स्वस्तिकासन

एक आसनप्रकार. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीनुसार शुभचिन्ह आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये पायांची रचना स्वस्तिकाच्या फुलीप्रमाणे दिसते म्हणून या आसनाचे नाव स्वस्तिकासन पडले असावे. स्वस्तिक हे शुभचिन्ह असल्यामुळेच कदाचित हठप्रदिपिकेमधे (१.१९) हे आसन सर्वप्रथम घेतले गेले आहे. आसन करायलाही सोपे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवता येतो व बराच वेळ न थकता या आसनात बसता येते. भ्रूमध्य किंवा नासाग्रदृष्टी लावता येते. प्राणायाम, ओंकारजप किंवा ध्यानासाठी हे आसन फारच चांगले आहे. शिवसंहितेत (३.११५-११७) व सिद्धसिद्धान्तपद्धती (२.३४) या ग्रंथांमध्येही स्वस्तिकासनाचा उल्लेख आहे.

कृती : बैठकीवर (सतरंजीवर) ताठ बसावे. उजवा पाय वाकवून त्याचे पाऊल डाव्या मांडीच्या आतल्या भागाला लावून परंतु, जमिनीवर राहील असे ठेवावे. डावा पाय वाकवून तो उजव्या पायावरून नेऊन त्याचे पाऊल उजवी मांडी व पोटरी यामध्ये बसवावे. उजवे पाऊल जे डाव्या मांडीला चिटकवून ठेवले होते, ते डावी मांडी व पोटरीमधे बसेल (फसेल) एवढे हाताने ओढून घ्यावे. पाय, गुडघे, नितंब हे सर्व एका पातळीत असावेत. ताठ बसावे व दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये ठेवावे. डोळे मिटून शांत बसावे. १ ते ३ मिनिटे किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ या आसनात बसता येऊ शकते. आसन सोडताना एकेक पाय सोडवून पुन्हा ताठ बसावे.

लाभ : या आसनाच्या नियमित सरावाने मेरुदंडाच्या सर्व तक्रारी दूर होतात. पोट सुटत नाही. मूलबंध चांगल्या प्रकारे लागू शकतो. ध्यानासाठीही हे उत्तम आसन आहे. पावलांना शरीराची ऊब मिळते त्यामुळे थंडीचा त्रास होत नाही. शरीराची उष्णता टिकून राहते. ज्यांना पद्मासन जमत नाही, त्यांनी हे आसन करायला हरकत नाही.

विधिनिषेध : गुडघेदुखी असेल तर शक्यतो हे आसन टाळावे. पुढे इतर आसनांचा सराव झाल्यावर हळूहळू स्वस्तिकासनाचा प्रयत्न करावा. पाठीचा कणा ताठ ठेवण्याची जाणीव ठेवावी. १० ते १५ मिनिटे शांतपणे पाठीत, गुडघ्यात वेदना न होता या आसनात बसता आले, तर ध्यानासाठी याचा उपयोग करावा. कसल्याही प्रकारचा ताण किंवा जबरदस्ती नसावी.

         समीक्षक : नितीन तावडे