विपरीतकरणी

हठयोगात निर्देश केलेल्या मुद्रांपैकी विपरीतकरणी ही एक मुद्रा आहे. या मुद्रेचा उपयोग आसन म्हणूनही केला जातो. विपरीत म्हणजे उलटे व करणी म्हणजे करण्याची क्रिया. या मुद्रेत मस्तक खाली व पाय वर अशी शरीराची स्थिती होत असल्यामुळे या यौगिक क्रियेला विपरीतकरणी असे म्हणतात. गुरूंकडून तिचे ज्ञान घ्यावे असे हठप्रदीपिकेत (३.७८) म्हटले आहे.

विपरीतकरणी : कृती

कृती : हे आसन करताना प्रथम उताणे झोपावे. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. तळहात जमिनीवर ठेवून दोन्ही पाय गुडघ्यात न दुमडता एकाच वेळेला ९० अंशापर्यंत वर उचलावेत. त्यानंतर कंबर वर उचलावी व तिला हातांनी आधार द्यावा. पाय मस्तकाकडे किंचित झुकलेले ठेवल्यास हातावरचा भार कमी होतो. अंतिम स्थितीत अर्धा ते १ मिनिट सहजतेने स्थिर राहावे. श्वास स्वाभाविक रीतीने चालू असावा. या क्रियेत डोळे मिटल्यास साधक अंतर्मुख होतो. आसन सोडताना पाय आणखी थोडे मस्तकाजवळ आणावेत व हातांवरचा भार कमी करून कंबर सावकाश खाली आणावी. त्यानंतर संथ गतीने पाय खाली आणावेत. थोडी विश्रांती घ्यावी.

काही दिवस अर्धहलासनाचा सराव केल्यास कंबर सहजतेने उचलता येते. सुरुवातीला केवळ १० ते १५ सेकंद अंतिम स्थितीत थांबावे. पाय झटका देऊन खाली आणू नयेत. सरावाने हळूहळू वेळ वाढवावा. श्वसन नैसर्गिक गतीने चालू ठेवावे.

विपरीतकरणी : कृती

लाभ : या आसनात पाय वर राहिल्यामुळे पायातील अशुद्ध रक्त गुरुत्वाकर्षणामुळे हृदयाकडे येते. रक्ताभिसरणास चालना मिळते. मेंदू व ज्ञानेंद्रियांस पुरेसा रक्तपुरवठा मिळतो. चेहरा तजेलदार होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. केस अकाली पांढरे होत नाहीत. जठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे ही क्रिया करणाऱ्याने अन्नाचे सेवन पुरेशा प्रमाणात करावे (हठप्रदीपिका ३.८०-८२, घेरण्डसंहिता ३.२९-३३). मेरुदंड, पाठ व कंबरेचे स्नायू बळकट होतात. अंतर्गळ (Hernia), नीलांचे फुगणे (Varicose veins ), बद्धकोष्ठता, मेदवृद्धी यासारख्या विकारांचा त्रास होत नाही. मानसिक थकवा आणि अकाली वृद्धत्व दूर राहतात. दिवसभर ताजेतवाने वाटते.

विधिनिषेध : काही जणांना पाय वर नेताना मस्तकात जडपणा जाणवतो. डोळे लालसर होतात. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. मानेचा व कंबरेचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये.

शीर्षासन, सर्वांगासन आणि विपरीतकरणी या संज्ञा समानार्थी योजिल्या जातात. तथापि शीर्षासनात पूर्ण शरीराचा भार मस्तकावर, सर्वांगासनात खांद्यांवर आणि विपरीतकरणीमध्ये मस्तक, खांदे आणि हात ह्या तिघांवर पडतो.

पहा : शीर्षासन, सर्वांगासन.

संदर्भ :

  • देवकुळे, व. ग., घेरण्डसंहिता, शारदा साहित्य, पुणे.
  • देवकुळे, व. ग., हठप्रदीपिका, शारदा साहित्य, पुणे.

समीक्षक : साबीर शेख