चॅन, जॅकी : (७ एप्रिल १९५४). साहसीदृश्यांकरिता प्रसिद्ध असलेले चित्रपट अभिनेता आणि निर्माता. त्यांचे मूळ नाव चॅन काँग-सँग. त्यांचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. जॅकी यांना घरात पाओ-पाओ म्हणत. त्यांचे वडील चार्ल्स आणि आई ली-ली चॅन हे दोघे तत्कालीन चीनमधल्या गृहयुद्धातील निर्वासित होते. १९६० मध्ये हे कुटुंब अमेरिकन दूतावासात काम करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कॅनबेराला स्थायिक झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी जॅकी यांना हाँगकाँगस्थित ऑपेरा स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवले. कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कुंग फू, कसरतींचे खेळ (अक्रोबॅटीक्स), नृत्य आणि संगीत शिकवले जायचे. तेथे जॅकी यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत या सर्वांमध्ये नैपुण्य मिळवले. तेथेच त्यांची ओळख सॅमो हंग आणि युआन बीयू या मित्रांशी झाली, ज्यांनी पुढे हाँगकाँग चित्रपटाचा चेहरामोहरा बदलला. हे तिघे ‘थ्री ब्रदर्स’ किंवा ‘थ्री ड्रॅगन्स’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
जॅकी चॅन यांच्या चित्रपटीय कारकीर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. बिग अँड लिटिल वाँग टीन बार (१९६२) या चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. पुढील काही वर्षांत द लव्ह इटर्न (१९६३), कम ड्रिंक विथ मी (१९६६), अ टच ऑफ झेन (१९७१) या चित्रपटांत छोट्याछोट्या भूमिका त्यांनी केल्या. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी ब्रूस लीच्या फिस्ट ऑफ फ्युरी (१९७२) आणि एन्टर द ड्रॅगन (१९७३) या चित्रपटांमध्ये स्टंटमॅन (साहसवीर) म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनालिटिल टायगर ऑफ कँटन (१९७३) या चित्रपटामध्ये नायकाची मुख्य भूमिका मिळली. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांची चित्रपटाची कारकीर्द सुरू झाली.
१९७६ साली जॅकी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया येथे आई-वडलांकडे परतले. तेथे त्यांनी डिक्सन कॉलेजात शिक्षण घेतले. सोबतच बांधकाम कामगार म्हणूनही काम केले. हे काम करताना जॅकी चॅन हे नाव त्यांना मिळाले, जे पुढे कायमस्वरूपी टिकले. चित्रपट उद्योगात प्रवेश केल्यावर जॅकी यांनी सॅमो हंग यांच्या साथीत हापकिदो या मार्शल आर्ट्स (युद्धकला) प्रकारात नैपुण्य मिळवले. सोबतच ते कराटे, जूदो, तायक्वांदो आणि ब्रूस ली यांचे जीत कुन दो हे इतर मार्शल आर्ट्स प्रकार शिकले.
प्रसिद्ध अभिनेता ब्रूस ली यांचे १९७३ साली अचानक निधन झाले. त्यामुळे हाँगकाँग चित्रपट उद्योगात एक पोकळी निर्माण झाली होती. त्याचवेळी निर्माते विली चॅन यांनी दिग्दर्शक जॉन वूच्या हँड ऑफ डेथ (१९७६) मधील जॅकी यांच्या स्टंटचे काम बघून लो वेई दिग्दर्शित न्यू फिस्ट ऑफ फ्युरी (१९७६) या चित्रपटात त्यांना संधी दिली; पण या चित्रपटाला अपेक्षित तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. कारण ब्रूस ली यांच्या मार्शल आर्ट्स शैलीला आत्मसात करणे जॅकी चॅन यांना अवघड गेले. स्नेक इन द इगल्स शॅडो (१९७८) या युआन वू पिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात जॅकी यांना त्यांच्या शैलीनुसार स्टंट करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. परिणामस्वरूप त्यांची मार्शल आर्ट्स व विनोदाची सांगड घालणारी शैली असलेला कुंग फू ॲक्शन-कॉमेडी हा चित्रपटप्रकार उदयास आला. तसेच हाँगकाँग चित्रपटांना नवसंजीवनीही मिळाली. चॅन यांच्या त्याचवर्षीच्या ड्रंकन मास्टर या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले.
१९७९ मध्ये जॅकी यांना पहिला चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. निर्माता लो वेई यांनी द फिअरलेस हायना हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी जॅकी यांना पाचारण केले. याच काळात त्यांना विली चॅन या खाजगी व्यवस्थापकाची साथ मिळाली, जी पुढे तीस वर्ष टिकली. १९८० च्या सुरुवातीला हॉलिवुडमध्ये काम मिळण्यासाठी विली चॅनची मदत जॅकी यांना उपयोगाची ठरली. त्यांना द बिग ब्रोल (१९८०), द कॅननबॉल रन (१९८१) आणि द प्रोटेक्टर (१९८५) असे तीन हॉलिवुड चित्रपट मिळाले. पण कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना आलेला हॉलिवुडचा अनुभव फारसा आनंददायी नव्हता; पण तेथील चित्रपटाच्या शेवटच्या श्रेयनामावलीत चित्रीकरणातील तुकडे दाखवण्याची पद्धत पुढे जॅकी यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य ठरले. या दरम्यान त्यांचे द यंग मास्टर (१९८०) आणि ड्रॅगन लॉर्ड (१९८२) हे दोन चित्रपट पूर्व आशियातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. तो प्रतिसाद त्यांच्या कारकीर्दीला उभारी देणारा ठरला. यांमध्ये पाठोपाठ आणि बऱ्याचवेळ चालणाऱ्या साहसी कृती (स्टंट ॲक्शन), विविधप्रकारच्या शारीरिक कसरती असे प्रयोग केलेले होते.
प्रोजेक्ट ए (१९८३) यात पहिल्यांदा ‘थ्री ड्रॅगन्स’ म्हणजे जॅकी चॅन, सॅमो हंग आणि युआन बीयू यांनी एकत्र काम केले. या चित्रपटामुळे जॅकी यांची कीर्ती सर्वदूर पसरली. यामधूनच त्यांची जीवघेणे स्टंट करण्याची शैली प्रकाशझोतात आली. या चित्रपटामध्ये त्यांचा क्लॉक टॉवरवरील प्रसिद्ध स्टंट आहे. यासाठी त्यांना हाँगकाँग फिल्म सोहळ्यामध्ये ‘बेस्ट ॲक्शन डिझाइन’ हा पुरस्कार मिळाला. विनर्स अँड सिनर्स (१९८३) या चित्रपटापासून त्यांनी पोषाखी पद्धतीचे कथानक त्यागून समकालीन आधुनिक हाँगकाँगच्या पार्श्वभूमीवरील कथानकावर काम केले. या नंतरच्या दोन वर्षांत जॅकी यांनी व्हील्स ऑन मिल्स (१९८४) आणि माय लकी स्टार्स या साहसी-विनोदी दृश्ये असलेल्या चित्रपटांत अभिनय केला व त्यांच्या निर्मितीतही सहभाग घेतला. पोलीस स्टोरीमध्ये (१९८५) जॅकींनी एक पाऊल पुढे जात मागील चित्रपटांपेक्षा जास्त जीवघेणे स्टंट्स केले. १९८६ च्या हाँगकाँग फिल्म अवॉर्ड्समध्ये पोलीस स्टोरीला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आर्मर ऑफ गॉड (१९८६) या चित्रपटामुळे जॅकी चॅन यांच्या तोपर्यंतच्या सर्व चित्रपटांचे तिकिटबारीवरील विक्रम मोडले. मिरॅकल्स (१९८९) हा त्यांच्या आवडत्या हॉलिवूड म्यूजिकल्सना मानवंदना देणारा चित्रपट आहे.
जॅकी चॅन यांची नव्वदच्या दशकाची सुरुवात आर्मर ऑफ गॉड २ : ऑपरेशन काँडोर (१९९१) या चित्रपटाने झाली. पुढील काही वर्ष जॅकींनी त्यांच्या आधीच्या चित्रपटांचीच पुढची आवृत्ती बनवली. त्यातील पोलीस स्टोरी ३ : सुपर कॉप (१९९२), ड्रंकन मास्टर २ (१९९४) इत्यादी चित्रपट गाजले. ड्रंकन मास्टर २ मध्ये जॅकी यांनी चीनमधील सुप्रसिद्ध नेते वाँग फी-हंग यांचे पात्र साकारले. हॉलीवूडमध्ये अनेक अपयशानंतर रम्बल इन द ब्राँक्स (१९९५) या त्यांच्या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. हा आज कल्ट चित्रपट (खास प्रेक्षक वर्ग असलेले, दिवसेंदिवस ज्याची प्रसिद्धी वाढते आहे, असे प्रभावी चित्रपट) म्हणून ओळखला जातो. यानंतर प्रदर्शित झालेल्या रश अवर (१९९८) या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने जॅकी चॅन यांचे अमेरिकेत बस्तान बसले. यातील जेम्स कार्टर (टकर) या अभिनेत्याची बडबड्या पोलीसाची भूमिका व जॅकीच्या मार्शल आर्ट्सचे कौशल्य ही त्यांची जुळून आलेली जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. तिकिटबारीवरील त्यांचा एक अतिशय यशस्वी चित्रपट म्हणून याची नोंद आहे.
जॅकी यांनी यानंतर द ॲक्सिडेंटल स्पाय (२००१), शांघाय नून (२०००), शांघाय नाईट्स (२००३), द टक्सिडो (२००२), द मडालिअन (२००३) व अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज (२००४) इत्यादी चित्रपट केले. पैकी शांघाय नून ही चित्रपटमालिका सोडली, तर इतर चित्रपटांना म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. पण पुढच्या रश अवर २ (२००१) या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली. या दशकाच्या शेवटी चॅन यांनी ‘जॅकी चॅन एम्परर मुव्हीज लिमिटेड’ या नावाने चित्रपटनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी न्यू पोलीस स्टोरी (२००४), द मिथ (२००५) आणि रॉब-बी-हूड (२००६) हे चित्रपट तयार केले. पैकी रॉब-बी-हूड यशस्वी ठरला. तसेच या चित्रपटांपासून त्यांनी आपल्या अभिनय शैलीत बदल केला. जास्तीत जास्त नाट्यमय भूमिकांवर भर देण्याचा प्रयत्न त्यांनी यांतून केला. सोबतच रश अवर ३ (२००७) हाही चित्रपट उत्तम चालला. यानंतर त्यांनी शिन्जुकू इन्सिडेंट (२००७), द फॉरबिडन किंग्डम (२००८), द स्पाय नेक्ट्स डोअर (२०१०), लिटिल बिग सोल्जर (२०१०), द कराटे किड (२०१०), आर्मर ऑफ गॉड ३ : चायनीज झोडीयाक (२०१२), पोलीस स्टोरी २०१३ (२०१३), ड्रॅगन ब्लेड (२०१५), कुंग फू योगा (२०१७) आणि द फॉरेनर (२०१७) इत्यादी चित्रपट केले.
जॅकी चॅन यांचा विवाह जोन लिन या तैवानच्या अभिनेत्रीसोबत झाला (१९८२). त्यांना जेसी चॅन हा मुलगा असून तो अभिनेता व गायक आहे. जॅकी यांना कँटनीज, मँडरिन, इंग्लिश, अमेरिकन साईन लँग्वेज या भाषा अस्सलिखित बोलता येतात, तर जर्मन, कोरियन, जपानी, स्पॅनिश आणि थाई भाषा काही प्रमाणात येतात. त्यांनी लेखक झू मो व जेफ यंग यांच्यासोबत अनुक्रमे आय एम जॅकी चॅन : माय लाईफ इन ॲक्शन (१९९८) आणि नेव्हर ग्रो अप (२०१५, इंग्लिश २०१८) ही दोन आत्मचरित्रे लिहिली आहेत.
जॅकी चॅनचे चित्रपट मार्शल आर्ट्सच्या दृश्यांसाठी विशेषकरून ओळखले जातात. याचे समायोजन करण्यासाठी ‘जॅकी चॅन स्टंट समूहा’ची स्थापना करण्यात आली (१९७६). प्रोजेक्ट ए या चित्रपटानंतरच्या त्यांच्या सर्व चित्रपटांमधील मार्शल आर्ट्सची दृश्ये त्यातल्या विविध बारकाव्यांसहित समायोजित करण्याचे काम हा समूह करत असे. त्यात ६ सदस्य होते. पुढे त्यांची संख्या २० वर गेली. जॅकी यांनी कारकीर्दीतील सर्व मार्शल आर्ट्ससंबंधित धाडसी दृश्ये स्वतःच केलेली आहेत. त्यामुळे त्यांना अनेक गंभीर आणि किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना शारीरिक इजाही खूप झाली. या दृश्यांचे चित्रीकरण कित्येक वेळा त्यांच्या जीवावर बेतले. त्यांचे ते-ते स्टंट्स चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीत दाखवण्यात येतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद ‘सर्वाधिक धाडसी लढाईची दृश्ये करणारा हयात अभिनेता’ म्हणून करण्यात आली आहे.
जॅकी यांच्या चित्रपटीय कारकीर्दीचा देशविदेशातील अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. अमेरिकन कोरिओग्राफी संस्थेकडून ‘इनोव्हेटर पुरस्कार’, हॉलीवुडच्या ‘वॉक ऑफ फेम’ येथे जगभरातील सन्माननीय कलाकारांच्या ताऱ्यांत (२००२) त्यांच्या नावाचाही तारा कोरण्यात आला आहे. हाँगकाँग चित्रपट महोत्सवात त्यांना वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. युनायटेड किंग्डमकडून ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (१९८९) या पदवीने त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच चित्रपटातील असामान्य कर्तृत्वासाठी त्यांना ऑस्कर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे (२०१६). शांघायमध्ये असणाऱ्या जॅकी चॅन संग्रहालयात जेसी फिल्म गॅलरीसमोर त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. चॅन हे युनिसेफचे गुडविल अम्बॅसेडर आहेत. त्या अंतर्गत त्यांनी विविध लोकापयोगी कार्यक्रमात सहभाग घेतला. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी अंतर्गत जॅकी चॅन सायन्स सेंटरची (२००८) सुरुवात करण्यात आली आहे.
जॅकी चॅन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे मार्शल आर्ट्सप्रणित चित्रपटांचा चेहरामोहरा बदलताना त्यांनी चित्रपट-इतिहासात स्वतःचा कायमस्वरूपी ठसा उमटवला.
समीक्षक : निखिलेश चित्रे