एक आसनप्रकार. या आसनामुळे शरीराच्या सर्व अवयवांना लाभ होतो म्हणून या आसनाला सर्वांगासन असे म्हणतात. या आसनाच्या रचनेवरून हे आसन म्हणजे विपरीतकरणीची पुढची पायरी आहे असे म्हणता येईल. योगसूत्रावरील वल्लभाचार्यांच्या किरणटीकेमध्ये (२.४६) व रुद्रयामलम् तंत्रात (२३.८७-९०) सर्वांगासनाचा उल्लेख आढळतो. परंतु, हठप्रदीपिका  व घेरण्डसंहिता  या दोन्ही ग्रंथांमध्ये सर्वांगासनाचा उल्लेख आढळत नाही.

कृती : पाठीवर उताणे पडून पाय एकमेकांजवळ ठेवावेत. तळहात शरीराच्या जवळच जमिनीवर पालथे ठेवावेत. विपरीतकरणीप्रमाणेच दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता सरळ वर उचलावेत व त्याच लयीमध्ये कंबरही उचलावी. तत्काळ तळहातांचा आधार कंबरेस द्यावा. कंबरेला मस्तकाच्या दिशेने झुकवावे व पाय मस्तकाच्या मागे न्यावेत जेणेकरून मस्तक व धड यांचा जवळ जवळ ९० कोन होईल. हनुवटी छातीला टेकवावी. डोळे मिटावेत किंवा दृष्टी पायांच्या अंगठ्यांवर स्थिर करावी. नैसर्गिक श्वसन सुरू ठेवावे. या स्थितीत १ ते ३ मिनिटे स्थिर रहावे. क्षमता असल्यास हा काळ अर्ध्यातासापर्यंत नेता येईल. आसन सहजतेने व सुखपूर्वक करावे. ओढूनताणून, खूप श्रमाने किंवा जबरदस्तीने करू नये. आसन सोडण्यासाठी पाय मस्तकाच्या दिशेने किंचित खाली आणावेत. हात खाली आणून जमिनीवर सरळ ठेवावेत. कंबर खाली आणावी व नंतर पाय सावकाश खाली आणावेत. पाय पसरून थोडावेळ विश्रांती घ्यावी. गरज असल्यास हे आसन पुन्हा एकदा करावे.

लाभ : या आसनात मांडया, पोट, कंबर यांच्या स्नायूंना व्यायाम मिळाल्यामुळे थोड्या दिवसांत ते सशक्त होतात. गळ्यावर दाब पडल्याने कंठस्थ अंत:स्रावी ग्रंथींना (Thyroid and Parathyroid) अधिक रक्तपुरवठा होतो. या ग्रंथींतून होणाऱ्या स्रावामुळे शरीरातील सर्व कार्ये प्रभावित होतात व सर्वसाधारण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या आसनाने पचनशक्ती व स्मरणशक्ती वाढते. दिवसभर मन ताजेतवाने व प्रफुल्लित राहते. थकवा नाहीसा होतो. जननेंद्रियांचे विकार, अंतर्गळ (Hernia), बद्धकोष्ठता, पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या मोठ्या होणे (Varicose veins) यावर हे आसन उपयुक्त आहे. हे आसन केल्यास स्नायू शिथिल होण्यामुळे कारणीभूत होणारा ओटीपोट खाली लोंबण्याचा दोष दूर होतो.  ज्ञानेंद्रिये अधिक कार्यक्षम होतात. वृद्धत्व लवकर येत नाही.

विधिनिषेध : पाठीचे वकंबरेचे जुनाट दुखणे, मानेचा विकार, कंठातील दाह, डोकेदुखी, सर्दी, कानांचा विकार,उच्चरक्तदाब, दोन मणक्यांमधील चकती सरकणे (Slip disk) यांपैकी कोणताही विकार असल्यास सर्वांगासन करू नये. आसन करताना शरीर काटकोनात असल्याने त्याचा भार हातांवर पडत नाही याची खात्री करावी. तोंड बंद ठेवावे. आसनस्थितीत आवंढा गिळण्याचा प्रयत्न करू नये. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. पहिल्याच दिवशी आसन पूर्ण साधण्याचा अट्टहास करू नये. काही दिवस विपरीतकरणी आसनाचा सराव करून त्यानंतरच हे आसन करावे. आसन करताना मस्तकात जडपणा, डोळे लाल होणे व कानामध्ये आवाज जाणवल्यास आसन सोडावे व विश्रांती घ्यावी. हे आसन तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकणे व करणे गरजेचे आहे.

समीक्षक : साबिर शेख