निमित्स, चेस्टर विल्यम : (२४ फेब्रुवारी १८८५‒२० फेब्रुवारी १९६६). अमेरिकेच्या नौसेनेचा फ्लीट अ‍ॅड्‌मिरल. टेक्सस राज्यात फ्रेड्रिक्सबर्ग येथे जन्म.

ॲन्नपोलिस येथील नाविक अकादमीचा तो पदवीधर होता. पहिल्या महायुद्धात अमेरिकेच्या पाणबुडी दलाच्या कर्मचारी प्रशासनाचा मुख्य. दुसऱ्या महायुद्धात डिसेंबर १९४१ मध्ये पर्ल हार्बरवरील जपानी हल्ल्यानंतर पॅसिफिक आरमाराचा सरसेनापती. पॅसिफिक महासागरावरील जपानी लष्करी सत्तेचा बीमोड करण्यात जनरल डग्लस मॅक्ऑर्थरला त्याने साहाय्य केले. जपानी नाविक युद्धतंत्रावरून धडा घेऊन त्याने विमानवाहक युद्धनौका आणि त्यांवरील विमाने यांचा वापर करून जपानी आरामार कुचकामी केले. पॅसिफिक महासागरातील जपानव्याप्त मिडवे, मार्शल, मेरियाना, फिलिपीन्स, ईवोजीम व ओकिनावा ही बेटे १९४२ ते १९४५ च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने काबीज करून त्याने खुद्द जपानवरील हल्ल्याची सिद्धता केली. २ सप्टेंबर १९४५ रोजी ‘मिसुरी’ या त्याच्याच ध्वजयुद्धनौकेवर त्याने जपानची शरणागती स्वीकारली. डिसेंबर १९४४ मध्ये त्याला फ्लीट अ‍ॅड्‌मिरल हा अत्युच्च श्रेणीचा नाविक हुद्दा मिळाला. युद्धानंतर दोन वर्षे तो नौसेनाध्यक्ष होता. २१ मार्च १९४९ ते २९ जुलै १९४९ या काळात संयुक्त राष्ट्रसंघातर्फे काश्मीर सार्वमत कार्यक्रमांचा व्यवस्थापक म्हणून त्याने काम केले. १९५१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षितता व वैयक्तिक हक्क या चौकशी-आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्याने काम केले. ई. बी. पॉटर याच्या सहकार्याने त्याने सी पॉवर : ए नेव्हल हिस्टरी (१९६०) हा ग्रंथ संपादून प्रसिद्ध केला. सॅन फ्रॅन्सिस्को येथे त्याचे निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा