एक आसनप्रकार. हे आसन करताना शरीराचा आकृतीबंध हंस पक्षाप्रमाणे दिसतो, म्हणून या आसनाला हंसासन असे म्हणतात.

हंसासन

कृती : आसनपूर्व स्थितीसाठी जमिनीवरील बैठकीवर (सतरंजीवर) दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून बसावे. दोन्ही हात शरीराच्या मागच्या बाजूला ठेवून हाताची बोटे बाहेरील बाजूस ठेवून मान शिथिल सोडावी. आसनपूर्व स्थितीमधून प्रथम मार्जारासन स्थितीत येऊन सावकाश आपल्या टाचांवर बसावे. दोन्ही चवडे व टाचा एकमेकांजवळ ठेवाव्यात. गुडघ्यांत सुखावह अंतर घ्यावे. टाचांवर बसताना पाठ सरळ असावी. आता दोन्ही हात एकमेकांजवळ आणावेत. हातांचे पंजे, मनगट व कोपर एकमेकांना चिकटून ठेवावेत. सावकाश कमरेतून खाली वाकावे, हाताची बोटे पावलांच्या दिशेकडे करत दोन्ही मांड्यांच्या मध्ये हात घेत पंजे जमिनीवर ठेवावेत. नंतर कमरेपासून शरीराचा भाग खाली झुकवत जात कोपरात दुमडावे. दुमडलेले कोपर शक्यतो नाभीच्याखाली घट्ट असावेत. दोन्ही हातांचे कोपर एकमेकांजवळ असावेत. ते दूर जाणार नाहीत यांची काळजी घ्यावी. आता सावकाश कपाळ जमिनीवर ठेवावे. या आकृतिबंधास पूर्व हंसासन म्हणतात. आता एक एक करून सावकाश पाय मागे न्यावेत. सुरुवातीला पाय मागे घेताना गुडघा जमिनीवर असेल आणि पायांमध्येही अंतर असावे. दोन्ही पाय मागे घेऊन झाले की, गुडघे, घोटे, चवडे एकमेकांजवळ चिटकवून ठेवावेत. हातांचे पंजे व पायांचे चवडे जमिनीवर ठेवून त्यांच्या आधारावर सावकाश डोके वर उचलावे या आकृतिबंधास हंसासन म्हणतात. शक्य असल्यास डोळे बंद ठेवून श्वास नैसर्गिक असावा आणि प्राणधारणेचा अभ्यास करावा. प्राणधारणा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करणे. आपल्या क्षमतेप्रमाणे आसन करावे.

आसनातून बाहेर येण्यासाठी प्रथम डोळे उघडावे. सावकाश कपाळ जमिनीवर ठेवत दोन्ही पायांचे गुडघे जमिनीवर ठेवावे. हळूच एक एक पाय पुढे आणावा व सुरुवातीप्रमाणे दोन्ही पायांमध्ये अंतर व गुडघे जमिनीवरच अशा स्थितीत यावे. सावकाश दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर घट्ट ठेवून डोके वर उचलावे. व शेवटी हात वर घेत सुरुवातीच्या स्थितीत यावे. आता मार्जारासन स्थितीत येऊन दोन्ही पाय घोट्यातून एकमेकांवर ठेवत सावकाश खाली बसावे. पाय पुढे शिथिल करून हात मागील बाजूस ठेवत मानही शिथिल सोडावी.

लाभ : पोटावर येणाऱ्या दाबामुळे पचनक्रिया तीव्र व प्रभावशाली बनते. मोठे आतडे उत्तेजित होऊन मलनिस्सारण चांगले होते. पोटावरील अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते. मूत्रपिंड व त्यावरील अंत:स्रावी ग्रंथी कार्यक्षम बनतात. हातांचे स्नायू व मनगट बळकट बनतात.

पूर्वाभ्यास : पूर्व हंसासन तसेच कपाळ जमिनीवर ठेवत पाय मागे नेण्याचा सतत सराव करावा. हंसासन हे आसन मयूरासनाचा पूर्वाभ्यास म्हणून केले जाते.

विविध प्रकार : कुक्कुटासनाप्रमाणे दोन्ही हात मांडी आणि पोटरीच्या मधून जमिनीवर ठेवावे आणि हातांच्या साहाय्याने दोन्ही मांड्या वर खांद्यावर ठेवाव्यात.

विधिषेध : कोणत्याही प्रकारचे पोटातील विकार, वेदना, सांधेदुखी, खांदे आणि मनगटातील वेदना, ओटीपोटातील तक्रारी असल्यास तसेच गरोदरपणात हे आसन टाळावे. हे आसन शक्यतो योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

संदर्भ : 

  • Gharote M.L (Ed.), Encyclopedia of Traditional Asanas, The Lonavla Yoga Institute, Lonavla, 2006.
  • Nimbalkar Sadashiv, Yoga for Health and Peace, Yoga Vidya Niketan, Mumbai, 2012.
  • Swami Satyananda Saraswati, Asana, Pranayama, Mudra, Bandha, Yoga Publication trust, Bihar, 2008.

समीक्षक : नितीन तावडे