स्वरतालांच्या रचनेचे गायन. संगीताचे सिद्धांत गेय म्हणजे गायल्या जाणाऱ्या पद्यांमध्ये दिसून येणाऱ्या तत्त्वांवर आधारीत असतात. गेय पद्यांच्या चाली ठरलेल्या असतात. त्यांना एक विशेष तालही असतो. प्राचीन काळी वैदिक मंत्र, स्तोत्रे, आरत्या, गाथा (पौराणिक कथा), भक्तिगीते त्यांच्या त्यांच्या विशिष्ट चालींवर गायली जात. वैदिक मंत्र मात्र काव्य छंदात म्हटले जात, तालांत नव्हे. या गेय पद्यांच्या साहित्यापासून अर्थात शब्दरचनेपासून वेगळा असा त्यांच्या चालींवर म्हणजे स्वर-तालांच्या बांधणीवर विचार होऊ लागला, तेव्हा संगीताचे शास्त्र अस्तित्वात आले. या चालींचाच विकास पुढे ‘जाती’ नामक स्वररचनांत झाला. ‘जाती’ म्हणजे गेय पद्यांची चाल. गेय पद्यांची स्वर-ताल रचना स्वरलिपीप्रणाली अस्तित्वात येण्यापूर्वी अथवा ती विशेष प्रचलित झाली नव्हती, तेव्हा नाटकांच्या गीतांच्या मथळ्यांवर अमुकअमुक गीताच्या चालीवर असे लिहिलेले असे. ही चाल अर्थातच स्वरतालांची रचना म्हणजेच ‘जाती’. भरतमुनीलिखित नाट्यशास्त्राच्या काळात (इ.स. पाचव्या शतकाच्या काळात) जातींचाच प्रचार प्रचलित होता.

भरतमुनींच्या मतानुसार तीन जातींमध्ये स्वरसाधारणाचा प्रयोग असा होत असे. त्या जाती म्हणजे १) मध्यमी (अथवा मध्यमा), २) षड्जमध्यमा, ३) पंचमी. षड्जमध्यमामध्ये ‘षड्ज’ अंश स्वर होता, मध्यमीमध्ये ‘मध्यम’ आणि पंचमीमध्ये ‘पंचम्’ अंश स्वर असे. जातींचे एकूण अठरा प्रकार सांगितले आहेत. भरतमुनींच्या काळात ‘गंधार ग्राम’ लुप्त झाला होता. त्यामुळे षड्जग्रामाश्रित सात जाती आणि मध्यमग्रामाश्रित अकरा जाती सांगितल्या आहेत. तेव्हा एकूण अठरा जाती आहेत. त्या खालीलप्रमाणे —

अ) षड्जग्रामाश्रित जाती : १) षाड्जी, २) आर्षभी, ३) धैवती, ४) नौषादी अथवा निषादिनी, ५) षड्जोदीच्यवती अथवा षड्जोदीच्यता, ६) षड्ज कैशिकी, ७) षड्जमध्या अथवा षड्जमध्यमा

ब) मध्यमग्रामाश्रित जाती : १) गान्धारी, २) मध्यमा, ३) गान्धारोदीच्यवा, ४) पंचमी, ५) रक्तगान्धारी, ६) गान्धारपंचमी, ७) मध्यमोदीच्यवा, ८) नन्दयन्ती, ९) कार्मारवी, १०) आन्धी, ११) कैशीकी

या अठरा जातींचे दोन वर्ग आहेत – एक शुद्धजाती व दुसरा विकृत जाती. शुद्ध जातींमध्ये कोणताही स्वर वगळला जात नसे. अर्थात त्यांत सातही स्वरांचा प्रयोग होत असे. वरील षड्जग्रामाश्रित जातींपैकी क्रमांक एक, दोन व चार अर्थात क्रमशः गान्धारी, मध्यमा व पंचमी या शुद्ध जाती आहेत. तेव्हा एकूण सात जाती शुद्ध मानल्या जात. भरताच्या मतानुसार जेव्हा जातीच्या नामसूचक स्वराला ग्रह, अंश व न्यास स्वरांच्या रूपांत प्रयुक्त करून सप्तस्वरांच्या बरोबर त्याचा विस्तार केला जातो, तेव्हा ती जाती शुद्ध जाती म्हणून मानली जाते आणि जेव्हा अंश या ग्रह स्वरांना बदलून अथवा एक किंवा दोन स्वरांना वर्ज करून विस्तार केला जातो, तेव्हा त्या शुद्ध जातीचे विकृत जातीत रूपांतर होते. वरील सात शुद्ध जातींव्यतिरिक्त उर्वरित षड्जग्रामाश्रित तीन जाती आणि मध्यमग्रामाश्रित आठ जाती मिळून अकरा विकृत जाती आहेत. जातींच्या गायनात खालील दहा नियम पाळले जात असत –

१) ग्रहस्वर, २) अंशस्वर, ३) तारस्वर, ४) मंद्रस्वर, ५) न्यासस्वर, ६) अपन्यास स्वर, ७) संन्यासस्वर, ८) विन्यासस्वर, ९) अल्पत्व, १०) बहुत्व.

शारंगदेव लिखित संगीत रत्नाकर या ग्रंथात वरील अठरा जातींतूनच तीस रागांची उत्पत्ती सांगितली आहे व या मुख्य रागांना ‘ग्रामराग’ असे नाव आहे. या ग्रामरागांच्या अंग-प्रत्यंगांपासून आणखी नऊ प्रकारचे राग सांगितले आहेत.

एकंदर दहा प्रकारचे राग त्यावेळच्या भारतीय संगीतात मानले जात असत, ते असे – १) ग्रामराग २) उपराग ३) राग ४) भाषा ५) विभाषा ६) अंतरभाषा ७) रागांग ८) उपांग ९) भाषांग १०) क्रियांग.

समीक्षण : सुधीर पोटे