साऱ्या संगीत विश्वाची निर्मिती ज्यावर सर्वस्वी अवलंबून आहे तो नाद. यावाचून गीत, नृत्य, स्वर काहीच शक्य नसल्याने याला नादब्रह्म असेही म्हटले गेले आहे. संगीताचा संबंध ध्वनीशी आहे. आपण जे ऐकतो ते ध्वनीच आहेत. काही ध्वनी ऐकणे आपणास आवडते, अशा ध्वनीला मधुर ध्वनी अशी संज्ञा आहे. काही ध्वनी ऐकणे आवडत नाही, अशा ध्वनीला कर्णकटू किंवा कर्कश अशी संज्ञा आहे. पुरातन ग्रंथांमध्ये मधुर व कर्णप्रिय ध्वनीकरिता नाद ही संज्ञा आहे. भारतीय परंपरेमध्ये, आत्म्यामधून प्राण, प्राणामधून अग्नी आणि अग्नी आणि वायू यांच्या संयोगाने नाद निर्माण होतो, असे मानले गेले आहे. जो नाद संगीताला उपयोगी आहे त्याला “संगीतोपयोगी” आणि दुसऱ्या प्रकारच्या नादाला “संगीतोनुपयोगी”असे म्हटले गेले आहे.

याशिवाय जो केवळ अनुभवला जाऊ शकतो, ज्याची उत्पती अज्ञात आहे आणि जो विना आघात आणि विनासंघर्ष निर्माण होतो त्याला “अनाहत नाद” अशी संज्ञा आहे. यास सूक्ष्म किंवा गुप्त नाद असेही म्हणतात; परंतु हा नाद संगीतोपयोगी नाही, कारण हा नाद सामान्यजनांना ऐकू येणे शक्य नाही, असे मानले गेले. वैदिक संस्कृतीतील ऋषीमुनी याच अनाहत नादाची उपासना करीत. जो ध्वनी दोन वस्तूंच्या संघर्षाने निर्माण होतो आणि ज्याचे मूळ ज्ञात आहे त्या आवाजास “आहत नाद” असे म्हटले गेले आहे. हा नाद संगीतोपयोगी आहे. स्थिर आणि नियमित आंदोलनाने उत्पन्न होणारा नाद आहत नाद मानला जातो.