लेबानन देशातील एक लहान, परंतु पौराणिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. आडोनिस या नावानेही ती ओळखली जाते. लांबी २३ किमी. लेबानन पर्वताच्या उतारावर, सस.पासून १,५०० मी. उंचीवरील अफ्क्वा ग्रोटो या गुहेत ती उगम पावते. उगमानंतर ही पश्चिम दिशेने वाहत जाऊन इब्राहिम शहराजवळ भूमध्य समुद्राला मिळते. उंच पर्वतीय प्रदेशातून वाहत येत असल्यामुळे तिच्या पात्रात खोल घळया आणि अनेक धबधबे निर्माण झाले आहेत. या नदीच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे उगमाकडील भागात असणारे सुमारे ३० लहान-मोठे झरे आहेत. उगमाकडील पर्वतीय भागात फेब्रुवारी महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. परिणामी येथील पर्वतीय भागाची झीज होऊन ती माती नदीच्या प्रवाहाबरोबर वाहते. त्यामुळे नदीचे पाणी लालसर दिसते.
नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या पुरावशेषांमुळे या नदीला महत्त्व आहे. लेबाननमधील ग्रीक आणि फिनिशियन पुराणकथांनुसार जुबेल (बिब्लास) शहरी प्रेम आणि सौंदर्यदेवता आर्स्टर्टी (व्हीनस) ही पूजनीय होती. हिचा प्रियकर आडोनिस शिकारीस गेला असता युद्धदेव एरीसने पाठविलेल्या डुक्कराने त्याला ठार मारले. त्याचे रक्त जेथे पडले त्या ठिकाणी लाल रंगाची फुले बहरली. तसेच इब्राहिम नदीत सांडलेल्या रक्तामुळे नदीचे पाणी पुढे काही शतके लाल रंगाचे राहिले होते. अद्यापही लोकांच्या समजुतीप्रमाणे हिच्या उगमाकडील किनारी भागातील पुरावशेषांचे ठिकाणी उगवलेल्या अंजीराच्या झाडावर आजारी लोकांची कपडे लटकविली असता आजार बरा होतो. त्यामुळे तेथे कपडे लटकविलेली आढळतात.
पौराणिक महत्त्वामुळे या नदीला पूज्य मानण्यात येते. हिच्या खोऱ्यात अनेक मंदिरे, दर्गे व तीर्थस्थळांचे अवशेष आढळतात. जागतिक वारसास्थळांत समाविष्ट करण्यासाठीच्या युनोस्कोच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे. इब्राहिम हे या नदीच्या काठावरचे महत्त्वाचे शहर आहे.

समीक्षक : वसंत चौधरी