एक आसनप्रकार. नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. नृत्याची देवता नटराज यास हे आसन समर्पित असल्याने या आसनाला नटराजासन असे म्हणतात.
कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये आरामदायी अंतर ठेवून दोन्ही तळहात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून उभे राहावे. आसनपूर्व स्थितीतील दोन्ही पाय जवळ घेऊन हात शरीराच्या बाजूला ठेवून स्थिर उभे रहावे. दोन्ही पायाचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ असावेत. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. दृष्टी समोर स्थिर ठेवावी. नैसर्गिकरीत्या श्वास घेत, शरीराचे वजन सावकाश डाव्या पायावर तोलत उजवा पाय गुडघ्यामध्ये अशा पद्धतीने दुमडावा की, उजव्या पायाची टाच नितंबाच्या दिशेला असेल. आता उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडावा आणि पाय नितंबापासून दूर न्यावा, ज्यामुळे नितंबाचा भागही वर उचलला जाईल. शरीराचा भार डाव्या पायावर असेल तरीही डावा पाय गुडघ्यात सरळ असावा आणि शरीराचा तोल राखण्यासाठी डावा हात खांद्याच्या समोरील दिशेस सरळ ठेवावा. तोलासन प्रकारातील आसन असल्यामुळे शक्यतो डोळे उघडे ठेवून प्राणधारणेचा अभ्यास करावा. प्राणधारणा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या क्षमतेनुसार आसनाचा अभ्यास करावा. याच पद्धतीने डावा पायही मागील बाजूने वर उचलत आसन पूर्ण करावे.
आसन सोडतान सावकाश खांद्यासमोरील हात मांडीच्या बाजूला घ्यावा. वरच्या दिशेला घेतलेला पाय नितंबाच्या मागे घेत खाली जमिनीवर सरळ ठेवावा. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवत शिथिल स्थितीत यावे.
लाभ : पाय, मांड्या, घोटे, गुडघे, खांदे यांचा व्यायाम होऊन स्नायूंना बळकटी मिळते. मेरुदंडाचा लवचिकपणा वाढतो. पायातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. श्वसनसंस्था, पचनसंस्था यांना चालना मिळते. त्यामुळे त्यांचेही कार्य सुधारते. शरीर व मनाची एकाग्रता होऊन मानसिक स्वास्थ्य लाभते.
पूर्वाभ्यास : ताडासन, वीरभद्रासन, वृक्षासन या आसनांचा अभ्यास नटराजासनाच्या आधी करावा.
विविध प्रकार : नटराजासन काही वेळेस उत्तम स्थितीसाठी दोन्ही हातांनी एका पायाचा घोटा पकडून केले जाते.
विधिनिषेध : उच्च रक्तदाब, हृदयरोग, खांदेदुखी, मानेचे व गुडघ्यांचे स्नायू कमजोर असल्यास तसेच तीव्र सांधेदुखी, पाठदुखी असणाऱ्यांनी हे आसन करणे टाळावे. हे तोलासन प्रकारातील आसन असल्यामुळे मानसिक अस्थिरता असल्यास तसेच गरोदरपणात या आसनाचा अभ्यास टाळावा. शक्यतो हे आसन योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
संदर्भ :
- Ann Swanson, Science of Yoga, DK Publisher, New York, 2019.
- Gharote M. L & others, Ed., Encyclopedia of Traditional Asanas, The Lonavla Yoga Institute, Lonavla, 2006.
- Swami Satyananda Saraswati, Asana Pranayama Mudra Bandha, Yoga Publication trust, Bihar, 2008.
समीक्षक : नितीन तावडे