फ्रान्समधील एक महत्त्वाची नदी. लांबी सुमारे २९० किमी., जलवाहन क्षेत्र १२,१०० चौ. किमी. फ्रान्सच्या ईशान्य भागातील म्यूझ विभागात असलेल्या आर्गॉन फॉरेस्ट या अरण्ययुक्त पठारी प्रदेशात या नदीचा उगम होतो. उगमानंतर आर्गॉन फॉरेस्टमधून उत्तरवायव्य दिशेने व नंतर पश्चिमेस वाहत जाऊन ती कोंप्येन्यजवळ डावीकडून वाझ नदीस मिळते. उगमाकडील भागात ही नदी शॅम्पेन या डोंगररांगातून वाहते, तर नंतरच्या प्रवाहमार्गाच्या उत्तर काठावर तीव्र उताराची कटकमाला आढळते. अर व व्हेल या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. नागमोडी प्रवाहमार्ग, नदीपात्रातील खोलीमधील चढ-उतार यांमुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने ही नदी जास्त उपयोगी नाही; तथापि कोंप्येन्यपासून अंतर्भागाकडे सेलपर्यंत अनेक जलपाशांद्वारे ही नदी व्यापारी जहाजवाहतुकीस योग्य केलेली आहे. म्यूझ, मार्न व सेन या नद्यांशी ही कालव्यांद्वारे जोडली आहे. ‘कॅनॉल लॅटरल एल एन’ व आर्डेन कॅनॉल हे कालवे महत्त्वाचे असून, जलवाहतुकीत वाढ होण्यासाठी या कालवा कंपन्यांमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.
ऐतिहासिक दृष्ट्या या नदीस महत्त्व असून म्यूझ, मार्न, आर्डेन, एन, वाझ या विभागांतून ही वाहते. या नदीवरूनच येथील विभागाला एन नाव देण्यात आले आहे. पूर्वी ही नदी अॅक्सन म्हणून ओळखली जात होती. इ. स. पू. ५७ मध्ये या नदीखोऱ्यात रोमन आणि बेल्गी यांच्यात ‘अॅक्सन लढाई’ झाली होती. पहिल्या महायुद्धकाळात जर्मन व दोस्त राष्ट्रे यांच्यात एन नदीखोऱ्यात १२ ते १५ सप्टेंबर १९१४; १६ एप्रिल ते ९ मे १९१७ आणि २७ मे ते ६ जून १९१८ अशा तीन ‘एन लढाया’ झाल्या होत्या. सप्टेंबर १९१४ मधील ‘मार्न लढाईत’ जर्मन फौजांचा पराभव झाला. तेव्हा जर्मन फौजा एन नदीकिनाऱ्यावरील पठारावर थांबले होते. हा भाग शमाँ-दे-दाम म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्याने ऑगस्ट १९४४ मध्ये ही नदी ओलांडली होती. तिच्या किनाऱ्यावर वूझे, रातेल, स्वासों, कोंपेन्य, बेर्नी-रिव्हिएर इत्यादी महत्त्वाची शहरे वसली आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी