कायजर, आर्मीन डेल :    (१० नोव्हेंबर १९२७ – ५ जून २०२०) आरमिन डेल कायजर यांचा जन्म  अमेरिकेच्या ओहायो राज्यात पिक्वा येथे झाला. शालेय काळात त्यांचा छंद स्फोटकांवर प्रयोग करणे व बंद पडलेले रेडियो दुरुस्त करणे होता. त्यांच्या वडलांमुळे त्यांना निसर्गाची गोडी लागली. आर्मी सिग्नल कोअरमध्ये वयाच्या अठराव्या वर्षी नोकरी करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आर्मीसाठी संदेशवहन केल्यानंतर त्यांनी जैवभौतिकी अभ्यासासाठी पर्ड्यू विद्यापीठात  प्रवेश घेतला. त्या विषयात पदवी मिळवल्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (कॅल्टेक )  पीएच्.डी. चा अभ्यास सुरू केला.

कॅल्टेक येथे जैवभौतिकी वैज्ञानिक मॅक्स डेलब्रुक यांच्याबरोबर  त्यांनी लॅम्बडा बॅक्टेरिओफेज  विषाणूच्या जनुकीय संरचनेवर संशोधन केले. ह्या विषाणूचा संसर्ग जीवाणूमध्ये होतो. रेण्वीय जैववैज्ञानिक जीन वैगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लॅम्बडा बॅक्टेरिओफेज विषाणू, ई-कोलाय जीवाणू, पेशीमध्ये प्रवेश करून स्वत:च्या प्रती कसा बनवतो हे शोधले. एकदा ई-कोलायमध्ये प्रवेश केला म्हणजे तो सुप्तावस्थेत राहतो. त्यानंतर फक्त स्वत:च्या प्रती बनवतानाच प्रकट होतो. कायजर यांच्या संशोधनामुळे त्यांची ख्याती लॅम्बडा विषाणूवरील तज्ञ म्हणून झाली. त्यांनी आपले पीएच्.डी. पदवीचे संशोधन याच विषाणूवर केले. पीएच्.डी. नंतर त्यांनी पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये पुढील संशोधनासाठी एक वर्ष प्रवेश मिळवला. फ्रॅनकोइस जेकब हे जैववैज्ञानिक आणि सूक्ष्मजीव अनुवंश वैज्ञानिक इले वूलमॅन यांच्याबरोबर फेज लॅम्बडा व ई-कोलाय यामधील जनुकीय संबंधावर त्यांनी काम केले.

सेंट लुईमधील वॉशिंग्टन विद्यापीठात ते सूक्ष्मजीवशास्त्र विभागात आर्थर कोरेनबर्ग यांच्या विनंतीवरून रुजू झाले. १९५९ साली कोरेनबर्ग यांना डीएनए संश्लेषणातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. याच वर्षी कायजर यांच्यासहित सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहा वैज्ञानिक स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील नवा जैवरसायन  विभाग सुरू करण्यासाठी निघून गेले.

स्टॅन्फोर्डमध्ये कायजर यांनी लॅम्बडाच्या जनुकावर संशोधन केले. डीएनए प्रतिकरणावर (Replication) त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कोरेनबर्ग यांना डीएनए बेसच्या जोड्या कशा होतात याची माहिती मिळाली. फ्रांसिस क्रीक आणि जेम्स वॉटसन यांनी डीएनए मॉडेलची सिद्धता कायजर यांच्या संशोधनाच्या मदतीमुळे झाली. फेज लॅम्बडा जीनोमच्या शेवटच्या भागास असलेला एक पदरी डीएनएचा क्रम त्यांनी शोधून काढला. जीवाणू पेशीमध्ये विषाणू शिरल्यावर विषाणूच्या जनुकीय भागाचे अंगठीच्या आकारामध्ये रूपांतर होण्यात या एक पदरी डीएनएचा भाग कारणीभूत आहे. या भागाच्या संशोधनावर अधिक प्रयोग करताना कायजर व त्यांचा एक विद्यार्थी पीटर लोब्बान यांनी डीएनएचा कोणताही तुकडा जोडता येईल अशा विकराचा शोध लावला. नेमके याच पद्धतीने फेज लॅम्बडा जनुकीय भागाचे अंगठीच्या आकारात रूपांतर होते. डीएनएची दोन्ही टोके जोडली गेल्यामुळे असा आकार निर्माण होतो . त्यांच्या या शोधामुळे जैवतंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली. कोणत्याही सजीवाच्या जनुकाचे तुकडे करणे व जोडणे हा सध्याच्या जैवतंत्रज्ञानाचा पाया आहे.

त्यांच्या पूर्ण आयुष्यात महत्त्वाच्या चारशेहून अधिक संशोधन लेखांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेले ३८ संशोधन लेख आजच्या जैवतंत्रज्ञानाचा पाया आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये यूएस स्टील अ‍ॅवार्ड इन मॉलेक्युलर बायॉलॉजी, मूलभूत वैद्यकीय क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल मिळालेला आल्बर्ट लासकर अ‍ॅवार्ड आणि थॉमस हंट मॉर्गन अ‍ॅवार्ड यांचा समावेश आहे.

वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी स्टॅन्फोर्ड येथे त्यांचे निधन झाले. वयाची नव्वदी पूर्ण झाली तरी त्यांचे संशोधन चालूच होते.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी