलिओ, एन्फ्लुएंझा, पीतज्वर, प्लेग अशा जीवघेण्या रोगावर नियंत्रण मिळाले आहे.

पाश्चर इन्स्टिट्यूटची स्थापना सुप्रसिद्ध रसायन वैज्ञानिक आणि सूक्ष्मजीव वैज्ञानिक लुई पाश्चर यांनी केली. जीवविज्ञानातील मूलभूत संशोधन व त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर यावर त्यांचा भर होता. त्यानी विविध क्षेत्रातील तज्ञ व पारंगत वैज्ञानिक संशोधनासाठी मिळवले. त्यांनी सुरू केलेल्या पाच विभागांची सूत्रे इमिएल दूक्ला आणि चार्ल्स चेंबरलॅन्ड, जीववैज्ञानिक इल्या इलिच मेचनिकॉव्ह आणि दोन वैद्यकीय अधिकारी जॅक्विस-जोसेफ ग्रॅन्चेर, तसेच इमिएल राउक्स (तांत्रिक सूक्ष्मजीव संशोधन) यांच्याकडे सोपवली. राउक्स यांनी सर्व जगाला सूक्ष्मजीवविज्ञानातील तंत्राची ओळख करून दिली.

जॅक्विस-जोसेफ ग्रॅन्चेर आणि एमिली राउक्स हे रेबीज विभाग पहात असले तरी सर्वाधिक रुग्ण याच विभागात असल्याने लवकरच पाश्चर इन्स्टिट्यूटला नवी इमारत बांधावी लागली. स्वत: लुई पाश्चर यांना प्रकृतीच्या कारणास्तव हे काम त्यांचे विश्वासू सहकारी ग्रॅन्चेर आणि राउक्स यांच्याकडे सोपवावे लागले.

अगदी प्रारंभापासून पाश्चर इन्स्टिट्यूटला आर्थिक अडचण येत होती. फ्रान्स शासन व काही विदेशी व्यक्ती व मादाम बाउसिकॉट यांनी दिलेला निधी सुद्धा पुरेसा नव्हता. केवळ दहा लाख फ्रॅन्क संस्थेकडे शिल्लक होते. अशा वेळी फ्रेंच शासनाच्या लोकोपयोगी वृत्तीमुळे फ्रान्स व इतर देशांना कमी किमतीत संस्थेने लस देऊ केली. १८८८ साली फ्रेंच शासनाने संस्थेस पूर्ण मान्यता दिली. आजतागायत या संस्थेस शासनाने देऊ केलेली मदत शंभरहून अधिक वर्षे चालू आहे ही विशेष बाब आहे.

सन २००८ च्या पाश्चर इन्स्टिट्यूटच्या संकेत स्थळानुसार प्रमुख संशोधन पेशी विज्ञान आणि संसर्ग, भ्रूणविकास विज्ञान, जीनोम व आनुवंशविज्ञान, प्रतिक्षमता (immunology), संसर्ग आणि साथरोगविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, चेताविज्ञान, परजीवी आणि कवक विज्ञान, जीवरचना आणि रसायन विज्ञान (structural Biology and chemistry), विषाणूविज्ञान या शाखामध्ये आहेच, याशिवाय संशोधनेतर असलेले विभाग म्हणजे नोंदी किंवा अभिलेख आणि पुराभिलेख, ऐतिहासिक जीवाणू व विषाणू संग्रहालय, प्रसिद्धी व ग्रंथालय हे ही आहेत. .

पाश्चर इन्स्टिट्यूटच्या महत्वाच्या संशोधनामध्ये एचआयव्ही-१ व एचआयव्ही-२ विषाणू वेगळे करणे हे आहे. त्याच बरोबर मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे बरेच आधी पूर्वनिदान चाचणी, जैवतंत्रज्ञान आधारित हिपॅटायटिस–बीलस आणि हेलिओबॅक्टर पायलोरीची त्वरित चाचणी पद्धत शोधण्यातील यश यांचा समावेश आहे. हेलिओबॅक्टर पायलोरी हा जठरातील व्रणाचा (अल्सर) कारक जीवाणू आहे. अम्ल माध्यमात हा जीवाणू सुखाने वाढतो. मानवी शरीरातील कर्करोग हा कर्करोग जनुकांच्या अवेळी किंवा काही कारणाने प्रभावी होण्याने होतो. कर्करोग जनुके व कर्करोगावर येथे चाललेल्या संशोधनामध्ये गर्भाशयमुख कर्करोग व त्याचा कारक ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एच पी वी) यांचा समावेश आहे. एडस, मलेरिया, डेंग्यू, आणि शिगेला जीवाणू यावर लस शोधण्याचे काम संस्थेत अंतिम टप्प्यात आलेले आहे.

अलीकडच्या काळात वैद्यकीयदृष्ट्या महत्वाच्या सजीवांचा पूर्ण जनुक आराखडा शोधण्यात संस्थेला यश मिळाले आहे. मद्य बनवण्यासाठी लागणार्‍या यीस्ट (Saccharomyces cerevisiae) या कवकाच्या क्रमानिर्धारणात पाश्चर इन्स्टिट्यूटचा महत्त्वाचा सहभाग आहे. पाश्चर यांच्या यीस्टवरील संशोधनाचे ऐतिहासिक महत्व आहे. यीस्टचे क्रमनिर्धारण १९९६ साली पूर्ण झाले. १९९७ साली बॅसिलिस सबटिलिस (Bacillus subtilis) तर १९९८ साली क्षयाच्या जीवाणूचे (Mycobacterium tuberculosis) क्रमनिर्धारण करण्यात आले.  यातील बॅसिलिस सबटिलिस जीवाणू प्रातिनिधिक सजीव म्हणून ओळखला जातो. मानवी व रवंथ करणार्‍या सस्तन प्राण्यांच्या पचनमार्गातील या जीवाणूमुळे या प्राण्यांना इतर जीवाणूपासून संरक्षण मिळते. (पहा: प्रातिनिधिक सजीव – Bacillus subtilis)

संस्थेच्या स्थापनेपासून विविध शाखेतील वैज्ञानिक पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षण व संशोधन करीत असतात. आज या संस्थेत पूर्णवेळ काम करणारे २७८० संशोधक व इतर कर्मचारी आहेत. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट यांचाही समावेश आहे. विविध ठिकाणाहून संस्थेकडे जीवाणू व विषाणू यांचे नमुने पाठवण्यात येतात. ही संस्था फ्रेंच शासनाची अधिकृत सल्लागार संस्था आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्र संघ यांच्या संसर्गजन्य रोगाबद्दलच्या संशोधन संस्थेची मान्यता यांच्याकडे आहे.

संसर्गजन्य रोगांच्या चाचण्या व लस निर्मिती संस्थेतील प्रयोगशाळेत होते. याचे प्रत्यक्ष नियंत्रण फ्रेंच फार्मा उद्योगातील भागीदार संस्था सॅनोफी डायग्नॉस्टिक पाश्चर (Sanofi Diagnostics Pasteur) यांच्याकडून होते. बनवलेल्या लसीचे उत्पादन व वितरण (Mérieux, Sérums et Vaccins) यांच्याकडून होते.

पाश्चर इंटरनॅशनल नेटवर्क असोसिएशन (PINa) ची स्थापना २०११ साली करण्यात आली. आज पंचवीस देशामध्ये व पाच खंडात पाश्चर इंस्टिट्यूटच्या ३२ शाखा आहेत. आर्बोव्हायरस जातीच्या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी वोल्बॅचिया नावाचा जीवाणू इडिस इजिप्टिकस जातीच्या डासामध्ये प्रविष्ट  केला जातो. अशा प्रकारची प्रायोगिक पद्धत संस्थेने उपलब्ध केलेली आहे. असे जीवाणू प्रविष्ट केलेले डास डेंग्यू, चिकुनगुन्या आणि झिका विषाणूच्या प्रसाराचा प्रतिबंध करतात. आर्बोव्हायरस विषाणूचे पुनरुत्पादन वोल्बॅचिया जीवाणूमुळे थांबते असे आढळून आले आहे.

पाश्चर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी एके काळी फ्रान्सच्या अधिपत्याखाली असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील (Nouvelle-Calédonie) नोवेल कालोडींनी या बेटावर जागतिक डास रोग प्रतिबंध केंद्र स्थापन केले आहे. या बेटावर वोल्बॅचिया संसर्ग झालेले डास ३५०० ठिकाणी सोडलेले आहेत. स्थानिक डासामध्ये हा जीवाणू कसा पसरतो याची पाहणी करून झिका, चिकुनगुन्या व डेंग्यू प्रतिबंध जैविक पद्धतीने नियंत्रित करण्यात यश मिळेल अशी खात्री संशोधकाना वाटते. या पूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये या क्षेत्रात वीस वर्षे संशोधन झालेले आहे.

सन १९०८ पासून पाश्चर इन्स्टिट्यूटमधील दहा वैज्ञानिकांनी वैद्यक व शरीरक्रिया विज्ञानातील नोबेल पुरस्कार मिळवला आहे. २००८ मध्ये या संस्थेतील दोन वैज्ञानिकांनी एकाच वेळी नोबेल पुरस्कार मिळवण्याचा विक्रम केलेला आहे.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी