विष्ट्म्भ :

उत्तरविष्ट्म्भ (Summer Solstice) : आयनिकवृत्त (Ecliptic) वैषुविकवृत्ताशी (Celestial Equator) सुमारे २३.५ अंशाचा कोन करीत असल्यामुळे सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस ‘उत्तरविष्ट्‍म्भ बिंदू’ या कमाल मर्यादेपर्यंत जाऊ शकतो.  २१ मार्च या दिवशी वसंत संपात बिंदूपाशी असलेला सूर्य त्याच्या दैनिक गतीने त्याच्या मार्गावर, म्हणजे आयनिकवृत्तावर ९० अंश अंतर गेला, की तो वैषुविकवृत्तापासून उत्तरेस कमाल २३.५ अंशावर असतो. वैषुविकवृत्तापासून उत्तरेस किंवा दक्षिणेस जे अंशात्मक अंतर असते त्यास क्रांति (Declination) म्हणतात. २१ जून रोजी सूर्याची क्रांति उत्तर २३.५ अंश असते आणि वसंत संपातापासून आयनिकवृत्तावरील अंतर ९० अंश असते. आयनिकवृत्तावरील या बिंदूला ‘उत्तरविष्ट्म्भ बिंदू’ म्हणतात. येथून पुढे सूर्य दक्षिणेकडे वळतो, म्हणजे त्याची उत्तर क्रांती कमी होऊ लागते. २१ जूनच्या आसपासच्या दिवसात सूर्याच्या क्रांतीत होणारा बदल फार मोठा दिसत नाही. म्हणजे २१ जूनच्या आसपास त्याचे विस्थापन वैषुविकवृत्ताला साधारणपणे समांतरच होते. त्यामुळे तो विशिष्ट क्रांतीवर थबकल्यासारखा वाटतो, म्हणून ‘विष्ट्म्भ’ म्हणजे ‘थांबणे’ असा हा शब्द वापरलेला आहे.  २१ जून या तारखेला उत्तर गोलार्धात दिनमान जास्तीत जास्त असते.  मात्र १२ तासापेक्षा ते किती जास्त असेल हे पृथ्वीवरील त्या त्या स्थानाच्या (गावाच्या) अक्षांशावर ठरते. जसजसे अक्षांश वाढतात तसतसे दिनमान वाढते. दक्षिण गोलार्धात याच्या उलट परिस्थिती असते, म्हणजे वाढत्या अक्षांशानुसार तेथे दिनमान १२ तासांपेक्षा कमी कमी होत जाते. सूर्य उत्तरविष्ट्म्भ  बिंदूपाशी आला म्हणजे उत्तरायण संपते आणि दक्षिणायनाची सुरुवात होते. उत्तरविष्ट्म्भ बिंदूपाशी असलेला सूर्य मृगशीर्ष नक्षत्रात असतो. उत्तर ध्रुवावर या काळात सतत दिवसच असतो.  उत्तर ध्रुवावरील निरीक्षकाला या दिवशी सूर्य २३.५ उन्नतांशावर दिसेल. सूर्याचा दैनिक मार्ग त्या दिवशी क्षितिज समांतर (२३.५ उंचीवर आणि २४ तास उदित) राहील.  मात्र दक्षिण ध्रुवावर या काळात पूर्ण वेळ रात्र असेल.

 

दक्षिणविष्ट्म्भ बिंदू (Winter Solstice) : आयनिकवृत्तावर शरद संपात बिंदूपासून ९० अंशावर, किंवा उत्तरविष्ट्म्भ बिंदूपासून १८० अंशावर याचे स्थान आहे. हा बिंदू आयनिकवृत्तावर वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेस २३.५ अंशावर येतो.  म्हणजेच वैषुविकवृत्त सहनिर्देशक पद्धतीनुसार याचे स्थान होरा (R.A.) १८ तास आणि क्रांति -२३.५ असे आहे.  वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेकडे जाण्याची सूर्याची ही कमाल मर्यादा आहे. सूर्य या बिंदूवर ग्रगोरियन कॅलेंडरप्रमाणे २१ किंवा २२ डिसेंबर रोजी येतो. २३ सप्टेंबरच्या शरद संपातानंतर दक्षिणविष्ट्म्भ बिंदूपर्यंत सूर्याचे विस्थापन दक्षिण गोलार्धात होत असल्याने, या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा वाढत जातो. तर उत्तर गोलार्धात थंडी वाढत जाते. दोन्ही गोलार्धातील ऋतूंची परिस्थिती अशा तऱ्हेने उलट असते.

दक्षिण ध्रुवावरील निरीक्षकाला या दिवशी सूर्याचे उन्नतांश जास्तीत जास्त म्हणजे २३.५ अंश दिसतील. त्या दिवशी सूर्याचा प्रवास क्षितिजसमांतर होईल. रात्र होणारच नाही. सूर्य वसंत संपात बिंदूशी पोहोचेपर्यंत सूर्य क्षितिजावरच (नित्योदित) राहील. दर दिवशी हळूहळू त्याचे उन्नतांश कमी होत जातील आणि तो वसंत संपाती पोहोचला की नंतर पुढील सहा महिन्यांसाठी क्षितिजाखालीच राहील.

वसंत संपात, उत्तरविष्ट्म्भ बिंदू, शरद संपात, आणि दक्षिणविष्ट्म्भ यांचे एकमेकांसापेक्ष स्थान निश्चित असल्यामुळे क्षितिज संदर्भात एखाद्या बिंदूचे स्थान समजले, तर कोणती नक्षत्रे त्यावेळी कोठे दिसतील, याचा अंदाज करता येतो.  उदाहरणार्थ, सायंकाळी ७ वाजता दक्षिणविष्ट्म्भ बिंदू मावळत असेल, तर मूळ नक्षत्रापासून मृग नक्षत्रापर्यंतची १२-१३ नक्षत्रे पश्चिमेकडून पूर्वेकडे दिसतील, कारण दक्षिणविष्ट्म्भ बिंदूचे स्थान सध्या मूळ नक्षत्रात आहे. दक्षिणविष्ट्म्भ बिंदू पुढील तारखांना कोठे असेल ते दिले आहे. २१ मार्च (पहाटे मध्यमंडलाजवळ), २२ जून (सायंकाळी पूर्वेकडे उगवेल) २३ सप्टेंबर (सायंकाळी मध्यमंडलाजवळ) २२ डिसेंबर (सूर्याबरोबर उगवेल आणि मावळेल).

राष्ट्रीय सौर कॅलेंडरनुसार सूर्य दक्षिणविष्ट्म्भ बिंदूवर असण्याचा दिनांक: सौर १ पौष असतो, म्हणजेच या दिवसापासून राष्ट्रीय सौर पौष महिना सुरू होतो.

समीक्षक : आनंद घैसास.