एक आसनप्रकार. सिद्धासनाने अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, म्हणून यास सिद्धासन असे म्हणतात. हे आसन योगी लोकांच्या आवडीचे आहे. मुक्तासन, वज्रासन, गुप्तासन ही पर्यायी आसनेही हठप्रदीपिकेत दिलेली आहेत. या आसनात बसल्यावर तिन्ही बंध सहजतेने लावले जातात असे हठप्रदीपिकेत म्हटले आहे. ब्रह्मानंदांच्या जोत्स्ना टीकेमधे याच्या चार प्रकारच्या कृती दिल्या आहेत. पुरुष साधकांना अनुलक्षून या आसनाची कृती असली, तरी स्त्री साधकही हे आसन करू शकतात व त्याचे लाभ मिळवू शकतात. स्त्री साधकांनी केलेल्या सिद्धासनास सिद्धयोनी-आसन असे म्हणतात.

सिद्धासन

कृती : दोन्ही पाय समोर ठेवून दण्डासनात बसावे. डावा पाय गुडघ्यात वाकवून डावी टाच वृषणाच्या खाली शिवणीला दाबून टेकवावी. डावे पाऊल उजव्या मांडीला स्पर्श करील असे ठेवावे. आता उजवा पाय वाकवून उजवी टांच लिंगाच्या मुळाशी विटपास्थी (प्युबिक) या हाडापाशी ठेवावी. उजवे पाऊल डाव्या मांडीच्या आतील बाजूस लागेल असे ठेवावे. दोन्ही टाचांच्या मधे लिंग व वृषण नीट बसवावेत. त्यावर किंचित दाब पडतो. हनुवटी छातीला लावून जालंधर बंध लावावा. श्वसन नैसर्गिकरित्या चालू द्यावे. भ्रूमध्य दृष्टी लावावी. हातांचे पंजे ज्ञानमुद्रेत ठेवावे. या आसनात बसण्याचा काळ व क्षमता गरजेनुसार हळूहळू वाढवावे. स्त्रिया देखिल हे आसन करू शकतात. त्यांनी टाच योनिच्या खालच्या बाजूस लावावी व दूसरी त्यावर, योनीच्या वरच्या बाजूस अशी ठेवावी. काही वेळाने आसन सोडताना आधी मान सरळ करून जालंधर बंध सोडावा. पाय सोडवावेत व पुन्हा दण्डासनात बसावे.

लाभ : ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे, निरनिराळ्या वासना, विकार, भावना यावर विजय मिळवायचा आहे अशा साधकांना, संन्यासी, योगी यांना हे आसन अत्यंत महत्त्वाचे आहे. इतरांनी आपला उद्देश, क्षमता इत्यादी ध्यानात घेऊनच हे आसन करावे. फक्त शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य टिकवून ठेवायचे आहे अशांसाठी  हे आसन आवश्यक नाही. मात्र ध्यानासाठी हे आसन उत्तम आहे.

विधिनिषेध : टाचांचा दाब लिंगावर खूप जास्त पडणार नाही याची काळजी घ्यावी. पाठीचा कणा ताठ असावा. भ्रूमध्य दृष्टी न लावता व जालंधर बंध न लावता फक्त ध्यानासाठी हे आसन करता येते. आसनात बसण्याचा काळ आवश्यकतेनुसार ठरवावा. या आसनाने लैंगिक उत्तेजना, भावना कमी होते, म्हणून गृहस्थी व्यक्तीने हे आसन फार वेळ करू नये. फक्त एक उत्कट आनंद व ध्यानस्थिती प्राप्त करण्यापुरते करावे. मार्गदर्शकाचा सल्ला वेळोवेळी घ्यावा.

समीक्षक : नितीन तावडे