आसन या संज्ञेची व्युत्पत्ती ‘आस्’ या संस्कृत धातूपासून झाली असून या धातूचा अर्थ ‘बसणे’ असा आहे. त्यापासून आसन म्हणजे ‘बसण्याची क्रिया’ हे एक नाम तयार झाले आहे. याशिवाय बसण्याची वस्तू किंवा साधन; बसण्याची पद्धत; युद्धाचे वेळी दिलेला तळ; जमाखर्चातील प्रत्येक सदर; स्त्री-पुरुष संयोगाचे प्रकार; धर्मकृत्याची आसने इत्यादींसाठी ही आसन या संज्ञेचा वापर केला जातो. सदर नोंदीमध्ये शरीर सुदृढ राहण्यासाठी करावयाची योगासने म्हणजे आसन अशा अर्थाने माहिती देण्यात आली आहे.

हठयोग आणि राजयोग या योगमार्गांत आसनांना फार महत्त्व असल्याचे दिसून येते. हठयोगाचे प्रथम अंग आसन आहे. हात व पाय एका विशिष्ट अवस्थेत ठेवून शरीर ताठ व स्थिर करून ध्यानधारणा करण्याने मन एकाग्र होण्यास मदत होते, असे ग्रंथांत म्हटले आहे. बसण्याची पद्धत या दृष्टीने आसन शब्दाचा अर्थ घेतल्यास काही आसने प्रसिद्ध आहेत ती पुढीलप्रमाणे : वीरासन, पद्मासन, कूर्मासन, कुक्कुटासन, सिंहासन, भद्रासन, वज्रासन इत्यादी. भारतीय मूर्तिकलेत सामान्यत: पद्मासनाचा उपयोग प्राधान्याने केलेला दिसून येतो. तर पूर्वीच्या राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा बहुधा वीरासनावर दिसतात.

हठस्य प्रथमाङ्गत्वादासनं पूर्वमुच्यते |

कुर्यात्तदासनं स्थैर्यमारोग्यं चाङ्गलाघवम् || (हठयोगप्रदीपिका १.१७)

“आसन हे हठयोगाचे प्रथम अंग असल्यामुळे हठयोगप्रदीपिकेत त्याची माहिती आधी आली आहे. आसनांमुळे शरीराला स्थैर्य, आरोग्य व हलकेपणा प्राप्त होतो म्हणून आसने करावीत,” असे हठयोगप्रदीपिकेमध्ये म्हटले आहे.

योगशास्त्रात शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विविध आसने सांगितली आहेत. योगसाधनेमध्ये प्राणायामाला प्राधान्य असून त्यापूर्वी नाडीशोधनासाठी आसन करणे आवश्यक असते. आसनांमुळे शरीर निरोगी व चपळ होऊन प्राणायाम करणे सोपे होते. आसनांची संख्या ८४ आहे, असे हठयोगाच्या ग्रंथांमध्ये प्रतिपादन केले असले तरी त्यांमध्ये सर्वसामान्यत: ३२ आसने, त्यांची कृती व लाभ सांगितलेले आहेत. आसनांमधील शारीरिक अवस्था किंवा रचना, निरनिराळे पशू, पक्षी, फुले, झाडे यांच्यासारखी भासते म्हणून आसनांना त्यांची नावे दिलेली आढळतात. आसनामध्ये शरीराची स्थिरता आणि मनाची शांती आवश्यक आहे. आसन सुखावह असले पाहिजे. आसन लावताना व सोडताना होणारी हालचाल आणि आसन स्थितीमधील स्थिरता असे प्रत्येक आसनाचे दोन भाग पडतात.

आसनांचे विविध प्रकार

आसन कसे असावे? : पतंजलींच्या योगसूत्रामध्ये आसनाचे लक्षण, स्वरूप आणि त्याचे लाभ याचे वर्णन मिळते. ‘ज्यामध्ये सुख आणि स्थिरता आहे त्याला आसन म्हणतात’, अशी पतंजलींनी आसनाची व्याख्या केली आहे (स्थिरसुखमासनम् | पातंजल योगसूत्र २.४६). पतंजलींच्या ‘स्थिरसुखमासनम्’ या सूत्राचा अर्थ असा आहे की, ज्या शारीरिक अवस्थेमध्ये काही काळ पीडा न होता सुखावह रीतीने साधकाच्या शरीराला आणि मनाला स्थिरता येईल, ती शारीरिक स्थिती आसन या संज्ञेने अपेक्षित आहे असे समजावे. झोपण्याच्या स्थितीस आसन म्हणता येणार नाही, कारण निद्रावस्था स्थिर आणि सुखावह असू शकली तरीसुद्धा आसनात जागृतावस्था आवश्यक आहे. प्राणायाम, ध्यान इत्यादींसाठी स्थिरता व सुख या दोहोंची आवश्यकता असते. खूप ओढाताण व प्रयत्न करून आसन लावण्याचा प्रयास केल्यास शरीरास वेदना होतील. ताण सहन होणार नाही. लक्षही वेदनेकडेच वेधले जाईल. विनायास आणि यथाशक्ती प्रयत्न केल्यास स्नायूंवरील ताण व आकुंचन कमी होईल. प्रयत्न शैथिल्य तसेच मन अनंतावर स्थिर केल्यामुळे देहपीडेचे भान उरणार नाही. (प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् | पातंजल योगसूत्र  २.४७). आसनांमुळे परस्परविरुद्ध द्वंद्वे, उदा., सुख-दु:ख, शीत-उष्ण इत्यादी सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. (ततोद्वंद्वानभिघात: | पातंजल योगसूत्र २.४८). आसनांमुळे ध्यान-धारणादींना अनुकूल अशी परिपक्वता येते. सिद्धासन, पद्मासन, सिंहासन, भद्रासन इत्यादी विशिष्ट आसने उत्तम साधकाला बंधांकडे आणि बंधांपासून कुण्डलिनीच्या जागृतीकडे प्रेरित करतात.

आसनांचे वर्गीकरण  : सध्या प्रचलित असणारी आसने ही काळाच्या ओघात विकसित झालेली आहेत आणि उत्तरोत्तर नवीन आसनांच्या निर्मितीला चालना मिळत आहे. आसनांची कृती व परिणाम यानुसार आसनांचे  वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते.

(१) शरीरसंवर्धनात्मक आसने : उत्तम योगसाधनेसाठी विशेषत: ध्यानधारणेसाठी शरीर व मनाची विशिष्ट योग्यता आवश्यक असते. त्यासाठी शरीर व मन यांत काही परिवर्तन करणे जरूरीचे असते. हे बदल घडवून आणणारी आसने शरीरसंवर्धनात्मक आसने या वर्गात मोडतात. याचे उपवर्ग पुढीलप्रमाणे आहेत.

(अ) मेरुदंडावर परिणाम करणारी आसने : या वर्गातील आसने पाठीच्या कण्याच्या सांध्यांना, मज्जापेशींना आणि स्नायूंना मजबूत व सक्षम करण्यासाठी, त्यांची लवचिकता वाढविण्यासाठी आणि बराच वेळ ताठ बसण्याची क्षमता प्राप्त होण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदा., भुजंगासन, धनुरासन, वक्रासन, चक्रासन, उष्ट्रासन इत्यादी.

(ब) शरीरांतर्गत अवयवांच्या संवेदनांवर परिणाम करणारी आसने : ही आसने सांध्यांमधील व स्नायुपेशींमधील ताणावर सकारात्मक परिणाम करतात आणि शरीराचे संतुलन साधतात. उदा., गोमुखासन, मत्स्यासन, वज्रासन, भद्रासन, सुप्तवज्रासन, नौकासन इत्यादी.

काही आसनांमुळे पोटातील अवयवांचे आकुंचन व प्रसरण होते; जेणेकरून स्वयंचलित चेतासंस्थेस चालना मिळते, विशिष्ट ग्रंथींवर परिणाम होतो व त्यांचे कार्य सुधारते. उदा., पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन,भुजंगासन, हलासन, पवनमुक्तासन इत्यादी.

डोळे, कान व पायांचे तळवे यांच्या सुनियंत्रित कार्यामुळे आपल्या शरीराचा तोल सांभाळला जातो. रक्तदाब, मानसिक संतुलन योग्य प्रमाणात राहते. यासाठी शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी, वृक्षासन, कुक्कुटासन, बकासन आणि मयुरासन ही आसने सांगितली आहेत.

(२) विश्रांतीकारक आसने : ही आसने शरीरांतर्गत संवेदनांवर परिणाम घडवून इष्ट तो बदल साध्य करतात. शारीरिक थकवा दूर करणे, शरीर व मन शिथिल करणे आणि त्यांना विश्रांती देणे हे या आसनांचे उद्दिष्ट होय. या प्रकारात शवासन व मकरासन ही आसने मोडतात.

(३) ध्यानोपयोगी आसने : शरीरसंवर्धनात्मक आसनांमुळे शरीर व मन प्राणायाम किंवा ध्यानासाठी सिद्ध झाले असले तरी त्यासाठी स्थिर व सुखकारक अशी बैठक महत्त्वाची असते. सिद्धासन, पद्मासन, समासन, स्वस्तिकासन ही आसने ध्यानासाठी योग्य आहेत.

प्रत्येक आसनात श्वसनाला, सांध्यांना, स्नायूंना व मज्जासंस्थेला विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते. आसनांच्या निरंतर अभ्यासानंतर साधक प्राणायामासाठी सिद्ध होतो.

पहा : आसन – लाभ व परिणाम.

संदर्भ :

  • स्वामी कुवलयानन्द, योगासने, कैवल्यधाम, लोणावळा, २००९.
  • Swami Satyananda Saraswati, Asana Pranayama Mudra Bandha, Bihar School of Yoga, Munger, Bihar, 1993.

समीक्षक : साबीर शेख