चित्रा नक्षत्र :

कन्या राशीतील चित्रा हा सगळ्यात तेजस्वी तारा आहे, ज्याचे पाश्चात्य नाव ‘स्पायका’ (Spica; Alpha Verginis) असे आहे. ‘स्पायका’चा लॅटिन भाषेतील अर्थ गव्हाची लोंबी, जी कन्या राशीतल्या कन्येने हातात धरलेली आहे, अशी कल्पना आहे. कन्या राशी बरोबर आयनिक वृत्तावर येते. हस्त (Corvus Constellation) आणि भूतप (Bootes Constellation) या दोन तारकासमूहांच्या मध्ये कन्या राशी दिसते.

चित्रा हा ०.९७ ते १.०४ दृश्यप्रत असणारा रात्रीच्या आकाशातील २० तेजस्वी ताऱ्यांपैकी एक तारा आहे. चित्रा तारा हाच चित्रा नक्षत्रातील योग तारा आहे. या नक्षत्रात इतर ताऱ्यांचा समावेश केलेला दिसत नाही. चित्रा तारा आपल्यापासून सुमारे २५० ± १० प्रकाशवर्षे दूर आहे. चित्रा तारा पिधानकारी (चित्रा तारा आयनिकवृत्ताच्या अगदी जवळ असल्याने चंद्र आणि इतर ग्रह या ताऱ्यावरून प्रवास करत जाताना चित्रा ताऱ्याला झाकतात) तारा आहे. हा एक रूपविकारी द्वैती (Variable; Spectral Binary) प्रकारचा तारा आहे. या जोडीतील दोन तारे एकमेकांच्या इतके जवळ आहेत, की कुठल्याही दूरदर्शीतून ते दोन तारे वेगळे दिसू शकत नाहीत. हे दोन्ही तारे त्यांच्या सामायिक गुरुत्वमध्याभोवती ४ दिवसात एक फेरी पूर्ण करतात. त्यांचा आकारही गोल नसून अंडाकृती आहे. त्यांच्या वर्णपटाच्या सहाय्यानेच हे दोन तारे वेगळे समजू शकतात. त्यातला मुख्य तारा निळा राक्षसी तारा आहे. तोही ‘बीटा सेफी’ प्रकारचा रूपविकारी तारा आहे. चित्रा तारा वर्णपटीय वर्गीकरणात B1V या गटात मोडतो. तर दुसरा तारा B2V या गटात मोडतो. चित्रा ताऱ्यातील मोठ्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे १० पट आहे आणि तेजस्विता सूर्याच्या २०,५०० पट आहे. तर दुसऱ्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे ७ पट आहे आणि तेजस्विता सुमारे २,२५४ पट आहे.

वेद वाङ्‍मयात अनेक नक्षत्रांची मिळून प्रजापतीची एक आकृती कल्पितात, त्यात त्या आकृतीचे मस्तक चित्रा ताऱ्याजवळ आहे असे समजतात. अरबी लोक या ताऱ्याला ‘कुत्र्याचे घर’ म्हणतात, तर चीनी लोक ‘शृंगी’ म्हणतात. अर्थात अशी चित्रविचित्र नावे कशामुळे पडली हे समजणे अवघड आहे.

ग्रीक पुराणात आणि आपल्या भारतीय पुराणातही चित्रा नक्षत्राबद्दल मनोरंजक मिथक कथा आहेत.

चित्रा नक्षत्रात जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो, त्या भारतीय चांद्रमासाला ‘चैत्र महिना’ म्हटले जाते. भारतीय पारंपरिक पंचांगावर आधारित वर्षारंभ चैत्र महिन्याने सुरू होतो. तसेच भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेची सुरुवात देखील चैत्र महिन्याने होते.

समीक्षक : आनंद घैसास