इन्स्टिट्यूट क्युरी, पॅरिस : (स्थापना – १९०९) पॅरिस येथील क्युरी इन्स्टिट्यूटची सुरुवात १९०९मध्ये रेडियम ह्या किरणोत्सर्गी मूलद्र्व्याच्या प्रणेत्या मेरी क्युरी ह्यांच्या संशोधन कार्यासाठी, पॅरिस विश्वविद्यालय आणि पाश्चर इन्स्टिटयूट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या ‘रेडियम इन्स्टिटयूट (Institut du Radium) ‘ द्वारे झाली. प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ मेरी  क्युरी  ​ह्यांनी पॅरिस विद्यापीठात संशोधनाला सुरुवात केली. याच विद्यापीठातील पिएर क्युरी आणि हेन्री बेकवेरेल यांच्या सहकार्याने  किरणोत्सारितेवर संशोधन केले. या कामासाठी त्या तिघाना 1903 सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले होते. या संस्थेत मादाम क्युरी यांच्या पुढाकाराने अनेक तरुण शास्त्रज्ञ किरणोत्सारितेचा अभ्यास करू लागले.  एन्री द रॉथसचाइल्ड (Henri de  Rothschild) ह्यांच्या आर्थिक देणगीतून १९२० मध्ये ‘क्युरी फौंडेशन’ची स्थापना झाली. त्याची ध्येयधोरणे सुद्धा रेडियम इन्स्टिटयूट प्रमाणेच ठरविली होती. १९२२ साली ह्या संस्थेमार्फत एक नवे चिकित्सालय उघडले गेले आणि डॉ. रेगो ह्यांनी कर्करोग्यांवर किरणोत्सर्जनाद्वारे उपचार करण्याची मुहूर्तमेढ घातली.

त्याचवेळी डॉ. क्लाडियस रेगॉड (Dr. Claudius Regaud) यांच्या नेतृत्वाखाली जवळच असलेल्या पाश्चर प्रयोगशाळेत किरणोत्सारी पदार्थाचे औषधी उपयोग या विषयावर संशोधन सुरू होते. त्या दोघांनी एकत्रितपणे काम करायचे ठरविले. पहिल्या महायुद्धानंतर या दोन्ही संस्था एकाच छत्राखाली काम करू लागल्या. या संस्थेत किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग करून कॅन्सरवर उपचार करायला सुरुवात केली. या कामाला थोड्याच दिवसात चांगले यश प्राप्त झाले. संस्थेत केलेल्या संशोधनाचा गरजू व्यक्तींना फायदा घेता यावा यासाठी संस्थेला जोडलेले एक इस्पितळ उभारण्यात आले. त्याचबरोबर विविध विषयात संशोधन करण्यासाठी वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आले. या सर्व विभागांना एकत्र करून १९७० मध्ये  इन्स्टिटय़ूट क्युरी (Institut Curie) ही संस्था निर्माण करण्यात आली. १९३४ मध्ये मेरी क्युरी ह्यांचे देहावसान झाले त्याच सुमारास त्यांच्या सुविद्य कन्या इरिना आणि जावई फ्रेडरिक जोलीएत-क्युरी ह्यांनी ‘रेडियम इन्स्टिटयूट’ मधेच कृत्रिम किरणोत्सर्गी मूलधातूंची निर्मिती केली. ह्या संशोधामुळे १९३५ मधील रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ह्या दांपत्याला प्राप्त झाले. संस्थेच्या दवाखान्यात येऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने फ्रेंच सरकारने देऊ केलेल्या निधीतून एक नवे रुग्णालय १९३६ मध्ये संस्थेमार्फत सुरू केले गेले.  १९४६ मध्ये कॅनडास्थित एका निनावी दानशूरांच्या देणगीतून ह्या रुग्णालयाचा विस्तार केला गेला.

विविध प्रकारचे आंतरवैज्ञानिक संशोधन या संथेत केले जाते. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, औषधशास्त्र, जीव माहिती शास्त्र अशा वेगवेगळ्या शाखेतील तज्ज्ञ या संस्थेत काम करतात. विशेषतः किरणोत्सर्गाचा वापर करून कॅन्सर नियंत्रित करण्यासाठी नवनवीन प्रयोग या संस्थेत केले जातात. आजच्या घडीला कॅन्सरवर संशोधन आणि उपचार करणारी यूरोपातील एक अग्रगण्य संस्था असा तिचा लौकिक आहे. या तंत्राचे प्रशिक्षण तर येथे दिले जातेच त्याचबरोबर, या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या संशोधकाना संशोधनाच्या सुविधा देखील पुरविल्या जातात. त्यामुळे वेगेवेगेळ्या देशातील संशोधक इन्स्टिट्यूट क्युरी या संस्थेत मोठ्या संख्येने येतात. १९७०मध्ये रेडियम इन्स्टिटयूट आणि क्युरी फौंडेशन ह्यांच्या एकत्रीकरणातून ‘क्युरी इन्स्टिट्यूट’ची  स्थापना  झाली. ह्या संस्थेची उद्दिष्टे सुद्धा संशोधन, अध्यापन आणि कॅन्सरवरील उपचार अशीच ठरली. त्या दृष्टीने अनेक उपचार केंद्रे उभारली गेली. इरिना जोलीयेत क्युरी ह्यांनी स्थापिलेल्या ‘आई वडिलांचे कार्य  (parent’s mission किंवा फ्रेंच मधील Maison des Parents) ह्या निधीद्वारा १९९२ मध्ये कर्करोगावरील सिंक्रोसायक्लोट्रॉन ह्या तंत्राचा उपयोग करून प्रोटॉन उपचाराची सुरुवात झाली. २००८ मध्ये  विकसनशील जैविक विज्ञान आणि कर्करोग विभाग सुरू केले गेले. आता खूप मोठ्या प्रमाणात क्युरी इन्स्टिट्यूटचा विस्तार झाला आहे. अतिशय दुर्धर आणि दुर्मिळ अशा कर्करोगयांवर येथे सर्वोत्तम उपाय केले जातात. जवळ जवळ ३३०० संशोधक तेथे कार्यरत आहेत. कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि अध्यापन ह्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि रुग्णांना  सर्वोत्तम उपचार मिळावेत म्हणून  २०२० मध्ये सर्व सोयींनी संपन्न अशी MC21 किंवा एकविसाव्या शतकातील मेरी क्युरी इन्स्टिटयूट आता  पॅरिसमध्ये आकार घेत आहे.

समीक्षक : श्रीनिवास केळकर