व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात. प्राचीन काळापासून ते आजतागायत उपासनेचा व व्यायामाचा हा प्रकार परंपरेने चालत आला आहे. त्यामागे अनेक धार्मिक समजुती व श्रद्धा आहेत.

सूर्यामुळे सृष्टीला उत्साह, उष्णता, आनंद आणि जीवन मिळत असल्यामुळे प्राचीन काळापासून हिंदूधर्मीय सूर्याला एक देवता मानतात. चलाचल सृष्टीचा सूर्य हा आत्मा आहे, असे वेदवचन आहे. भारतात धर्म आणि आरोग्य यांची सांगड घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे सूर्यनमस्कार हा एक उपासनेचा मार्ग बनलेला असावा. भारतात या आरोग्यदायक उपासनेला शास्त्रीय स्वरूप देण्याचे प्रयत्न झाले. त्यातून अनेक स्तोत्रे, संकल्प आणि पद्धती तयार झाल्या. भारतात अनेक ठिकाणी सूर्योदयाच्या पूर्वी सूर्योपासनेकरिता नित्यनेमाने नमस्कार घालणे, हे एक धार्मिक कर्तव्य मानले जाते. याला ‘अष्टांग’ वा ‘साष्टांग’ नमस्कार किंवा ‘अष्टांग दंड’ असेही म्हणतात. आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांना उपयुक्त व फलदायी असा हा व्यायाम व उपासनाप्रकार आहे.

सूर्यनमस्कारासाठी स्वच्छ, शांत व हवेशीर जागा योग्य असते. त्यासाठी सुमारे २–३ मीटर लांब आणि सुमारे पाऊण ते एक मीटर रुंद जागा पुरेशी असते. अंगावर सैल व हलकी वस्त्रे घालून व जमिनीवर सतरंजी वा चटई पसरून नमस्कार घातले जातात. सतरंजी वा चटई न वापरता नुसत्या जमिनीवरही सूर्यनमस्कार घालता येतात मात्र ती जमीन फार गुळगुळीत नसावी, जेणेकरून त्यावरून हातपाय घसरू नयेत. थंड पाण्याने स्नान करून नमस्कार घालताना सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडले, तर त्याचा चांगला उपयोग होतो. कोणत्याही साधनावाचून थोड्या जागेत व थोड्या वेळात पुरेसा व्यायाम मिळतो, हे सूर्यनमस्कारांचे एक वैशिष्ट्य होय.

“उरसाशिरसादृष्ट्यावचसामनसा तथा । पद्भ्याम्कराभ्याम्जानुभ्याम् प्रणामोऽष्टांग उच्यते ॥ ” – ही साष्टांग नमस्काराची व्याख्या होय. नमस्कार घालताना मस्तक, छाती, दोन हात, दोन पावले आणि दोन्ही गुडघे ही आठ अंगे जमिनीला प्रत्यक्ष लागतात. दृष्टी, वाणी आणि मन यांचा मानसिक उपासनेत समावेश होतो. नमस्काराला सुरुवात करताना दृष्टी समोर वा नासिकाग्राकडे ठेवली, म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. तत्पूर्वी सूर्यदेवतेचे ध्यान करून काही मंत्र म्हणतात.

प्रथम ॐ असा उच्चार करून (याला ‘प्रणव’ म्हणतात) ‘ॐ मित्राय नम:’ ह्याप्रमाणे सूर्याची बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालतात. ही बारा नावे पुढीलप्रमाणे : (१) ॐ मित्राय नम:, (२) ॐ रवये नम:, (३) ॐ सूर्याय नम:, (४) ॐ भानवे नम:, (५) ॐ खगाय नम:, (६) ॐ पूष्णे नम:, (७) ॐ हिरण्यगर्भाय नम:, (८) ॐ मरिचये नम:, (९) ॐ आदित्याय नम:, (१०) ॐ सवित्रे नम:, (११) ॐ अर्काय नम: व (१२) ॐ भास्कराय नम: । तेरावा नमस्कार घालताना ‘ॐ श्रीसवितृ-सूर्यनारायणाय नम:’ असे म्हणतात. ही एक आवृत्ती मानतात.

शिवाय ऱ्हां, ऱ्हीं, ऱ्हूं, ऱ्हैं, ऱ्हौं, ऱ्ह: या सहा बीजाक्षरांचा नावांबरोबरच उच्चार करण्याचीही पद्धत आहे. उदा., ॐ ऱ्हां मित्राय नम: ॐ ऱ्हीं रवये नम: इत्यादी. त्यानंतर दुसरे सहा नमस्कार ऱ्हां, ऱ्हीं ही पहिलीच बीजाक्षरे आणि सूर्याची दुसरी नावे घेऊन घालावयाचे. त्यानंतर तिसरे सहा नमस्कार ॐ ऱ्हां ऱ्हीं मित्ररविभ्यां नम:, ॐ ऱ्हूं ऱ्हैं सूर्यभानुभ्यां नम: अशी दोन बीजाक्षरे व दोन नावे एकदम उच्चारून घालावयाचे. त्यानंतर तीन नमस्कार चार बीजाक्षरे आणि चार सूर्याची नावे घेऊन घालावयाचे (उदा.,ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हूं ऱ्हैं मित्ररविसूर्यभानुभ्यो नम: ।). त्यानंतर तीन नमस्कार दोन वेळा सहाही बीजाक्षरे व सूर्याची बारा नावे एकत्र उच्चारून घातले, म्हणजे एकूण चोवीस नमस्कार होतात. पंचविसावा नमस्कार ‘ॐ श्रीसवितृ-सूर्यनारायणाय नम:’ असे म्हणून घातला, म्हणजे दुसऱ्या पद्धतीचे आवर्तन पूर्ण होते. ह्याशिवाय तृचाकल्प आणि हंसकल्प अशा समंत्रक नमस्कारांच्या दोन पद्घती आहेत. तृचाकल्पात ऋग्वेदातील तीन ऋचा म्हणतात आणि हंसकल्पात यजुर्वेदातील ऋचा म्हणतात. या मंत्रांबरोबरच ॐ हा प्रणव आणि सहा बीजाक्षरांचा उच्चार करतात. या दोन्ही पद्धतींत पंचवीस नमस्कारांची आवृत्ती असते.

दहा आसनांचा सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार पूर्ण झाल्यानंतर नमस्कारांचे सुपरिणाम वर्णन करणारा व तीर्थग्रहणाचा मंत्र ‘अकालमृत्युहरणंसर्व-व्याधिविनाशनम् । सूर्यपादोदकं तीर्थंजठरे धारयाम्यहम् ।’ म्हणून तीर्थ घेतात.

नमस्कार घातला की, त्यात दहा आसनेही व्हावी अशा पद्घतीने त्यांची रचना (स्थिती) केलेली आढळते. योगासनांचा अभ्यास करताना त्या विशिष्ट आसनस्थितीमध्ये काही काळ स्थिर राहणे अपेक्षित असते, परंतु सूर्यनमस्कार करताना त्यातील स्थितींमध्ये स्थिरता नसते. तरीही त्यातील दहा स्थिती या आसनांच्या बाह्य स्वरूपाशी साधर्म्य राखणाऱ्या आहेत. सूर्यनमस्कारांमधील दहा आसनस्थिती पुढीलप्रमाणे आहेत — (१) दोन्ही पावले व पाय जुळवून, गुडघे व पाठ न वाकविता ताठ उभे राहून नमस्कार करावा. त्यावेळी दृष्टी समोर किंवा नासिकाग्राकडे ठेवावी (स्थिती १० प्रमाणे) आणि श्वास घेऊन पहिला मंत्र उच्चारला म्हणजे ‘अवस्थान’ (अन्य नाव — नमस्कारासन) हे पहिले आसन होते (स्थिती १ पूरक). (२) गुडघे न वाकविता पावलांच्या बाजूला हातांचे तळवे टेकून नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावून श्वास सोडावा. त्यावेळी पोट आत ओढून घ्यावे. या स्थितीला ‘जानुनासन’ (अन्य नाव – हस्तपादासन) असे म्हणतात (स्थिती २ व ९ रेचक). (३) यानंतर उजवा पाय मागे नेऊन बोटे जमिनीला टेकवावी. त्या पायाचा गुडघा टेकावा. दुसरा गुडघा काखेखालून दंडाच्या पुढे आणून दृष्टी शक्य तितकी वर नेऊन श्वास घेतला, म्हणजे ‘ऊर्ध्वेक्षण’ (अन्य नाव — दक्षिण-पाद-प्रसारासन) आसन होते (स्थिती ३ पूरक). (४) दुसरा पाय पहिल्यासारखाच मागे टेकून हाताची कोपर ताठ ठेवून शरीर जमिनीला समांतर ठेवावे. श्वास रोखून धरावा. याला ‘तुलितवपू’ (अन्य नाव — सरल-कटि-हस्त-दंडासन) हे चौथे आसन येथे होते (स्थिती ४ कुंभक). (५) यानंतर कोपरात हात वाकवून पोट जमिनीस टेकू न देता कपाळ, छाती, गुडघे जमिनीला टेकवावे आणि श्वास सोडला म्हणजे साष्टांग नमस्कार होतो (स्थिती ५ रेचक). (६) पाय, गुडघे, हात स्थिर ठेवून हात ताठ करून छाती पुढे घेताना पाठ वाकवावी. दृष्टी शक्य तितकी वर करून श्वास घ्यावा, म्हणजे ‘कशेस-संकोच’ (अन्य नाव – वक्र-कटि-हस्त-दंडासन) होते (स्थिती ६ पूरक). (७) नंतर ‘कशेस-विकसन’ (अन्य नाव – ऊर्ध्वनितम्बासन) आसनासाठी हात स्थिर ठेवत डोके खांद्यात खाली आणून हनुवटी छातीला टेकवून कंबर उंच करताना टाचा जमिनीस टेकवाव्या आणि श्वास सोडावा (स्थिती ७ कुंभक). (८) तिसऱ्या ऊर्ध्वेक्षण नावाच्या आसनात उजवा पाय मागे नेला जातो, त्याउलट डावा पाय मागे न्यावा. यालाच वामपाद प्रसारासन असेही म्हणतात (स्थिती ८ कुंभक). (९) जानुनासन (अन्य नाव — हस्तपादासन) करून (१०) उभे राहिले की पहिले अवस्थान (नमस्कारासन) होते आणि एक नमस्कार पूर्ण होतो (स्थिती १०). पूरक म्हणजे श्वास आत घेणे, रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास थांबविणे.

बारा आसनांचा सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल दिसून येतात. काही ठिकाणी दहा आसन स्थितींचे, तर काही ठिकाणी बारा आसन स्थितींचे सूर्यनमस्कार केले जातात. बारा स्थितींमध्ये नमस्कारासनानंतर ऊर्ध्वहस्तासन केले जाते. नमस्कार स्थितीनंतर दोन्ही हात वर न्यावेत व खांद्यांच्या रेषेत हातांना सुखावह ताण द्यावा. अगदी थोड्या प्रमाणात शरीर मागील बाजूस झुकवावे. हीच स्थिती श्वास आत घेऊन क्षणभर ठेवावी. हीच स्थिती शेवटी हस्तपादासनानंतरही करावी.

सूर्यनमस्कार घाई न करता सावकाश घातले म्हणजे दम लागत नाही. नमस्कार पूर्ण झाल्यावर आनंद व उत्साह वाटला पाहिजे. थकल्यासारखे वाटल्यास नमस्कारांची संख्या शरीराला झेपण्यापेक्षा जास्त झाली, असे समजून संख्या कमी करावी. बारा नमस्कार घालावयास प्रारंभ करून झेपेल तशी संख्या वाढवावी.

योगासने करणारांनी प्रथम नमस्कार घातल्यास उपयोग होतो. शालेय कार्यक्रमात सांघिक सूर्यनमस्कार अनेक ठिकाणी घालतात. तसेच सूर्यनमस्कारांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. सूर्यनमस्कारांचा प्रसार परदेशांतही अनेक ठिकाणी झालेला दिसून येतो. शरीरसौष्ठव वाढविणारा हा व्यायाम शारीरिक कौशल्याची कामे करणाऱ्यांना पूरक ठरतो.

महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे भूतपूर्व अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांनी सूर्यनमस्काराच्या प्रसाराचे कार्य हिरिरीने पार पाडले. त्यासाठी त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांत पुस्तके लिहिली, त्यांची अनेक भाषांत भाषांतरेही झाली आहेत. प्रात्यक्षिकांसाठी त्यांनी चित्रपट व सरक-चित्रे (स्लाइड) निर्माण केली व परदेशांत सूर्यनमस्कारांचा बराच प्रचार केला. पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनीही या विषयावर स्वानुभवातून लिखाण केलेले आहे.

संदर्भ :

  • पंतप्रतिनिधी, बाळासाहेब, सूर्यनमस्कार, बडोदे, १९३८.
  • सातवळेकर, श्रीपाद दामोदर, सूर्यभेदन व्यायाम, औंध, १९२८.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रिकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.