अली, मेहमूद : (२९ सप्टेंबर १९३२–२३ जुलै २००४). मेहमूद या नावाने लोकप्रिय असलेले भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक, गायक व निर्माते. विनोदी भूमिका करणारे अभिनेते म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मुमताज अली व आईचे नाव लतिफुन्नीसा होते. या दांपत्याचे ते आठवे अपत्य होते. मुमताज अली रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेता व नृत्य दिग्दर्शक होते. मेहमूद यांचे मूळ घराणे तमीळ आहे. त्यामुळे मेहमूद यांचे दाक्षिणात्य भाषेवर विशेष प्रेम होते. त्यांचे बंधू अन्वर अली, उस्मान अली व बहीण मीनू मुमताज यांनीही चित्रपटांत अभिनय केला आहे.

बॉम्बे टॉकीजच्या किस्मत (१९४३) या चित्रपटात बाल कलाकार म्हणून मेहमूद यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. मास्टर भगवान, गोप (गोप विशनदास कमलानी) व जॉनी वॉकर या विनोदवीरांनंतर नंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती मेहमूद यांना मेहमूद यांनी अभिनेता होण्यापूर्वी सर्व प्रकारची पडेल ती कामे केली. चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी, गीतकार भरत व्यास, राजा मेहंदी अली खान, निर्माते पी. एल. संतोषी यांचे गाडीचे चालक म्हणूनही काम केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनिस शिकविण्याची नोकरी मेहमूद यांना मिळाली. याच काळात मीना कुमारींची बहीण मधू यांच्या प्रेमात ते पडले व नंतर त्यांनी लग्न केले. मुलेही झाली. संसार जरा मोठा झाल्यामुळे अधिक पैसे कमाविण्यासाठी एक मार्ग म्हणून ते अभिनयाकडे वळले. १९५३ ते १९५७ या काळात दो बिघा जमीन, नास्तिक, सी. आय. डी., बारीश, प्यासा इत्यादी चित्रपटांतून त्यांनी लहानलहान भूमिका केल्या.

परवरीश (१९५८) या चित्रपटात मेहमूद यांना चित्रपटाचे नायक राज कपूरच्या यांच्या भावाची मोठी भूमिका मिळाली. या भूमिकेने मेहमूद यांना हास्य कलावंत म्हणून पहिली प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर १९५९ मध्ये दक्षिणेतल्या ‘प्रसाद फिल्म’ या बॅनरच्या छोटी बहन या चित्रपटामधील भूमिकेमुळे त्यांच्या चित्रपटीय कारकीर्दीला विधायक वळण मिळाले. या चित्रपटातून मेहमूद आणि शुभा खोटे ही जोडगोळी लोकप्रिय झाली. यातील भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटाचे मानधन म्हणून मेहमूद यांना ६,००० रुपये मिळाले. जी त्यांची त्या काळातील सर्वांत मोठी कमाई होती. यानंतर मियाँ बीवी राजी, मंझील व किशोरकुमार सोबतचा श्रीमान सत्यवादी  इत्यादी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.

१९६१ मध्ये मेहमूद यांनी स्वत:च्या ‘मुमताज पिक्चर्स’ या संस्थेद्वारे छोटे नवाब हा पहिला चित्रपट निर्माण केला, ज्यात मुख्य नायकाच्या भूमिकेत ते स्वत: होते. चित्रपटातील संगीतासाठी मेहमूद यांनी राहुल देव बर्मन यांना संगीतकार म्हणून पहिल्यांदा संधी दिली. याच वर्षी ‘प्रसाद फिल्म’च्या ससुराल मधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराचे पुन्हा नामाकंन मिळाले. १९६२ मधील दिल तेरा दिवाना हा शम्मीकपूर सोबतचा त्यांचा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात त्यांनी विनोदी अभिनयाचे विविध पैलू साकार करत सहनायकाच्या फिल्मफेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले. यानंतर हमराही, घर बसाके देखो, भरोसा, गृहस्थी, जिंदगी, जिद्दी इत्यादी चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका केल्या.

१९६५ मध्ये राजा नवाथे यांचा रहस्यमयी विनोदी चित्रपट गुमनाम प्रदर्शित झाला. मेहमूद यांनी यातील हैदराबादी नोकर हैदराबादी बोली सहित पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर आणला. लुंगी, चट्ट्यापट्ट्याचा शर्ट, चार्ली चॅपलीनसारख्या मिशा अशा अवतारातील मेहमूद यांचे ‘हम काले है तो क्या हुवा दिलवाले है…’ हे  हेलनबरोबरचे नृत्यगीत चांगलेच गाजले. ही भूमिकाही प्रेक्षकांनी पसंत केली. याच वर्षी भूत बंगला या विनोदी भयपटाची निर्मित करून ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले. १९६६ मधील प्यार किये जा यातील चित्रपटवेड्या तरुणाच्या भूमिकेने त्यांना विनोदी भूमिकेसाठीचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

१९६८ मध्ये मेहमूद यांनी एन. सी. सिप्पी यांच्या सहकार्याने पडोसन या चित्रपटाची निर्मिती केली. यातील त्यांची मास्टर पिल्लई ही व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील एक चतुर नार बडी होशियार हे किशोरकुमार व मन्ना डे यांची जुगलबंदी असलेले गाणे चांगलेच लोकप्रिय झाले. यानंतरचे त्यांचे आँखे, नील कमल, दो कलियाँ, साधू और शैतान वगैरे चित्रपटही लोकप्रिय झाले. १९६९ मधील वारीस चित्रपटातील भूमिकेने त्यांना पुन्हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवून दिला. आय. एस. जोहर या अभिनेत्यासोबतचे त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी पसंत केले. नायिका शुभा खोटे यांच्यानंतर ७० च्या दशकात अरुणा ईराणी यांच्याबरोबर त्यांची जोडी जमली.

१९७० च्या दशकात मात्र मेहमूद यांनी विनोदी भूमिकेसोबत संवेदनशील चरित्रभूमिका रंगविण्यास सुरुवात केली. मस्ताना, मै सुंदर हूँ, लाखो मे एक, कुंवारा बाप या चित्रपटांतून हसवता हसवता प्रेक्षकांना सहजपणे गंभीर करण्याची क्षमता त्यांच्या अभिनयातून त्यांनी दर्शवली. १९७६ मधील जिनी और जॉनी आणि १९७८ मधील एक बाप छह बेटे या चित्रपटात त्यांनी आपल्या सर्व मुलांना सादर केले. नवीन कलावंतातील कलागुणांच्या क्षमतेची त्यांना उत्तम जाण होती. अमिताभ बच्चन यांना त्यांनी बॉम्बे टू गोवा या चित्रपटातून संधी दिली, तर संगीतकार राहुल देव बर्मन, राजेश रोशन, बासू चक्रवर्ती व मनोहारी सिंह यांनाही आपल्या चित्रपटातून संधी दिली.

चित्रपटात मेहमूद नायकाचा सर्वांत चांगला, साहाय्य करणारा व प्रेमळ मित्र विशेषत: अशाच भूमिकेत असत. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी जवळपास ३०० चित्रपट केले. मीनाकुमारी यांची बहीण मधूसोबतचा त्यांचा विवाह यशस्वी झाला नाही. मेहमूद आणि मधू यांना मसूद अली (पकी अली) अभिनेते, मकसूद अली (लकी अली) अभिनेता व गायक, मकदूम अली (मॅकी अली), मासूम अली ही मुले आहेत. १९६७ मध्ये त्यांनी ट्रेसी यांच्याशी विवाह केला. या दोघांना मन्सूर अली, मन्झूर अली हे मुलगे आणि जिनी अली ही मुलगी आहे. मेहमूद घोड्यांच्या शर्यतीचे शौकीन होते. बंगलोरला त्यांचा स्वत:चा घोड्यांचा तबेला होता.  हृदयाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी ते अमेरिकेस गेले असताना पेनसिल्व्हेनिया शहरात झोपेतच वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

समीक्षक : संतोष पाठारे